Tuesday, May 31, 2022

चेतवू नको ही वाणी

चेतवू नको ही वाणी

दुःखाची आहे कहाणी ।

पडेल अपुरे विझविण्या
टाकशील कितीही पाणी ।

बघ डोळ्यात जरा दिसेल
आटलेल्या अश्रूंची निशाणी ।

मुखावर आहे खोटेच हास्य
अंतरात आहेत गाऱ्हाणी ।
Sanjay R.



आघात

थाम्ब जरा तू नको जाऊ
करू किती मी विनवणी ।

बघ वळून जरा काय मागे
दिसेल जुनीच ती निशाणी ।

हृदयात ठेवली जपून मी
तुझी माझी ती गोड कहाणी ।

घट्ट हृदयात अजूनही रुतलेली
सांग काढू कशी निशाणी ।

येतो आठवणींचा पूर जेव्हा
थांबेचना डोळ्यातले पाणी ।

नको करुस मनावर आघात
सांगून तू गेलीस की चेतावणी ।
Sanjay R.



Monday, May 30, 2022

प्रेम

प्रेमाला कुठल्या सीमा
आयुष्यभर ते जपावे
प्रेमपुढे सारेच तुच्छ
छान आनंदात जगावे ।
Sanjay R.


नको श्रीमंती गरीब बना

श्रीमंतीची हौस कुणा
पैश्यातूनच पैसे उणा ।
हवा असेल पैसा अधिक
वजा नको करा गुणा ।
भाग तुमच्या नावे होईल
कष्ट हवेत पुन्हा पुन्हा ।
चोरीनेही मिळेल सारे
ठरेल तो तर मोठा गुन्हा ।
कपट्यांची ही नाही कमी
हातोहात लावतात चुना ।
पडते पितळ उघडे जेव्हा
दोष देशील सांग कुणा ।
इमानदारीत आनंद किती
नको श्रीमंती गरीब बना ।
Sanjay R.

पडू दे पाऊस

पडू दे आता पाऊस
भिजू दे ही धरा ।
पाहताहेत वाट सारे
सुटू दे गार वारा ।
Sanjay R.

गुन्हा काय माझा

कधी पडतो पाऊस खूप
कधी दिसेचना त्याचे रूप ।

येतात कधी वादळ वारे
हाती निसर्गाच्या हे सारे ।

नसते कमी मेहनत माझी
पण नाही कुणा कदर त्याची ।

फळ मेहनतीचेही का मिळेना
गुन्हा काय माझा काहीच कळेना ।
Sanjay R.


Saturday, May 28, 2022

वेडा पिसा

भरू दे ना बाजार
खिशात नाही पैसा ।
पैश्याविना होते काय
दाबतो मनात हौसा ।
गरिबाचे जगणे कठीण
स्वप्न बघतो दिवसा ।
अर्धपोटी झोपी जातो
वाटतो वेडा पिसा ।
Sanjay R.

भरला इथे बाजार

गर्दी किती माणसांची
भरला इथे बाजार ।
वेगळे सारेच इथे
जणू जडला आजार ।

निस्वार्थ शोधू कुठे
आहे सारखाच शेजार ।
डाव साधतो कुणी
कुणी आहे लाचार  ।

मजली लूट कशी
नाही कशाचा विचार ।
जो तो करी माझे माझे
फक्त स्वतःचाच प्रचार ।

नाही उरली माणुसकी
शोधतो मी आधार ।
मिळेल का कुठे माणूस
की सगळीकडे अंधार ।
Sanjay R.


Friday, May 27, 2022

सोडून इथेच जातो श्वास

वाट संसाराची कठीण
खडतर किती हा प्रवास ।

पोटाशिवाय असतो का
दुसरा कुठला ध्यास ।

भरले जरी पोट गच्च
सरत नाहीच हव्यास ।

अनाचारी होतो मग
घेतो हिसकून घास ।

स्वतःचाच विचार असतो
इतरांना देतो त्रास ।

राक्षस होतो कधी तोच
लालची पणाचे सारे प्रयास ।

अंत्य समयी काय नेतो
सोडून इथेच जातो श्वास ।

माणुसकीला असता जगला
नसता झाला कसला त्रास ।

चार सुखाचे दिवस सुटले
कुठे मिळाला त्याला विश्वास ।
Sanjay R.


वेळ कुठे थांबते

पुढे पुढे सरकत काटे
चाले घड्याळ अविरत ।
वेळ कशी ही कुठे थांबते
जगतो मी दिवस सारत ।
काल नव्हता आज सारखा
येणार कुठे तो परत ।
उद्या ची मी वाट पाहतो
नको आज, उद्या करत ।
Sanjay R.


Thursday, May 26, 2022

पडेल पाऊस

पडेल आता पाऊस
वाट नको तू पाहुस ।
नागर वखर हाक जरा
मागे तू नको राहुस ।

पाऊस पडेल यंदा
घाबरून नको जाऊस ।
भरभरून होईल पीक
पुर्ण तुझी होईल हौस ।

पैसा येईल खूप हाती
बजेट आता नको लाऊस ।
खर्च करूनही उरेल काही
टेन्शन असे नको घेऊस ।

महागाई तर ही जन्माची
सावकार कसा नको पाहुस ।
कर्जाचा बोजाच वाईट
फ़ंद्या कडे नको धाऊस ।

वळून थोडे बघशील जरा
रडगाणे तू नको गाऊस ।
बायको मुलांना हसव जरा
सोडून सारे नको जाऊस ।

तुझ्यासारखी हिम्मत कुणात
काळजी घराला नको लाऊस ।
नशिबाचा खेळ जरी हा
यंदा नक्कीच येईल पाऊस ।
Sanjay R.


सांग ना जरा

नको येउस तू
मी दूरच बरा ।
बघून का हसते
सांग ना जरा ।
लावले वेड मज
काय तुझी तऱ्हा ।
नजरेला दे नजर
सुखवेल ही धरा ।
Sanjay R.


प्रतीक्षा

मनात आहे ती वेडी आशा
करू किती मी तुझी प्रतीक्षा ।

कुठे शोधू मी सांग तुला
नाही उरल्या कुठल्या दिशा ।

थकले आता हे डोळे माझे
का कळेना तुज माझी दशा ।

येणारच नाहीस तू परत
कशास देतेस मजला शिक्षा ।

Sanjay R.


Wednesday, May 25, 2022

तो दिवस

विसरेल कसा सांग
आठवतो मला अजूनही 
तुझ्या माझ्या भेटीचा 
तो पहिला दिवस ।

दूर तू  होतीस उभी 
वाट कुणाची बघत
नजरा नजर झाली आणी
बघितले वळून मी परत ।

नशिबात होते काय 
कुणास ठाऊक 
परत परत झाली भेट
इच्छा मनाची नव्हती सरत ।

हळूच केव्हा ते 
कसे बोललो आपण 
शब्द जुळले मन मिळाले
सरला अंतरातला मी पण ।

अजूनही तसाच मी
आहे त्याच वाटेवर 
आठवणी सुटणार नाही
प्रेमच असावे तुझ्यावर ।
Sanjay R.







शब्द सरी

टाकले आकाश झाकून
निघाली ढगांची वारी ।
येऊ दे सोसाट्याचा वारा
बरसू दे शब्दांच्या सरी ।
रिमझिम त्या पावसात
भिजेल कथेतली परी ।
हळूच अवतरेल कविता
घेऊनिया आनंद शिरी ।
ओसंडून वाहील पाणी
निसर्ग फुलेल नदी तीरी ।
हिरवे होईल सारे रान
बघतील नजरा भिरी भिरी ।
Sanjay R.


नकोच द्वेष

जीवन झाले दुर्धर
प्रेम हवे नको द्वेष ।
राहतो जिथे आम्ही
जसा देश तसाच वेश ।
नकोत विचार मनाचे
कळ्या दगडावरची रेष ।
लागतील भोगावे मग
आयुष्यभर ते क्लेश ।
प्रेम द्या आणि प्रेम घ्या
करू नका हो द्वेष ।
Sanjay R.


Tuesday, May 24, 2022

दिवस खास

दिवस कालचा
होता खास ।
झालो आनंदी
घेऊनही त्रास ।
अंतरात सदा
होता ध्यास ।
मार्गी लागले
सारे प्रयास ।
घट्ट झाला
मनात विश्वास ।
जगण्यासाठी
हवेच श्वास ।
क्षणात सारे
सरले भास ।
तुजविण नाही
कोणी खास ।
Sanjay R.


खेळ शब्दांचा

शब्दांचा हा खेळ कसा
जोडून होतात चार ओळी ।
वेध घेऊन जाते मनाचा
वाटे कधी ती किती भोळी ।
कधी करी ती वार मनावर
आघात तयाचे किती छळी ।
चार ओळींची जरी कविता
भाव वसतो तिच्या तळीं ।
Sanjay R.

Monday, May 23, 2022

तुझ्याशिवाय

निघेल कसा वेळ
अजून आयुष्य बाकी ।
तुझ्याशिवाय जगणे म्हणजे
विराण जीवनाची झाकी ।
Sanjay R.


Saturday, May 21, 2022

वादळ

सोसाट्याचा वारा सुटला 
रिमझिम करत पाऊस आला ।
वाऱ्याचे मग झाले वादळ 
गारांनाही मग जोर चढला ।
धावू कुठे मी थांबू कुठे
साऱ्यांचाच गोंधळ उडाला ।
झाडे पडली पाने हरली
नाला भरून वाहू लागला ।
घरावरचे छप्पर उडले
डोळ्यांपुढेही अंधार दाटला ।
करू काय मी कळेना आता
वादळ सारेच घेऊन गेला ।
Sanjay R.

जुळते तिथेच नाते

जीवास लागतो जीव
जुळते तिथेच नाते ।
लागता जीव कुणात
बंधनही घट्ट होते ।
आठवण येइ मग सदा
मन अस्वस्थ होते ।
कधी लागता उचकी
वेध मनात लागते ।
दुरावा सहन होईना
डोळेही मग पणावते ।
Sanjay R.



Friday, May 20, 2022

पाऊस सरी

सूर्याची प्रखर किरणं
त्यात होरपळली धरा ।
पाणी पाणी जीव झाला
बरसू दे आता सरी जरा ।

तहानेने व्याकुळ सारे
पाण्यासाठी घेती फेरा ।
नदी नाले आटले सारे
निसर्गावर उलटा घेरा ।

बरस रे पावसा आता
भिजू दे सारी धरा ।
फुटेल पालवी झाडांनाही
आम्हा होई आनंद खरा ।
Sanjay R.





आभास

सदा असतो ध्यास
होतात किती आभास
मग संथ होतात श्वास
कर्तव्याचा होतो प्रयास
पूर्णत्वाचा असे विश्वास
मार्गी लागते सारेची
सफलतेचा क्षण खास
Sanjay R.


Thursday, May 19, 2022

वेदना

अंगावर असू दे
घाव कितीही ।
निघतील भरून
साऱ्या जखमा ।
मनात झाल्यात
ज्या वेदना माझ्या  ।

नाही दुःख मज
काही कशाचे ।
सांगतील अश्रू
वाहत्या डोळ्याचे ।

चोळू नकोस मीठ
जखमेवर माझ्या ।
उरेल काय सांग
ओंजळीत तुझ्या ।

नाही होत सहन
भडकतीळ ज्वाला ।
होईल भस्म सारे
उरेल राख टिळ्याला ।
Sanjay R.



प्रेम

प्रेमाची तर एकच भाषा
माया करते जशी आजी ।
नजरेत असे तिच्या ओढ
नि अंतरात काळजी ।

प्रेम आईचे कसे सांगू
कमी पडेल शब्द सारे ।
माया ममता फक्त दिसे
येऊ दे झंझावात वारे ।

मैत्रीतही दिसे प्रेम
शब्द लागे मनाला ।
जीव तुटतो कधी
देतो जीव जीवाला ।

तुझे माझे प्रेम असेच
सांगू मी कुणाला ।
जपून मी ठेऊ किती
कळू दे थोडे तुला ।
Sanjay R.



Wednesday, May 18, 2022

प्रेमाची परिभाषा

प्रेमाला कुठे भाषा
नसते कुठली दिशा ।
मनात एकच आशा
प्रेमाची हीच परिभाषा ।
कधी होते निराशा
मग वाईट किती दशा ।
Sanjay R.


Tuesday, May 17, 2022

हलकीच एक झलक

बघून साधी झलक
म्हणतात प्रेम होतं ।
रोज रोज बघून मग
सांगा प्रेम कुठे जातं ।

हलकीच एक झलक
क्षणात टिपते नजर ।
आठवण मात्र येताच
चित्र डोळ्यापुढे हजर ।
Sanjay R.



बघतो अजूनही वाट

बघायला तुझी झलक
मीही आहे आतुर ।
सांगू कसे मी तुला 
ओठच होतात फितूर ।

नजरा नजर झाली जेव्हा
मनाने टिपलं सारे ।
आजही आठवण होताच
अंतरात वाहतात वारे ।

क्षणाचीच  ती गाठ
होतीच कुठे ती भेट ।
ओढ लागली मनाला
बघतो अजूनही वाट ।
Sanjay R.

झलक

बघून झलक मी एकदा
वेडा असा हा झालो ।
तुझ्याविना तर आता
जगणेच विसरून गेलो ।

सूर्य नसताना जसे
वाटतो अंधार दाटला ।
एकट्यानेच का असा
दिवसाच संसार थाटला ।

चन्द्र असतो रात्रीस
सोबत चांदण्या किती ।
का लोपते तेज सारे
जणू सुर्याचीच असे भीती ।
Sanjay R.

Monday, May 16, 2022

नको डोक्यावरती भार

नको तो विचार
डोक्यावरती भार ।
शांततेने जगा
हाच एक सार ।

तापतो किती सूर्य 
पाणी हवे गार ।
होतो गळा थंड
गर्मी वरती प्रहार ।

कधी तापते डोके
होतो विचित्र आचार ।
सवयीचा तो गुलाम
नेमका होतो लाचार ।

हवी थोडी शांती
नको कुठले विचार ।
आनंदाची शिदोरी
उत्साहाचा संचार ।
Sanjay R.

भारत महान

जुनी किती ही संस्कृती
वाटावा कुणासही अभिमान ।
प्रत्येक जण पाळायचा
प्रत्येकाचाच सन्मान ।
जाती धर्म पंथ अनेक
हीच या देशाची शान ।
राजकारणाने केला घात
दिसे आता फक्त अज्ञान ।
लोभ मोह द्वेष पसरला
कोण मोठा कोण लहान ।
निघा एकदा बाहेर यातून
नका करू असा अपमान ।
देशासाठी जगू मरू या
सारेच म्हणू भारत महान ।
Sanjay R.


Sunday, May 15, 2022

दोष कुणाचा

नाही दोष कुणाचा
उपाय हा गुणांचा ।
बसायचे चूप चाप
अंतच लागेना मनाचा ।
घडते सुरळीत सारे
लागेना वेळ क्षणाचा ।
लोभ तर वाईटच
 असेना तो धनाचा ।
विचार स्वतःचाच नको
करा थोडा जनाचा ।
मिळेल सुख त्यातच
नको क्लेश अहंपणाचा ।
Sanjay R.

लग्न

कहाणी झाली पाहणी झाली
जुळले एकदाचे लग्न ।
मुलगा मुलगी झाले मग
स्वप्न पाहण्यात मग्न ।

बाप लागला मग कामाला
दागिने कपडे नवऱ्याला मुंदी
हॉल वाजंत्री काय काय हवे
जेवणात ठेवू म्हणे बुंदी ।

दिवसामागून लोटले दिवस
पत्रिकाही झाल्या आता वाटून ।
लग्नाच्या दिवशी नवरा नवरी
आले मांडवात नटून थटून ।

आली लग्न घटी म्हणता
उधळल्या साऱ्या अक्षदा ।
ब्यांडवाला तयार होता
बडवू लागला बदा बदा ।

लग्न लागले पंगती उठल्या
नवरा नवरी होते खुशीत ।
लेक निघाली सासरला मग
होते सगळेच आसवे पुसीत ।
Sanjay R.


शब्दही जड झाले

सुचेना काहीच मला
आज शब्दही जड झाले ।
बघून वाट मी थकलो
मन अंतरात जाऊन आले ।

आठवणींचा गुंता तेथे
काय त्यातून घेऊन आलो ।
मनच मग सांगून गेले
दूर तर मी तेव्हाच झालो ।

कोण मी कुठला कसा
मनात थोडा दुःखी झालो ।
खोटे खोटे का हसतो
पोरका मी तेव्हाच झालो ।
Sanjay R.


मैत्री

वाहत्या पाण्याची
कशी संथ धार ।
तुझ्या माझ्या मैत्रीचा
अगदी तसाच सार ।

नाव निघाली मैत्रीची
तिला मैत्रीचा आधार ।
दूर असूनही वाटे
जवळ किती तो पार ।

जुळवल्यानी जुळतात
असू दे वेगळे विचार ।
मित्र दिसताच मात्र
होतो मैत्रीचा संचार ।
Sanjay R.


उन्हाची झळ

का तापतो सूर्य असा
आगीचा तो गोळा जसा ।
पाण्यासाठी व्याकुळ सारे
जीव झाला वेडा पिसा ।
दूर दसते ते मृगजळ
दूर किती जाऊ कसा ।
शोधतो सावली जराशी
वृक्षतोडीचा घेऊन वसा ।
Sanjay R.


सांगू मी कुणास

सांगू मी कुणास
काय किती मनात ।
सुखाचा करतो शोध
गुरफटतो दुःखात ।
बोचती काटे किती
आठवणींच्या वाटेत ।
धडपड चाले सारी
डुबनाऱ्या लाटेत ।
धरतो प्रकाशाची वाट
अंधार मात्र डोळ्यात ।
Sanjay R.


पाऊलवाट

नसेल खिश्यात पैसा एक
विचार मात्र मनात नेक ।
बोलतो जे मी तेच करतो
नाही कुठली फेका फेक ।
लोभ नाही मोह नाही
मत्सर माया ना अतिरेक ।
असेल त्यातच होतो खुश
जपून टाकतो पाऊल प्रत्येक ।
Sanjay R.

Saturday, May 14, 2022

दिवा

घेऊन छोटीशी वात
जळतो जेव्हा दिवा ।
जातो अंधार कुठे
सुर्यालाही वाटे हेवा ।

रात्र होताच येतो
अंधार किती काळा ।
गगनात चमकते चांदणी
जणू चंद्राचा तो मळा ।

अंधारात दिसेना काही
पुरे दिव्याची एक ज्योत ।
टाके उजळून सारे
होऊन प्रकाशाचा स्रोत ।
Sanjay R.


Friday, May 13, 2022

माझे प्रकाशित कथा आणि काव्य संग्रह

मित्रांनो माझे कथा आणि काव्य संग्रह आता आपणाकरिता आमेझॉन आणि फ्लिप कार्ट वर उपलब्ध आहेत. नक्की वाचा 

https://www.amazon.in/s?i=stripbooks&bbn=976389031&rh=p_27%3ASanjay+Ronghe%2Cp_n_availability%3A1318484031&dc&qid=1652444560&rnid=1318483031&ref=is_r_p_n_availability_2

आरसा

कशाला हवा आरसा
 रूप हे नाही सुंदर ।
मन थोडे बघा वाचून
कळेल मग किती अंतर ।

मीच मला बघतो जेव्हा
का असा हा पडतो पेच ।
आरशाला नका विचारू
दाखवील तो आहे तेच ।

नाही खळी या गालावरती
भाव शून्य दिसे डोळ्यात ।
शब्द अजूनही तिथेच थांबून
आहे बसले रुतून गळ्यात ।
Sanjay R.

परिचारिका

दवाखाना म्हटले की 
तूच तर येतेस समोर ।
डॉक्टर नंतर आम्हास
फक्त तूच असतेस थोर ।

कडू कडू ते औषध किती
तुझ्या हाताने होते गोड ।
सेवाभावी तुझे कार्य
त्यास नाही कशाची तोड ।

परिचारिका म्हणून वावरते
आजाऱ्याला होतो आधार ।
मन लावून तू करतेस सेवा
नसतो स्वतः चाही विचार ।

नमन तुझ्या समर्पणास
मायेचा होतो आभास ।
दुर्धर क्षणात तुझाच विश्वास
तूच देतेस जगण्याची आस ।
Sanjay R.

Thursday, May 12, 2022

ओळख तू धोका

सांभाळ तू जरा
आहे पुढे धोका ।
नको समजू तू
मिळालाय मोका ।

दिसते तसे नसते
म्हणून जग फसते ।
दुःख या जीवनाचे
भोगायचेच असते ।

निर्धार तू नको सोडू
यश हातात आहे  ।
नको बघुस मागे
पुढेच जायचे आहे ।
Sanjay R.


Wednesday, May 11, 2022

ऊन

उन्हात शोधतो सावली
कुठेच झाड दिसेना ।
पाखरं मग गेलीत कुठे
शांतता ही सहवेना ।
Sanjay R.

वाढदिवस

स्वतःची एक आठवण
आनंदाचे थोडे क्षण ।
शुभेच्छांचा होतो वर्षाव
उत्साही मग होते मन ।
घालूनिया नवीन कपडे
करून घ्यायचे औक्षवन ।
गोड धोंड नाच गाणे
करू सारे केक कापून ।
वाढदिवसाची मौज मजा
आठवायचे ते बालपण ।
Sanjay R.


Tuesday, May 10, 2022

जिंकले मन माझे

जिंकले मन माझे
तुज म्हणते राजा ।
मनात चमचमल्या
तुज बघताच विजा ।
डोळ्यात दिसली ओढ
जडला जीव माझा ।
बघ एकदा तू वळून
देऊ नकोस मज सजा ।
Sanjay R.

Monday, May 9, 2022

श्रीमंत

पैसा पैसा करतो कसा
म्हणून झोप येत नाही ।
असून पैसा खिशात जरी
खर्चही तू का करत नाही ।
बघ एकदा खर्च करून
असाच तो रे सरत नाही ।
लोभ सारा सोडून तू
आनंदात का रे जगत नाही ।
जगायला जरी हवा पैसा
पण जगणेच तर कळत नाही ।
सोड मोह तू या पैशाचा
होशील श्रीमंत पण गरीब नाही ।
Sanjay R.

Saturday, May 7, 2022

नवीन संधी

एक किरण आशेचे
बघतो त्यात मी संधी ।
नशिबाचा फेर सारा
काय कशाची येईल धुंदी ।
हवे ते मी शोधतो जेव्हा
कळते त्यावर आहे बंदी ।
आज बाजार भरला नाही
कळून चुकले आहे मंदी ।
Sanjay R.

Friday, May 6, 2022

विश्वास

मनात नको तो आहे ध्यास
करू कुणावर सांगा विश्वास ।
खोटी ही दुनिया सारीच
खडतर किती जीवन प्रवास ।

मित्र असो वा असो कोणी
म्हणू कुणा मी माझा खास ।
गोड बोलुनी गळा कापती
सारेच इथे फसवे आभास ।

लोभी भोगी काही कळेना
हिसकून घेती हातचा घास ।
पर्वा कुणाची नाही कुणाला
ठिकठिकाणी आहेत फास ।

लोभ मोह मत्सर माया
प्रत्येकासी तोच हव्यास ।
माझे मलाच नकळे काही 
घेऊ कसा मी माझाच श्वास ।
Sanjay R.

Tuesday, May 3, 2022

मतभेद

विचार नसेल सारखे
मतभेद तर होणार ।
घ्यायचे जुळवून थोडे
वाद नाही उरणार  ।
आचार प्रत्येकाचे वेगळे
सारखे कसे असणार ।
विचारांना हवी दिशा
मार्ग त्यातून निघणार ।
एक पाऊल पुढे कोणी
माघार कोण मग घेणार ।
जुळवून थोडे जाऊ पुढे
संकट असेच सरणार ।
Sanjay R.