Tuesday, December 7, 2021

सांगा ना तुमी

सम्मेलनात भाऊनं माया, केली हो कमाल
हासू हासू पोट दुखलं,  आली लय धमाल ।

म्हने कवी न्हाय मी, वऱ्हाडीतच बोलतो
सांगानं तुमी बावा, म्हनांन तसा डोलतो ।

गर्व हाये मले बी, माया या वऱ्हाडीचा
कारखानदार मना मले, हाये या पऱ्हाटीचा ।

पिकवतो मी कापूस, मेहनत नाय कमी
एकच पाऊस धोका देते, सांगा ना तुमी ।

एकडाव भाऊ या ना, घर माह्य पाहाले
कुडाच्या भीती पत्र्याचं छप्पर, हाये हो राहाले ।

लहानश्या घरात सांगा, लोकं कितीक रायते
उली उली खाऊन, आग पोटाची जायते ।

बिमरिले आमच्या हो, न्हाई भेटत डाक्टर ।
बिना औषधीनच मंग, घेतो उरावर ट्रॅक्टर ।

पेरणीच्या घाती आमचा, सावकार बनते देव 
कर्ज फेडाले मातर, भाऊ वाटते हो भेव ।

पिकते हो थोडं बहुत, वावरात बी माह्या 
पाडून मांगते व्यापारी, फुटते मंग लाह्या ।

मिटन म्हनते गरिबी, पर कधी हो मिटन
कप्पच चिपकलं हाये, लाचारीचं किटन ।

महागाईनं पहा कसा, वासला हाये आ
घर कसं चालवाचं, सांगन का कोनी बा ।

लय झालं डोक्याभाईर का, सुचतच नाही
फास दिसते गया भोवती, सांगा तुमी काही ।
Sanjay R.


No comments: