Saturday, November 30, 2019

" काळजावर घाव "

परत एक डाव
वादळात नाव
जगण्याची हाव
अंतरात धाव
काळजावर घाव
कावळ्यांची काव
स्तब्ध झाली नाव
Sanjay R.

" गावाकडच्या गोष्टी "

आज गावाला जायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. मात्र लहान असतांना गावाला जायचं म्हटलं की खूप आनंद व्हायचा. जायचा दिवस येईपर्यंत मग नुसती स्वप्न रंगायची . कसं जायचं, केव्हा जायचं, कुठे कुठे जायचं, गेल्यावर काय काय करायचं, कुना कुणाला भेटायचं. शेतात काय असेल, आंब्याच्या झाडाला आंबे लागले असतील मग ते कसे तोडायचे. राखणदार असेल मग त्याला चुकवून कसे झाडावर चढायचे. सगळ्या गोष्टीवर विचार व्हायचे.
आणि मग गावाला गेल्यावर मस्त मजा करायची.
आंबे , बेल फळ, शिंदीच्या झाडाचा बुंधा चिंचा खाताना खूप मस्त मजा यायची, गावातल्या मुलांसोबत गाई बैलांना घेऊन शेतात चरायला न्यायचे, नदीत सकाळी पोहायला जायचे, सायंकाळी नदी काठी फिरायला जायचे, कधी जाळे लावून मासे पकडायचे, रात्री अंगणात खाटेवर पडून चांदणे मोजायचे तर सप्तर्षी म्हणजे चार चांदण्या म्हणजे बुढीचे खाटले आणि तीन चांदण्या म्हणजे तीन चोर , ते तीन चोर बुढी झोपायची वाट बघत आहेत,आणि चोरीच्या भीती पाई बुढी कशी रात्रभर जागी राहते या कथेवर चर्चा व्हायची. झोप येईस्तो कथा कथन चालायचे, त्यात राजा राणी, राक्षस अशा अनेक कथा असायच्या.
आज मात्र गावातील ते जीवन पूर्ण पणे बदललंय.
नद्यांच्या ठिकाणी नुसती एक नाली वाहतेय.
आमराईतले आंब्याचे बन पूर्णतः गायब झाले आहे. शिंदीचे बन पण संपले आहे, एखादं दुसरे झाड फक्त साक्ष द्यायला उभे आहे.
गावातले जीवनच पूर्णतः बदलून गेले.
मातीच्या घरा ऐवजी विटा सिमेंट ची घरं झालीत.
सोबत गावातली माणसं पण बदलली.
त्यावेळची माया, प्रेम, जिव्हाळा आता उरलाच नाही.
आता ते गावच राहिले नाही. त्याचे पण शहरीकरण झाले आहे. लोकं पण कोरड्या मनाची झालेली दिसतात.
काळानुसार बदल तर व्हायलाच हवा. पण जो एक कोरडेपणा जाणवतो, तो बघून मन दुःखी होते.
गाव गावच राहिला नाही.

संजय रोंघे
नागपूर

Friday, November 29, 2019

" शिक्षण वाटे एक भार "

वाटे शिक्षण साऱ्यास
जीवनाचा आधार ।
होईल कमी थोडा
या गरिबीचा भार ।

पण हा तर आहे
फक्त एक विचार ।
होते बंद कसे
उपजीविकेचे दार ।

उच्च शिक्षित किती
झालेत कसे बेरोजगार ।
नोकरी विना भटकती
बघा सारेच हुशार।

सांगा हुशार किती
आपले हे सरकार ।
अर्ध्या आयुष्याचा
केला कसा बाजार ।

दिला शिक्षणाने
युवकांना कसा आजार ।
घेतला हिसकावून
जगण्याचा आधार ।

काम धाम नाही कुणा
वाटे घरात तो भार ।
हाच तर आहे बघा
शिक्षणाचा सार ।
Sanjay R.

Thursday, November 28, 2019

" जाऊ नकोस दूर "

जाऊ नकोस दूर
मन माझे आतुर
गुंजतो कानात सूर
झरे आसवांचा पूर
का झालास फितूर
हृदय झाले चुरचुर
नको होऊस क्रूर
अंतरात रे तूच
जाऊ नकोस दूर
Sanjay R.

Wednesday, November 27, 2019

" पडकी विहीर "

कान अधीर
डोळे भिरभिर ।
श्वास थांबले
सुटला धीर ।
शब्द सुचेना
मन अस्थिर ।
सांज ढळली
झाला उशीर ।
रात किडेही
करती किरकिर ।
काळोखात ती
पडकी विहीर ।
कुणी हसले
सुटले तिर ।
स्वप्न सरले
मिटली लकीर ।
Sanjay R.

Tuesday, November 26, 2019

" लोकशाहीला जीवच नाही "

ही कशी हो
लोकशाही ।
हसताहेत सारे
दिशा दाही ।
हरले जिंकले
पुढारी काही ।
बहुमत मात्र
कुणालाच नाही ।
खुर्ची साठी
त्राही त्राही ।
सत्ते साठी
स्वप्न पाही ।
कुणी सारतो
शर्टाची बाही ।
बोलतो दुसर्यास
नाही नाही ।
नीतीमत्ता तर
धारा शाई ।
लोक शाहीला
जीवच नाही ।
Sanjay R.

" मनातलं खूप सारं "

मनातलं खुप सारं
मनातच असू द्या ।
गालावर फक्त
हास्य दिसू द्या ।

डोळ्यातली आसवं
डोळ्यातच असू द्या ।
आसवांची फुलं
डोळ्यातून गळू द्या ।

कान किती तीक्ष्ण
सारच त्यांना ऐकू द्या ।
चांगलं ते सोडून
बाकी सारं विसरू द्या ।

मुखी शब्दांचे भंडार
त्यांनाही थोडं हलू द्या ।
जिंकायचे असते मन
शब्द तशेच बोलू द्या ।

आभाळ विचारांच उरी
त्यालाही थोडं धावू द्या ।
गर्जनाऱ्या आभाळातून
बरसात सुखाची होऊ द्या ।
Sanjay R.

" नाही अबला ती तर सबला "

रे माणसा तूच रे बदलला
माणुसकी तर तूच विसरला ।
स्त्री तर होते माता, बहीण कुणाची
अर्धांगिनी ती आपूल्या पतीची ।
भार घराचा तीच उचलते
तिच्या विना रे पान न हलते ।
नाही अबला ती तर सबला
माया ममता ठाऊक तिजला ।
दुर्गा ती अनुसया ती
होते कधी तीच चण्डिका ।
घेऊनि तलवार रणांगणात ती
लढते येता प्रसंग बाका ।
पूजन करते जग सारेची
का विसरला तू माणसा ।
सन्मान हवा थोडा तिजला
मान देऊनी तू बघ जरासा ।
Sanjay R.

Monday, November 25, 2019

" ये तू पुन्हा "

तू ये पुन्हा
पण लावू नको चुना ।
सांगतो तुला
कोण करतो गुन्हा ।
आरोप तुझा रे
आहे हा जुना ।
विचार न थोडं
तू आपल्या मना ।
सांगतो तुला
पुन्हा पुन्हा
आमच्या रे विना
होशील तू सुना ।
वळून बघ जरा
वाट बघतो पुन्हा ।
Sanjay R.

Saturday, November 23, 2019

" राजकारण म्हणजे गोंधळ "

राजकारण म्हणजे गोंधळ
सत्तेसाठी चाले पळापळ ।
कुणी लावी फसवायला गळ
तर कुणी वाजवी नुसते टाळ ।
स्थान कुणाचे सत्तेत अढळ
धुवायचे हात वाहतोय नळ ।
Sanjay R.

Friday, November 22, 2019

" साम्राज्य धुक्याचे "

जिकडे तिकडे
साम्राज्य धुक्याचे ।
दिसत नाही काही
अस्तित्व कुणाचे ।

श्वासाला कळ
डोळ्यात जळजळ ।
थांबतील का ठोके
एकदम हृदयाचे ।

हवेला इथे बंध
पसरला दुर्गंध ।
उपायच नाही
कृत्य हे माणसाचे ।
Sanjay R.

" हस्यकल्लोळ "

हास्य कल्लोळ
भावनांचा घोळ
हसता हसता
डोळे तू चोळ
विचित्रच सारं
म्हणतो सोळ
हसत राहा
पाडू नको झोळ
Sanjay R.

" हस ना जरा "

हो जरा तू आनंदी
मलाही तीच धुंदी ।

सागर दुःखाचा इथे
आहेत सारेच बंदी ।

फिरून बाजार आलो
दिसते फक्त मंदी ।

हलवू नकोस मान
नाहीस रे तू नंदी ।

बदल रे भाव थोडा
आहे हसण्याची संधी ।

सोड दुःखाचा पसारा
होशील मग आनंदी ।
Sanjay R.

Tuesday, November 19, 2019

" सुंदर हे जीवन "

काय कसे हे जीवन
कधी हिरमुसते मन ।
होते दुःखी कधी तर
वेदना देते आलिंगन ।
परी सुंदर आहे जीवन
रागावर करा सय्यम ।
प्रसंगासी व्हा सामोरे
फुलवा आनंदाचा कण ।
जगणे तर नाही सोपे
सुख दुःख हेचि जीवन ।
मृत्यू हा जीवनाचा अंत
मधले सारे आपलेच क्षण ।
Sanjay R.

" दूर दूर "

वाटतच नाही आहेस तू दूर
मन तर नेहमीच असतं आतुर ।
वाटतं आत्ताच तर ऐकला
गोड शब्दांचा तुझ्या सूर ।
Sanjay R.

Sunday, November 17, 2019

" सांगा कसे जगायचे "

आज दिनांक 17 नोव्हेंबर 2019 ला दैनिक तरुण भारत, आसमंत पुरवणीत माझी " सांगा कसे जगायचे " ही कविता प्रकाशित झाली, संपादकांचे खूप खूप आभार .
" सांगा कसे जगायचे "
ताण तणाव किती सारा
सांगा कसे जगायचे ।
नाही सुख कुठेच उरले
सांगा दुःखात कसे हसायचे ।
घरी टेन्शन दारी टेन्शन
टेन्शन मधेच का राहायचे ।
बीपी जडला श्वास अडला
रात्रभर फक्त जागायचे ।
टांगलेला चेहरा घेऊन
कसे दिवसभर फिरायचे ।
तीळ तीळ मनात कुढत
एक दिवस असेच मरायचे ।
सोडा टेन्शन हसा थोडे
म्हणा मना मला जगायचे ।
जे होईल ते होऊ दे
पण हसत हसत मरायचे ।
संजय रोंघे
नागपूर
मोबाईल - 8380074730

Saturday, November 16, 2019

" पक्षी तिथवर उडे "

बघू नकोस मागे
चालले जग पुढे ।
बदलला बघ काळ
क्षणात सारे घडे ।
मन घेई भरारी
नजर नजरेला भिडे ।
निळे आकाश जिथे
पक्षी तिथवर उडे ।
Sanjay R.

" व्हायचं मला लहान "

व्हायचं मला हो
नन्हा मुन्ना ।
हौस नाही फिटली
सांगू मी कुना ।

कट्टी बट्टी
घ्यायची मला अजून
आई चा धपाटा
खायचा मला भिजून ।

बाबांची भीती
किती मला वाटायची
तरीही मस्तीची
लहर फिरून यायची ।

मित्रा मित्रांच्या
गोष्टी असायच्या भारी ।
दंगा आणी मस्तीत
खुशी मिळायची सारी ।

बालदिवसाला पप्पा
घेऊन यायचे मिठाई ।
अजूनही वाटतं
आईने करावे गाई गाई ।

कर ना रे देवा
परत एकदा लहान ।
मनातलं सारं
करून बघिल छान ।
Sanjay R.


Tuesday, November 12, 2019

" आयुष्याचे मोल काय "

आयुष्याचे मोल काय
अजून का हे कळले नाय ।

अधांतरीच स्वप्न सारी
जसे वाळूवरती उभे पाय ।

लाट येताच पाण्याची
कण कण वाळू निघून जाय ।

नाती गोती सरती सारी
नसती सोबत बाप माय ।

स्वाहा होते नश्वर शरीर
राख उरते किंमत काय ।
Sanjay R.

Monday, November 11, 2019

" फिफ्टी फिफ्टी "

फिफ्टी फिफ्टी ने
केला मोठा लोचा ।
सुचत नाही काही
बंद झाली वाचा ।

लोकशाहीत अशाच
आहेत खूप खाचा ।
बहूमता शिवाय हो
कच्चा सारा ढाचा ।

मी मी चा पाढा मोठा
चालत नाही कुणाचा ।
घ्या बेलणं हाती आणि
खूप तुम्ही हो नाचा ।
Sanjay R.

Saturday, November 9, 2019

" मार्ग भक्तीचा "

काय आमची शान
मनी लागते ध्यान ।
नाम स्मरण विठ्ठलाचे
विसरती मग भान ।
गेले सांगून सारेच
संत महंत महान ।
नाही मोठा इथे कोणी
ठेव मजसी लहान ।
सोड करुनि शिक्षित
दे अपार मजला ज्ञान ।
शुद्ध आचरणाचा पाठ
तोचि देईल मजसी मान ।
माऊलीचा भक्त मी
गातो प्रभूंचे गान ।
Sanjay R.

Friday, November 8, 2019

" जय हरी विठ्ठल "

ओढ दर्शनाची मज
पांडुरंगा तू विठ्ठला ।
आज कार्तिक एकादशी
मन माझे पंढरीला ।
नयन मिटून मी दोन्ही
जोडीतो हात तुला ।
कृपा तुझी मजवर
अंतरात तूच हवा मला ।

" जय हरी विठ्ठल "
Sanjay R.

Thursday, November 7, 2019

" मी लाचार "

नाही उरले मन
ना उरली माणुसकी ।
हवे फक्त धन
मारतात मग फुशारकी ।

भ्रष्टाचार व्यभिचार
जडले कितीक आजार ।
मी आणि फक्त मीचा
भरलाय सारा बाजार ।

जो तो लुटतो इथे
मोठेपणाचा नुसता ध्यास ।
गरीबाचा नाही वाली
स्वप्न त्याची फक्त आभास ।

करतो कुणी कष्ट इथे
सोसत नाही त्याला भार ।
आसुडाचे व्रण पाठी
जगण्यासाठी शोधतो आधार ।
Sanjay R.

" कुचिन कारस्तान "

" कुचिन "( 1 )
समजलं न बावा मले
तुय कुचिन कारस्तान ।
दूरच बरा बावा मी
नेतो उचलून माह्य बस्तान ।
Sanjay R.( 2 )
करू नोको तू
असं कुचिन कारस्तान ।
वयखलं म्या तुले
तूच त व्हय पाकिस्तान ।
Sanjay R.

Wednesday, November 6, 2019

" गोठ मोठी हे जीवनात "

उगोत्या सुर्यासंग
होते दिसाची सुरवात ।
हरेकजन होते तयार
कराले दोन दोन हात ।
कुठी दुःख कुठी आनंद
पर असते मातर साथ ।
भेऊ नका परसंगाले
गोठ मोठी हे जीवनात ।
Sanjay R.

Tuesday, November 5, 2019

" ताण तणाव किती सारा "

ताण तणाव किती सारा
सांगा कसे जगायचे ।

नाही सुख कुठेच उरले
सांगा दुःखात कसे हसायचे ।

घरी टेन्शन दारी टेन्शन
टेन्शन मधेच का राहायचे ।

बीपी जडला श्वास अडला
रात्रभर फक्त जागायचे ।

टांगलेला चेहरा घेऊन
कसे दिवसभर फिरायचे ।

तीळ तीळ मनात कुढत
एक दिवस असेच मरायचे ।

सोडा टेन्शन हसा थोडे
म्हणा मना मला जगायचे ।

जे होईल ते होऊ दे
पण हसत हसत मरायचे ।
Sanjay R.

Monday, November 4, 2019

" सुरू पावसाचा चाळा "

संपला केव्हाच पावसाळा
पण अजूनही करतोस चाळा ।
किती रे बरसणार तु सांग
नाही सोसवत तुझ्या नाना कळा ।
शेती डुबली पीक गेले वाया
आवळणार किती तु गळा ।
स्वप्ने सारी रे गेली वाहून
नाही लागत डोळ्याला डोळा ।
फंदा फाशीचाच वाटतो बरा
ऐकत नाही कोणी, जातो मी बाळा ।
Sanjay R.


" गाव माझा बरा इथे "

झुळ झुळ वाहते नदी जिथे
सळ सळ करतो वारा तिथे ।

रंग हिरवा फुलतो जिथे
काळ्या मातीचा गंध तिथे ।

घण घण वाजे घंटा जिथे
ऐकून भूपाळी सूर्य उठे ।

घाम गाळतो माणूस जिथे
व्रत उपासाचे रोजच तिथे ।

नाही पैसा नाही अडका
तरीही कसा तो शांत तिथे ।

आभाळ घराचे छत जिथे
नाही भिंतींचा आधार तिथे

सांगतो तरीही तो अभमानाने
गाव माझा मी राहतो इथे ।

शहराला तर कहाणी कुठे
मरून गेली माणुसकी तिथे ।

आचार विचार नाही जिथे
भ्रष्टांचा नुसता बाजार तिथे ।

गाव माझा बरा इथे
शहर झाले स्मशान तिथे ।
Sanjay R.

Friday, November 1, 2019

" Author of the week "

"Hello,

I have been nominated for Author of the Week : Reader's choice . 

Now I need your love and support to be the final winner because, you know, an artist is nothing without an audience. 

Here is the link to vote for me. Please login and vote!" https://awards.storymirror.com/author-of-the-week/marathi/author/j5k6i3dl

" आनंद जीवनातला "

माझ्यावर कधी तू रुसावं
आणि मी तुझ्यावर हसावं ।
आणि मग गोंधळलेला मी
सांग कसं तुला समाजवावं ।
मनातला तुझ्या तो रुसवा
डोळ्यात तुझ्या मी बघावं ।
जीवनाचे मग क्षण असेच
आनंदात खूप खूप जगावं ।
Sanjay R.