Tuesday, December 28, 2021

मनीष

मनीष, साधा सरळ. एकांतात रमणारा, निसर्गाच्या दुनियेत, पाना फुलांमध्ये आनंद शोधणारा.

अगदी लहान पनापासून तो असाच आहे. कधीच स्वतःहून कुणाशी बोलत नसे. कुणी बोललं तर दुसऱ्यास कधी दुखावत नसे.

आवाज ही त्याचा गोड मधुर. पाहायला कुणीही खूपच सुंदर म्हणावं असा.

लहान असताना तर, सारेच त्याच्या आईस म्हणायचे...
 
"अग तारे चुकून हा मुलगा झाला असेल गं, बघ जरा मुलगीच असेल, विचार जरा डॉक्टरांना".

" इतकी सुंदर तर मुलगीच असायला हवी होती ". 

मग तारालाही वाटायचं ही मुलगीच असती तर किती छान झालं असत.

तिलाही मुलीचीच आवड होती.

मग ती मनिषला मुलींचीच कपडे घालून छान पावडर गंध लावून छोटीशी वेणी घालून तयार करायची.

मनीष त्या वेशात खूपच सुंदर दिसायचा. कुणीही त्याला उचलून घ्यायचे. खूप लाड करायचे.

मनीष मात्र अगदी लहान असताना पासून मग गोंधळून जायचा. त्याला काय करावे काय बोलावे काहीच सुचत नसे. तो शांत राहून फक्त बघत बसायचा .

होता होता मनीष मोठा होत होता. पण आता तो मुलांना टाळू लागला होता. त्यांच्यापासून दुर दूर राहायचा.

त्याला स्वतःतच रमायला आवडायचे. तो आपल्याच विश्वात जास्त आनंदी असायचा. कुणी काही बोललं की गोंधळून जायचा. काय बोलावे. काय उत्तर द्यावे काहीच सुचत नसे.

आता मनीष सोळा सतरा वर्षाचा झाला होता. पण सदा त्याच्या मनात एक वेगळी घालमेल सुरू असायची.

त्याला मुलींच्या कपड्याबद्दल आकर्षण वाटायचे. आपणही तसे कपडे घालून मिरवावे, केसांची छान वेगवेगळी हेअर स्टाईल करून घेऊन मस्त पैकी मानेला झटका देऊन केस मागे सारावे, चेहऱ्यावर मस्त पावडर, क्रीम लावून, कपाळावर बिंदी लावून, ओठांना छान रंगीत गुलाबी लीप स्टिक लावावी. मस्त नटावे अशी इच्छा त्याला नेहमीच वाटायची.

पण कधी तसे करून बघितलेच आणि आई ला ते कळले तर मात्र ती मनीष वर खूप ओरडायची रागवायची. त्यासाठी त्याने आईचा खूपदा मारही खाल्ला होता.

पण त्याला काहीच कळत नव्हते. त्याला ही अशी इच्छा का होते.

एक दोनदा त्याने आई जवळ तसे संगण्याचा प्रयत्नही केला. पण आईकडून त्याला मार आणि ओरडण्याशिवाय काहीच मिळाले नव्हते.

आता त्याच्या चालण्या बोलण्यातही कुणाच्याही लक्षात यावा असा फरक दिसायला लागला होता.

शाळेतली मुलं त्याची टिंगल करायचे. त्याला मनीषा मनीषा म्हणून चिडवायचे.

त्यामुळे तो खूप दुःखी व्हायचा. मग एकांतात कुठेतरी लपून बसायचा.  स्वतःच रडत राहायचा.

का मी हा असा ? स्वतःलाच प्रश्न विचारायचा आणि स्वतःच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा.

त्याच्या मनाचा कोंडमारा व्हायचा.

मात्र त्याला कुणी मनीषा म्हटलं की खूप छान वाटायचं.

आताशा त्याने शाळेत जाणे पण बंदच केले होते. घरून शाळेत जाण्यासाठी निघायचा मात्र कुठेतरी दूर एखाद्या एकांत जागी जाऊन तो वेळ काढायचा, आणि शाळेच्या सुट्टीच्या वेळी बरोबर घरी यायचा.

मनातला कोंडमारा कुणाजवळ मोकळा करावा काहीच कळत नव्हते. आईला काही सांगायचे म्हटले तीही खूप रागवायची. 

मग त्याला वाटायचे आपले लहानपणच किती छान होते. सगळे किती लाड करायचे.

आणि आता, आता तर सगळेच मला दूर सारतात.  का हे असे होत आहे ?  देवा मलाच का हे असं बनवलं? यात माझा काय गुन्हा?

तो खूप रडायचा . मग त्याला देवाचाही राग यायचा. कुणीच त्याला समजून घ्यायला तयारच नव्हते. 

आतल्या आत त्याचे मन त्याला पोखरुन काढत होते. काय करावे काहीच कळत नव्हते.

नेहमीच तो दुःखी रहायला लागला. शेवटी त्याने एक निर्णय घेतला.

आज सकाळी शाळेत निघताना त्याने आपले घर अगदी डोळे भरून पाहिले. देवाला नमस्कार केला.

आईला बघून त्याच्या डोळ्यात आसवे आली. तो अचानक आईला बिलंगला. त्याला आईला सोडूच नये असे वाटत होते. 

आईनेच त्याला रागावून बाजूला केले. म्हणाली अरे हे काय मनीष. आता तू लहान का आहेस. जा तुझ्या शाळेची वेळ झाली बघ. निघ शाळेला वेळ व्हायला नको. उशीर झाला तर टीचर पनिश करतील तुला.

जड अंतकरणाने तो आई पासून दूर झाला. त्याने आपली स्कुल बॅग उचलली आणि निघाला.

आज मुद्दाम तो वर्गात गेला. सगळी मुलं त्याची टिंगल करत होते.

कुणीच त्याला इतके दिवस का आला नाही , कुठे होता, काय झाले काहीच विचारत नव्हते.

सगळ्यांना फक्त त्याची टिंगल मात्र करायचे सुचत होते. त्याला सगळ्यांचाच खूप राग आला. मग मात्र तो स्कुल मध्ये न थांबता सरळ झपाटल्यासारखा रस्त्याने एकटाच आपल्याच तंद्रीत  निघाला.

सायंकाळ होऊनही मनीष आज घरी परत आला नाही म्हणून तारा ला काळजी लागली. तिला काय करावे काहीच सुचत नव्हते.

तेवढ्यात कोणी तरी तिला सांगितले गावाच्या बाहेर कुणी तरी एका मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली. 

तिचा हृदयाचा थरकाप उडाला ती तशीच खाली बसून रडायलाच लागली....

संजय रोंघे
नागपूर


No comments: