Wednesday, September 30, 2020

" दिवस होते ते मौजेचे "

लहानपण आठवते मला
दिवस किती होते ते मौजेचे ।

वाटतं अजून व्हावं लहान
खेळ खेळावे लहानपणीचे ।

दंगा मस्ती खो खो हसणे
विसरलो प्रसंग गमतीचे ।

शाळा अभ्यास पाटी पुस्तक
धपाटे आठवतात गुरुजींचे ।

आईही द्यायची शिक्षा घरात
अश्रू डोळयातून निघायचे ।

मोठेपणाचा देखावा आता
हुंदके हृदयातच ठेवायचे ।
Sanjay R.

Tuesday, September 29, 2020

" फुलले चांदणे अंगणात "

रात्र होता अंधार दाटतो
सूर्य पल्याड विसावतो ।

फुलले चांदणे अंगणात या
चन्द्र ढगाआडून डोकावतो ।

बेधुंद झाली रात राणी
सुगन्ध तिचा तो दरवळतो ।

रातकीडयांनी ताल धरला
मधेच काजवा लुकलूकतो ।

वृक्ष वेली घेती झोका
हळूच वारा सळसळतो ।

दूर जळते एक पणती
जीव माझा धडधाडतो ।
Sanjay R.

Monday, September 28, 2020

" हा उनाड वारा "

सांगू कसे मी कुणा
किती हा उनाड वारा ।
बेचैन होते मन
बारसतात जेव्हा धारा ।
होतो सूर्य ढगाआड
होई शांत तेव्हा पारा ।
गंध मातीचा सुटे
भिजे चिंब पसारा ।
होता शांत वारा आणि
चमचमतो तारा ।
Sanjay R.

" होते कधी पहाट "

होते कधी पहाट
कधी होते रात्र ।
बिघडले सारे आता
दुनियेची या तंत्र ।

घरातच राहा
जाऊ नका बाहेर ।
पाळा एकच हा
जीवनाचा मंत्र ।

दिवस हे आलेत कसे
नाही उरला टाळतंत्र ।
का हिरावले माणसा
तूच तुझे स्वातंत्र्य ।
Sanjay R.


Sunday, September 27, 2020

" मनातलं वादळ "

मनात वादळ माझ्या
असा मी आहे कसा ।
सहजच आला विचार
का आहे मी असा ।
आहे का दिसतो जसा 
की फक्त वाटतो तसा ।
या ना थोडे तुम्ही बसा 
रुसू नका, थोडे हसा ।
सुखी जीवनाचा तर
आहे एकच वसा ।
जीवन असले जरी
दुःखाचा एक फासा ।
तोडून सारे पाश
हसा तुम्ही हसा ।
Sanjay R.


Monday, September 21, 2020

" अपूर्ण स्वप्न "

स्वप्न होते एकच
राहिले ते अपूर्ण ।
आशा या डोळ्यात
होणार कधी सम्पूर्ण ।

सरल्या कितीक रात्री
अखंड डोळ्यांचे धरणे ।
उघड्या डोळ्यांनी बघतो
माझे मीच मरणे ।

उत्सव होतो साजरा
लावून दारांना तोरण ।
फुले गेली कोमेजून
हेच अंतिम चरण ।
Sanjay R.

Sunday, September 20, 2020

" तुझे माझे नाव "

आहे एक गाव
त्याला तुझे माझे नाव ।
उठताच सकाळी
होते लोकांची धावाधाव ।
दिवसभर चाले कस्ट
होई जीवाची काव काव ।
कोणी मारे गरीबावर
आपल्या अमिरीचा ताव ।
पोहोचता घरात
उतरते सारी झाव ।
गरिबी हटत नाही
काय अस्तित्वाचा भाव ।
Sanjay R.

Friday, September 18, 2020

" माणूस म्हणजे काय "

माणूस म्हणजे कथा
व्यक्त करतो व्यथा ।
घ्याल लिहायला तर
होईल मोठी गाथा ।
करतो तो पालन
प्रत्येक पूर्वापार प्रथा ।
होते सुरुवात इतिने
निरंतर तो झटतो स्वतः ।
अंत येता होतो दूर
ठेऊन पायरीशी माथा ।
सम्पत नाही कहाणी
 उरते सारे जाता जाता ।
Sanjay R.

Thursday, September 17, 2020

" तुले हासता न्हाई येत "

" वऱ्हाडी हास्य कविता "

आयुष्याचे दिस किती
मोजता न्हाई येत ।

लडून लडून डोये सुजले
पुसता न्हाई येत ।

लडता लडता गया दाटला
बोलता न्हाई येत ।

डोकं झालं गा लयच जड
सांगता न्हाई येत ।

हासाव मानलं थोडसं त
हसता न्हाई येत ।

कहाले जगतं बावा तू
तुले काईच न्हाई येत ।

सोड तू इचार आता
तुले टेन्शन न्हाई देत ।

चाल जाऊ दोस्तायकडं
का चालता बी न्हाई येत ।

दोस्त महा हाये वर्हाडी कवी 
थो असा बसू न्हाई देत ।

हासून हासून पोट फुटल
पर हालू न्हाई देत ।

हासाले गा लागते काय
दात बी थो काढू न्हाई देत ।

निस्ता करजो हा हा तू
म्हणन कोन.... 
तुले हसता न्हाई येत ।
Sanjay R.

Wednesday, September 16, 2020

" रंग तुझा वेगळा "

नवरंगांनी रंगलेली ही दुनिया
त्यात रंगच तुझा तो वेगळा ।
चित्रकार तो दूर कुठे अदृश्य
विचार मनात त्याच्या आगळा ।

हिरवी झाडं शुभ्र आकाश

मधेच कुठे होते पानगळ ।
वाहतो वारा कुठून कुठे हा
नाद घुमतो होते सळसळ ।

गर्जती मेघही कधी आकाशी
वीजही जाते लखलख करुनी ।
पावसाची जेव्हा होते बरसात
वाहते पाणी मग लोट धरुनी ।

नदी नाले भरतात तुडुंब
काठ न उरतो जातो विळुनी ।
धरा न उरते मागे ती सरते
जिकडे तिकडे पानी पानी ।
Sanjay R.


Tuesday, September 15, 2020

" सकाळ "

रम्य असते सकाळ
गार गार वारा ।
उजळून निघते आकाश
उगवतो सूर्य तारा ।
चिव चिव पाखरांची
आगळी निसर्गाची तऱ्हा ।
नाद घंटाचा चाले
भाव भक्तीचा इशारा ।
Sanjay R.

Thursday, September 10, 2020

" सरणार नाही आकांत "

चक्र हे या जीवनाचे
सरणार नाही आकांत ।

जाणुनी करी जो परमार्थ
होई तोचि मोठा संत  ।

मिरवणारेही बहुत इथे
म्हणवितात मी तर पंत ।

नियम सृष्टीचा लागू होतो
फळ मिळे सर्वां तंतो तंत ।

ज्याचे त्याचे कर्म जसे
होईल त्याचा तसाच अंत ।
Sanjay R.

Wednesday, September 9, 2020

" एकटाच जाणार "

एकटाच येतो तो
एकटाच जाणार ।
परिक्रमा एकट्याचीच
एकटाच पूर्ण करणार ।

प्रवासाचे सोबती सारे
जन्माला कोण पुरणार ।
चार पावलंच अंताला
मागे पुढे चालणार ।

अंतच आहे सत्य
सारे इथेच सरणार ।
मोह माया प्रेम सारे
आहे इथेच उरणार ।
Sanjay R.


Tuesday, September 8, 2020

" मृगजळ "

मायावी ही दुनिया
मृगजळ सारे ।
भरलेले सागर 
कोरडे नदी किनारे ।

बरसत्या पावसात
शुष्क वाहते वारे ।
सूर्याच्या प्रकाशात
चमचमतात तारे ।

नसताना वादळ
फुलतात पिसारे ।
शांत नुसते भास
अशांत ते बिचारे ।

आनंदी मुखवट्यात
दुःख किती सारे ।
पापणीच्या आड
आहे आसवांचे झरे ।
Sanjay R.


Monday, September 7, 2020

" गुरू प्रकाशाचे किरण "

गुरू प्रकाशाचे किरण

भरलेले ज्ञानाचे धरण ।
ज्ञानाची ओढ ज्यासी
घेती ते सारेच शरण ।

गुरू करी ज्ञानाचे दान
करी विद्यार्थी ते पठण ।
विद्वेचा घेऊनिया सार
शिष्यांचे होई गठण ।

जीवनाचा करी तो आरंभ
करुनिया विद्या धारण ।
गुरू विना विद्या नाही
हवे नमन कराया गुरुचरण ।
Sanjay R.


Saturday, September 5, 2020

" ऋणी आम्ही गुरुजींचे "

गुरुजी माझे प्रायमारीचे
होते अतीच आवडीचे ।
असले जरी ते थोडे कडक
धडे शिकवायचे जीवनाचे ।


पांढरा शुभ्र त्यांचा पोशाख
रुबाबदार ते दिसायचे ।
शिस्त म्हणजे त्यांचा बाणा
सारेच त्यांना घाबरायचे ।

गृहपाठ जो करून येई
पाठ त्याची थोपटायचे ।
अभ्यास जो न करता येयी
पाठीत रट्टा त्याच्या घालायचे ।

कडक जरी ते असले तरी
सगळ्यांनाच खूप आवडायचे ।
जडलो घडलो आज आम्ही जे
ऋणी आहोत सारे गुरुजींचे ।
Sanjay R.


Friday, September 4, 2020

" हिम्मत कोरोनाची "

वाढत आहे हिम्मत 
बघा आता कोरोनाची ।
गरज आहे आपणास
काळजी थोडी घेण्याची ।

मोकळे झालेत रस्ते
वाढली गर्दी रहदारीची ।
बिनधास्त होऊन नका फिरू
घ्या काळजी स्वतःची ।

फिरून वापस येतो म्हणे
वाट बघू या लसीची ।
जपून वागा जपून राहा
गरज आहे काळजीची ।

नुकसान तर झालेच आहे
नको काळजी पैश्याची ।
जगलो वाचलो परत येतील
काळजी फक्त जीवनाची ।
Sanjay R.

Wednesday, September 2, 2020

" जीवन झाले गंमत "

आयुष्यच झाले कसे गम्मत
सांगा कुणाची काय किंमत ।

दाखवतो कोरोना सार्यांना भीती
थांबवली जगाची त्यानेच गती ।

शाळा नाही अभ्यास नाही
बघा धूळ खातेय पुस्तक वही ।

घरात राहा छताकडे पहा
खिसा रिकामा उपाशी राहा ।

काम नाही नी रोजगार गेला
खबर नाही कोण कसा मेला ।

असा कसा हा कोरोना आला
विध्वंस दुनियेचा हो करून गेला ।

येतील कधी सांगा परत ते दिवस
देवा तुला रे आता हाच नवस ।
Sanjay R.


" उत्तर प्रश्नाचे "

प्रश्न काय कुठे आहे
प्रश्नातच उत्तर आहे ।

दरवळतो सुगंध
ते तर अत्तर आहे ।

जीवनाच्या वाटा
किती खडतर आहे ।

जायचे तरीही पुढे
चक्र हे निरंतर आहे ।

पुढे चला थांबू नका
हेच तर उत्तर आहे ।
Sanjay R.