Saturday, November 11, 2023

नोव्हेंबर 2023 कविता प्रकाशित

माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या नोव्हेंबर 2023 च्या मासिक अंकात माझी   रोजच इथे दिवाळी कविता प्रकाशित झाली.
संपादकांचे मनापासून आभार.

Friday, November 10, 2023

लाडकी परी

मोठी झालीस तू जरी
बाबांचीच लाडकी परी ।
कौतुक तुझे मनात किती
तुलाच शोधतो भिरभीरी ।

लहानपण आठवते अजून
हट्टी स्वभाव होता भारी ।
हवे म्हणजे ते हवेच तुला
रूसून बसायची पुढच्या दारी ।

खोटे खोटेच तू रडायची
बोलताच कुणी काही तरी ।
आईस्क्रीम बघताच मात्र कशी
क्षणात खुश व्हायची स्वारी ।

किती आता बदललीय तू
शांत स्वभाव नी परोपकारी ।
प्रत्येक गोष्टीचा विचार मनात
पेलतेस सारीच जवाबदारी ।
Sanjay R.



Sunday, October 15, 2023

ऑक्टोंबर 2023 कविता प्रकाशित

माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या ऑक्टोबर 2023 च्या मासिक अंकात माझी   कविता प्रकाशित झाली.
संपादकांचे मनापासून आभार.

Monday, October 9, 2023

काव काव

काव काव

पोटात होताच काव काव
घेतो स्वैपाक घरात धाव ।
जडवले घडवले ज्यांनी
विसरलो ना त्यांचेही नाव ।

म्हातारे म्हणून लोटले दूर
घरात त्यांचा नव्हता भाव ।
आता परंपरेच्या नावाखाली
करतो आठवण नाही डाव ।

येरे ये तू कावळ्या आता
सांग निरोप घेऊन धाव ।
चूक झाली आमची तेव्हा
पितरांमुळेच आमचा ठाव ।

संजय रोंघे

Friday, October 6, 2023

स्त्रीशक्ती

नवीन एक स्तंभ
नवीनच आरंभ ।
स्त्री ची भागीदारी
राजकारण अगडबंब ।

कुणास ते पसंत
मनी कुणाच्या खंत ।
वारा तर वाहतो
पण किती संथ ।

होऊ दे एकदाचे
रणांगणात बंड ।
नाही येणार मागे
वाट ही अखंड ।

असू दे पायरी
काढतील त्या धिंड ।
शिखरावर दिसेल
स्त्री शक्तीचा दंड ।
Sanjay R.


Thursday, October 5, 2023

प्रवासी

जीवनाची गाडी
जन्म ते मृत्यू ।
आरंभ ते अंत
दोन टोकाचे स्टेशन ।

मधे अनेक थांबे
आपण फक्त बघायचं ।
कुठे थांबायचं
कुठे निघून जायचं  ।

मार्गात प्रवासी अनेक
उतरणारे चढणारे ।
जीवाच्या आकांताने
फक्त जगणारे ।

कुणी हसरा
कुणी लाजरा  ।
रडकाही वाटतो
कधी कधी साजरा ।

सुख आणि दुःख
त्यात विरोधाभास ।
चालायचंच हे

थांबे वरी श्वास ।
Sanjay R.


Tuesday, October 3, 2023

गांधी

विचार तुमचे अहिंसेचे
पाठ गिरवू स्वावलंबनाचे ।
बापू तुम्ही थोर किती
महत्व सांगितले स्वच्छतेचे ।

हाल अपेष्टा आत्यचार
शासन तेव्हा इंग्रजांचे ।
स्वाभिमान नव्हता उरला
भवितव्य होते धोक्याचे ।

लढा पुकारला तुम्हीच तेव्हा
फेकले शासन परक्यांचे ।
दिले स्वातंत्र्य तुम्हीच आम्हा
मार्ग दाखवले जगण्याचे ।

महात्मा म्हणू की पितामह
आभार आम्हा सगळ्यांचे ।
करतो नमन शतवार आता
प्रभाव सारे विचारांचे ।
Sanjay R.


Saturday, September 30, 2023

तुला कळत नाही

कळते मज सारे
मन वळत नाही ।
ध्यास तुझा लागला
नेत्रही ढळत नाही ।

सदा घेतो मागोवा
पाय पळत नाही ।
कुठे कशी ग तू
तुला ही कळत नाही ।

थांब जराशी आता
मीही छळत नाही ।
तुझ्या विना कसा मी
हृदय ही जळत नाही ।
Sanjay R.


तुला कळणार नाही

हृदयाची माझ्या व्यथा
का तुला कळणार नाही ।
जीवात जीव नसतो
मनाचे तर कळतच नाही ।

अजूनही आस मनाला
नजर शोधते दिशा दाही ।
कधी संपेल हा अबोला
सांगशील का तू मज काही ।

आठवणीच करतो ताज्या
शब्दांना का अर्थ नाही ।
आता वेदना मी सांगू कुणा
कळेल तुज यात स्वार्थ नाही ।
Sanjay R.


Thursday, September 28, 2023

उनाड किती हा वारा

उडे केस भरभरा
उनाड किती हा वारा ।
सावरू कसे मी मज
पदर थांबेना जरा ।

का छळतोस सारखा
कुठला रे हा इशारा ।
वरून थेंब पडती
आल्या पावसाच्या धारा ।

अंगही हे झाले ओले
फुलला मनी पिसारा ।
थांबना तू रे जरासा
देई स्पर्श ही शहारा ।

संगे तुझ्या मी नाचते
टाक तोडून पहारा ।
झाले तुझीच आज मी
दे मजसी तू सहारा ।
Sanjay R.


चला घेऊ या निरोप आता

*" चला घेऊ या निरोप आता "* 

चला घेऊ या निरोप आता
नमन माझे हे जाता जाता ।
सरले दिवस दहा कसे ते
नाही कळाले पाहता पाहता ।

आनंद मनी भक्तीचा भाव
रोज आरती गाता गाता ।
विसर्जनाची वेळ ही आली
मोदक तुमचे खाता खाता ।

चला घेऊ या निरोप आता
नमन माझे हे जाता जाता ।
याल तुम्ही परत एकदा
वाटेवरती हे डोळे आता  ।

संजय रोंघे
नागपूर

Saturday, September 16, 2023

सप्टेंबर 2023 कविता प्रकाशित

माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या सप्टेंबर 2023 च्या मासिक अंकात माझी   कविता सण बैलांचा पोळा प्रकाशित झाली.
संपादकांचे मनापासून आभार.

Wednesday, September 6, 2023

गुरू ज्ञानाचा सागर

' गुरू ज्ञानाचा सागर '

जडलो जो घडलो मी
झालो कसा हो ज्ञानी ।
गुरुजी तुमचीच कृपा
बनवले मज स्वाभिमानी ।

शब्दांची हो दिली ओळख
झाली मधुर आमची वाणी ।
गुरुजींचाच हात पाठीवर
नव्हते मागे तेव्हा कोणी ।

ज्ञानाचाही तुम्हीच सागर
थेंब थेंब पाजले पाणी ।
आहोत जे आता आम्ही
विसरू कशी ती कहाणी ।

ओढ असायची शाळेची
आठवण तुमची क्षणोक्षणी ।
गृहापाठाची शिक्षा तुमची
अनोख्याच त्या आठवणी ।

गुरू विना तर सारेच व्यर्थ
अज्ञानी तो काय जाणी ।
शतवार मी नमन करतो
आजन्म हो तुमचाच ऋणी ।

संजय रोंघे
मोबाईल - 8380074730


Thursday, August 31, 2023

सरिंना आलंय उधाण

माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या ऑगस्ट 2023 च्या मासिक अंकात माझी सरींना आलंय उधाण ; कविता प्रकाशित झाली.संपादकांचे मनापासून आभार.


Wednesday, August 30, 2023

रक्षा बंधन

        गेल्या आठ दिवसांपासून तिची धावपळ सुरू होती. घराची साफसफाई, सामानाची ठेवरेव, प्रत्येक गोष्ट ती स्वतः झटून करत होती. जसजसे दिवस उलटत होते. तिची धावपळ तसतशी वाढत होती. पण त्या साऱ्या कष्टात मात्र खूप आनंद झळकत होतो. आनंदाला कारण ही तसेच होते.

      आज पासून बरोबर सात दिवस अगोदर सायंकाळी तिचा फोन वाजला. तिने फोन उचलला आणि ती जसजशी बोलत गेली तसतसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. फोन संपला आणि चेहऱ्यावर आनंद पसरला.

        नवऱ्याने सहजच विचारले, कुणाचा फोन होता ? तशी ती म्हणाली तुम्हाला काय करायचे. होता कुणाचातरी, असे बोलून ती आपला आनंद लपविण्याचा प्रयत्न करू पाहत होती.
पण तो प्रयत्नही तिला स्वस्थ बसू देत नव्हता.
मग स्वतःच सांगायला लागली, माझ्या भावाचा फोन होता. तो रक्षा बंधन साठी येणार आहे. हे सांगताना तिचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता.
चला आता मला खूप कामं आहेत. तुम्ही आपले काम करा मला माझे काम करू द्या. असे म्हणून ती आपल्यातच हरवून गेली.

     तिच्या डोळ्यापुढे तिच्या बालपणापासूनचा संपूर्ण चित्रपट आठवून गेला. ती आपल्या भावांची लाडकी बहिण होती. पण लग्नानंतर येका घरात राहणारे ते सगळे भाऊ बहीण आई बाबा आता एकमेकांपासून दूर झाले होते. प्रत्येकजण आपापल्या कामात संसारात व्यस्त झाले होते. कधी काही कौटुंबिक विशेष कार्यक्रमात आणि रक्षा बंधन व भाऊबीजेला ते एकत्र यायचे. या वर्षात विशेष असा कुठलाच कार्यक्रम आला नव्हता. त्यामुळे यंदा भेट आशी झालीच नव्हती. आता रक्षा बंधनला भाऊच स्वतः घरी येतो म्हणाला तर तो तर तिच्या साठी उत्साहाचा दिवस होणार होता.

       आणि खरेच आहे बहिणीला भावाचा फोन म्हणजे तिच्यासाठी ती आनंदाची पर्वणीच असते. तर भावा बहिणीची भेट म्हणजे आनंद आणि उत्साहाचा मेळ असतो.

       जसजसे दिवस उलटत होते. तिची धावपळ वाढत होती आणि तिचा आनंद द्विगुणित होत होता. ती सहजच बोलून जायची माझ्या भावाला पुरण पोळी खूप आवडते यावेळी मी त्याच्या साठी पुरण पोळी करणार. राखी बांधल्या वर त्याचे तोंड गोड करायला ओल्या नारळाची बर्फी करणार. सगळे प्लान मनातल्या मनात ठरत होते. रक्षा बंधनाच्या दोन दिवस अगोदरच तिने सगळ्या लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव केली. आधल्या दिवशीच तिने पुरण पोळी साठी पुरण शिजवून तयारी करून ठेवली. ओले नारळ फोडून, सोलून, किस करून त्याची बर्फी करून ठेवली. परत तिच्या मनात बासुंदी करायचे आले कारण भावाला बासुंदी आवडत होती. तर दूध आणून तेही आटायला ठेवले. उद्याच्या जेवणात काय काय मेनू ठेवायचे त्याची सगळी तयारी करून ठेवली. इतक्या धावपळीत ती पूर्ण पणे थकून गेली होती. पण चेहऱ्यावरचा आनंद मात्र अजूनही तसाच ओसंडून वाहत होता.

       दिवसभराच्या कामात ती इतकी व्यस्त झाली होती की तिला बाकी कशात लक्ष घालण्यास सवडच मिळाली नाही. अशातच रात्र झाली.

      तिला आता प्रश्न पडला की भाऊ सकाळी केव्हा येणार की तो दुपारी येणार. त्यासाठी उद्या लवकर स्वैपाक करायला लागावे लागेल.  तेव्हा तो केव्हा पोचणार हे माहिती करून घेणे गरजेचे होते. नाहीतर परत उद्या धावपळ व्हायला नको.

       आता उद्या भाऊ केव्हा पोचणार हा विचार तिला अस्वस्थ करू लागला होता. आठ दिवसांपासून भावाचाही फोन आला नव्हता, आणि तिनेही त्याला फोन केला नव्हता. त्यामुळे तो केव्हा पोचणार हे निश्चित नव्हते. तिच्या डोक्यात आता तोच प्रश्न वारंवार डोकावून जात होता.

     बराच वेळ ती तशीच बसून राहिली.आता मात्र तिला रहवले नाही , आणि तिने हातात फोन घेतला. रिंग वाजत होती. पण रिसिव्ह होत नव्हता. तिने पाच मिनिट वाट बघितली. परत ती अस्वस्थ झाली. परत फोन लावला. यावेळी मात्र भावाने फोन उचलला.

       हिने काही बोलायच्या अगोदरच भाऊच बोलला, उद्या सकाळी मी यायचे बोललो होतो पण  एका महत्वाच्या कार्या मुळे माझे उद्याला येणे होणार नाही. मी तुला आता फोन करणारच होतो. नंतर कधी तरी वेळ काढून मी नक्की येईल. तू काळजी करू नको.

     त्याचे ते बोलणे ऐकून ती स्तब्ध झाली. काय बोलावे काहीच सुचत नव्हते.   ती तशीच शांतपणे त्याचे बोलणे ऐकत राहिली. आता फोन बंद झाला होता. तिचा उत्साह पुरता मावळला होता. केलेली सगळी तयारी वाया गेली होती. पण हे सारे काही क्षणासाठी होते.

       तिने परत आपला उत्साह जागृत केला. मनात काही ठरवले, नावर्याला सकाळी लवकर उठायचे आहे असे सांगून शांतपणे झोपी गेली.

      आज रक्षा बंधन चा दिवस, ती पहाटेच उठून अंघोळ वगैरे करून तयार झाली. नवऱ्याला ही तयार व्हायला लावले. पूजेची तयारी केली.
आणून ठेवलेल्या राख्या काढल्या. एक राखी कृष्णाच्या मूर्तीला अर्पित केली आणि दुसरी आपल्या नवाऱ्याच्या हातावर बांधली.

       आणि अगदी सहजपणे बोलून गेली, माझा कृष्णच माझा भाऊ आहे.......

Sanjay Ronghe
Mobile - 8380074730


Saturday, July 29, 2023

कविता प्रकाशित

माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या जुलै 2023 च्या मासिक अंकात माझी   कविता प्रकाशित झाली.
संपादकांचे मनापासून आभार.


Thursday, July 20, 2023

स्वर्ग नरक

सत्कार्याचे फळ मिळेल
असेल तो स्वर्ग ।
दुष्कार्य असेल ज्यांचे
मिळेल त्यासी नरक ।

स्वर्ग म्हणजे काय तर
ते आहे आनंदाचे द्वार ।
दुःख कष्ट मिळे जिथे
तो तर नर्काचा विहार ।

चाला करू या सारे
सत्याचा आचार  ।
नको नको जीवनात
दुषप्रवृत्तीचा विचार ।
Sanjay R.


तू आहेस कोण

तू आहेस कोण
मी वाहता वारा ।
आहेस तु कोण
मी मोर पिसारा ।

आहेस तु कोण
मी बरसत्या धारा ।
गरजतो आकाशात
पडतो होऊन गारा ।

आहेस तु कोण
भासतो मी पसारा ।
सागराच्या पाण्यास
टाकतो करून खारा ।

आहेस तु कोण
मी पहाटेचा नजारा ।
सायंकाळ होते जेव्हा
जातो देऊन इशारा ।

आहेस तु कोण
मीच अंधार सारा ।
दिवसाच्या उजेडात
नसतो मीही तारा ।
Sanjay R.


सांग तू मजसी

सांग तू मजसी
काय मनात आहे ।
थांग लागे ना पत्ता
मन कशात आहे ।

लावू नको तू जीव
प्रेम अवघड आहे ।
काळीज नको बघू
तिथे तर दगड आहे ।

गेली कुठे ती ममता
लेकरू चतुर आहे ।
गेले उडून आकाशी
पिंजरा खाली आहे ।
Sanjay R.


मनात काय माझ्या

मनात काय माझ्या
तुज सांगू मी कसे ।
मिटतो डोळे जेव्हा
का फक्त तूच दिसे ।

आभास होतो तुझा
पण तू तिथे नसे ।
बदलले वागणे माझे
अंतरातही तूच वसे ।

वागणे विचित्र झाले
कळते मलाही हसे ।
शोधतो तुलाच आता
झाले मन निराश जसे ।
Sanjay R.


नको कुठला बंध

नको कुठला बंध
नको कुठला गंध ।

सारेच त्यात धुंद
नी मन होते धुंद ।

कळणेच कठीण
कुणास कशाचा छंद ।

त्यातच ते होतात
नकळत अंध ।

आणि डोके त्यांचे
होते हो  कसे मंद ।

माझ्याही डोक्यात
चालले तेच द्वंद ।
Sanjay R.


Friday, July 7, 2023

मनाचा बंध

मनाच्या या बंधात
दिसे प्रेमाचेच नाते ।
भावना जाती जुळून
प्रेम तिथेच फुलते ।

प्रेमाला कशाचा वेळ
नाही फुलण्याचा काळ ।
क्षणात येते फुलून
घेऊन आनंदाची माळ ।

मन घेते मग झोके
अंतरात होते सकाळ ।
बहरते जेव्हा सारे
असते तीच सायंकाळ ।
Sanjay R.


बंध

गुलाब फुलतो काट्यात
अतूट किती हा बंध ।
मोगरा असतो बाजूला
दरवळतो सुगंध ।
Sanjay R.


उरतो तुझाच विचार

नाही खिडकी तिथे
नाही कुठले दार ।
बंद सारेच कुलपात
आत झेलतो प्रहार ।

अंतरात ठेवले सारे
काय किती विचार ।
आठवण येते कधी
लागते डोळ्यांना धार ।

चालेना डोके मग
वाटतो सारा भार ।
चेहरा येतो पुढ्यात
मन होते मग सतार ।

बघतो वर आकाश
नभात दिसतो आकार ।
जातो विसरून सारे
उरतो तुझाच विचार ।
Sanjay R.


एक दार मनातले

एक दार मनातले
सदाच असते बंद ।
जपून ठेवले तिथे
क्षण जीवनाचे धुंद ।

उमळती कळ्या तेव्हा
 दरवळतो सुगंध ।
चांदण्यांच्या अंगणात
चंद्र प्रकाशही  मंद ।

शब्दांचाच खेळ इथे
चाले तोही ऐक छंद ।
होती प्रगट विचार
तोडूनीया सारे बंध ।
Sanjay R.


पडली आता भिंत

तुझ्या माझ्यातली
पडली आता भिंत ।
परत पडू ना प्रेमात
नकोच आता खंत ।

निरभ्र इथे आकाश
दिसते खुल खुल ।
खूप आवडली मला
तू पाठवलेली फुलं ।

आठवते अजूनही
तुझं गोड हसण  ।
फुगवून थोडे गाल
सहजच रुसण ।

डोळ्यात तुझ्या
आहे काय जादू ।
हवे हवे वाटते
ओठातले मधू ।
Sanjay R.


अवकाळी पाऊस

असा कसा हा उन्हाळा
पाऊस घेऊन आला ।
रोज पडतो दना दन
ऊन पाऊस झाला ।

आकाशात गरजती ढग
वीज वाऱ्याचा हो काला ।
पडले उन्मळून झाड
भरभरून वाहतो नाला ।

अवकाळी हा पाऊस
सांगा उन्हाळा कुठे गेला ।
दिसेना आकाशात सूर्य
शोधा चोरून कोणी नेला ।

तापेना धरा आता
करू काय हा शेला ।
थंडी वाजते पहाटे
विळला मातीचा हो ढेला ।
Sanjay R.


जादुई जंगल

जंगल म्हणजे तर जादूच
पक्षांचे गोड आवाज तिथे ।
घनदाट झाडातून डोकावतो
कधी कधी दिसतो सूर्य जिथे ।
अचानक कधी समोर जनावर
ससा मोर हरीण त्यांचे घर तिथे ।
वाहे खळखळ पाण्याचा झरा
भेटते वाहणारी नदीही जिथे ।
दरदरून फुटतो घाम कधी तर
क्षणात मिळतो आनंद तिथे ।
Sanjay R.


ड्रॅगन चा अंत

डाईनासोर झाले नष्ट
म्हणे तो ड्रॅगन शेवटचा ।
माणसाहून कोण क्रूर
जीव घेतो माणसाचा ।

माणुसकी तर सरली
अंत झाला मनाचा ।
युद्धाचेच वादळ इथे
विनाश आता जगाचा ।

कोण हो तो जेलेस्की
कोण तो पुतीन ।
बायडेन कुठला कोण
जग हे त्यांच्या अधीन ।
Sanjay R.


ड्रॅगन

डोक्यात प्रश्न
कोण हा ड्रॅगन ।
चीनचा सम्राट
आठवा एक क्षण ।
अक्राळ विक्राळ रूप
नाही त्याला मन ।
अत्याचारी तो किती
हवे त्याला धन ।
जगावर हवे राज्य
मजवतोय रण ।
कुणाचा काय भरोसा
प्रतीद्वांदी प्रत्येक जण ।
Sanjay R.


आयुष्याच्या खिडकीतून

आयुष्याच्या खिडकीतून
बघतो मी जेव्हा ।
सुख दुःखाच्या वाटा तिथे
घडते काय केव्हा ।
Sanjay R.


प्रतिशोध

कशास हवा प्रतिशोध
मिळेल का त्यातून बोध ।
जगा आणि जगू द्या
करू नका हो विरोध ।
Sanjay R.


मन

मनातले कळणे
आहे किती कठीण ।
व्हायचे तेच घडते
नियती पुढे सारे क्षीण ।
Sanjay R.


Thursday, July 6, 2023

एक नवे वळण

जीवनात किती वळणे
आभास जणू हा स्वर्ग ।
प्रत्येक वळणावर कसा
बदलतो आयुष्याचा मार्ग ।

सुखाच्या वाटेवर काटे
दुःखाचे कुठे तिथे तोटे ।
पाऊल टाकायचे जपून
कळेना काय कुठे भेटे ।

स्वार्थ येतो आडवा
वाटे सारेच मज हवे ।
अचानक सरतो प्रवास
तिथे वळण एक नवे ।
Sanjay R.


आयुष्याच्या वळणावर

आयुष्याच्या या वळणावर...
आकाशात सूर्यास्ताची लाली...
सूर्याची मावळतीकडे वाटचाल...
पक्षांचे घरट्याकडे परतणे...
माणसांना घरी जाण्याची घाई...
जो तो आपल्या वाटेवर....
कपाळावर कुणाच्या चिंता...
चेहरा कुणाचा दिसे हसरा...
प्रत्यकाला ओढ घराची....
कोणीतरी दारात वाट बघतय...
बस तीच ओढ तीच आस...
सगळेच आम्ही जगतोय...
ही रात्र सरताच परत सकाळ...
सूर्याची किरणे घेऊन येईल...
नवीन आशा नव्या दिशा.....
Sanjay R.


Friday, June 16, 2023

कविता प्रकाशित जुन 2023

माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या जुन 2023 च्या मासिक अंकात माझी  कविता प्रकाशित झाली.
संपादकांचे मनापासून आभार.



Friday, May 5, 2023

चालाना येऊ फिरून

मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या माझे व्यासपीठ या मे 2023 च्या मासिक अंकात माझी "चाला ना येऊ फिरून" ही कविता प्रकाशित झाली. संपादकांचे खूप खूप आभार .

Thursday, April 27, 2023

अंतरात उठले वादळ

नजरेत तुझ्या  ग
होता कुठला इशारा ।
साद देऊन गेला 
मज हळूच तो वारा ।
Sanjay R.

थेंब दोन डोळ्यात

मनात जे जे आहे
व्यक्त होते डोळ्यात ।
थेंब दोन त्या डोळ्यात
आणि हुंदका गळ्यात ।
Sanjay R.


हळवे मन

मन हे हळवे किती
कधी होतात वेदना ।
कधी असते शांत
चाले जणू साधना ।
Sanjay R.