Wednesday, August 30, 2023

रक्षा बंधन

        गेल्या आठ दिवसांपासून तिची धावपळ सुरू होती. घराची साफसफाई, सामानाची ठेवरेव, प्रत्येक गोष्ट ती स्वतः झटून करत होती. जसजसे दिवस उलटत होते. तिची धावपळ तसतशी वाढत होती. पण त्या साऱ्या कष्टात मात्र खूप आनंद झळकत होतो. आनंदाला कारण ही तसेच होते.

      आज पासून बरोबर सात दिवस अगोदर सायंकाळी तिचा फोन वाजला. तिने फोन उचलला आणि ती जसजशी बोलत गेली तसतसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. फोन संपला आणि चेहऱ्यावर आनंद पसरला.

        नवऱ्याने सहजच विचारले, कुणाचा फोन होता ? तशी ती म्हणाली तुम्हाला काय करायचे. होता कुणाचातरी, असे बोलून ती आपला आनंद लपविण्याचा प्रयत्न करू पाहत होती.
पण तो प्रयत्नही तिला स्वस्थ बसू देत नव्हता.
मग स्वतःच सांगायला लागली, माझ्या भावाचा फोन होता. तो रक्षा बंधन साठी येणार आहे. हे सांगताना तिचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता.
चला आता मला खूप कामं आहेत. तुम्ही आपले काम करा मला माझे काम करू द्या. असे म्हणून ती आपल्यातच हरवून गेली.

     तिच्या डोळ्यापुढे तिच्या बालपणापासूनचा संपूर्ण चित्रपट आठवून गेला. ती आपल्या भावांची लाडकी बहिण होती. पण लग्नानंतर येका घरात राहणारे ते सगळे भाऊ बहीण आई बाबा आता एकमेकांपासून दूर झाले होते. प्रत्येकजण आपापल्या कामात संसारात व्यस्त झाले होते. कधी काही कौटुंबिक विशेष कार्यक्रमात आणि रक्षा बंधन व भाऊबीजेला ते एकत्र यायचे. या वर्षात विशेष असा कुठलाच कार्यक्रम आला नव्हता. त्यामुळे यंदा भेट आशी झालीच नव्हती. आता रक्षा बंधनला भाऊच स्वतः घरी येतो म्हणाला तर तो तर तिच्या साठी उत्साहाचा दिवस होणार होता.

       आणि खरेच आहे बहिणीला भावाचा फोन म्हणजे तिच्यासाठी ती आनंदाची पर्वणीच असते. तर भावा बहिणीची भेट म्हणजे आनंद आणि उत्साहाचा मेळ असतो.

       जसजसे दिवस उलटत होते. तिची धावपळ वाढत होती आणि तिचा आनंद द्विगुणित होत होता. ती सहजच बोलून जायची माझ्या भावाला पुरण पोळी खूप आवडते यावेळी मी त्याच्या साठी पुरण पोळी करणार. राखी बांधल्या वर त्याचे तोंड गोड करायला ओल्या नारळाची बर्फी करणार. सगळे प्लान मनातल्या मनात ठरत होते. रक्षा बंधनाच्या दोन दिवस अगोदरच तिने सगळ्या लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव केली. आधल्या दिवशीच तिने पुरण पोळी साठी पुरण शिजवून तयारी करून ठेवली. ओले नारळ फोडून, सोलून, किस करून त्याची बर्फी करून ठेवली. परत तिच्या मनात बासुंदी करायचे आले कारण भावाला बासुंदी आवडत होती. तर दूध आणून तेही आटायला ठेवले. उद्याच्या जेवणात काय काय मेनू ठेवायचे त्याची सगळी तयारी करून ठेवली. इतक्या धावपळीत ती पूर्ण पणे थकून गेली होती. पण चेहऱ्यावरचा आनंद मात्र अजूनही तसाच ओसंडून वाहत होता.

       दिवसभराच्या कामात ती इतकी व्यस्त झाली होती की तिला बाकी कशात लक्ष घालण्यास सवडच मिळाली नाही. अशातच रात्र झाली.

      तिला आता प्रश्न पडला की भाऊ सकाळी केव्हा येणार की तो दुपारी येणार. त्यासाठी उद्या लवकर स्वैपाक करायला लागावे लागेल.  तेव्हा तो केव्हा पोचणार हे माहिती करून घेणे गरजेचे होते. नाहीतर परत उद्या धावपळ व्हायला नको.

       आता उद्या भाऊ केव्हा पोचणार हा विचार तिला अस्वस्थ करू लागला होता. आठ दिवसांपासून भावाचाही फोन आला नव्हता, आणि तिनेही त्याला फोन केला नव्हता. त्यामुळे तो केव्हा पोचणार हे निश्चित नव्हते. तिच्या डोक्यात आता तोच प्रश्न वारंवार डोकावून जात होता.

     बराच वेळ ती तशीच बसून राहिली.आता मात्र तिला रहवले नाही , आणि तिने हातात फोन घेतला. रिंग वाजत होती. पण रिसिव्ह होत नव्हता. तिने पाच मिनिट वाट बघितली. परत ती अस्वस्थ झाली. परत फोन लावला. यावेळी मात्र भावाने फोन उचलला.

       हिने काही बोलायच्या अगोदरच भाऊच बोलला, उद्या सकाळी मी यायचे बोललो होतो पण  एका महत्वाच्या कार्या मुळे माझे उद्याला येणे होणार नाही. मी तुला आता फोन करणारच होतो. नंतर कधी तरी वेळ काढून मी नक्की येईल. तू काळजी करू नको.

     त्याचे ते बोलणे ऐकून ती स्तब्ध झाली. काय बोलावे काहीच सुचत नव्हते.   ती तशीच शांतपणे त्याचे बोलणे ऐकत राहिली. आता फोन बंद झाला होता. तिचा उत्साह पुरता मावळला होता. केलेली सगळी तयारी वाया गेली होती. पण हे सारे काही क्षणासाठी होते.

       तिने परत आपला उत्साह जागृत केला. मनात काही ठरवले, नावर्याला सकाळी लवकर उठायचे आहे असे सांगून शांतपणे झोपी गेली.

      आज रक्षा बंधन चा दिवस, ती पहाटेच उठून अंघोळ वगैरे करून तयार झाली. नवऱ्याला ही तयार व्हायला लावले. पूजेची तयारी केली.
आणून ठेवलेल्या राख्या काढल्या. एक राखी कृष्णाच्या मूर्तीला अर्पित केली आणि दुसरी आपल्या नवाऱ्याच्या हातावर बांधली.

       आणि अगदी सहजपणे बोलून गेली, माझा कृष्णच माझा भाऊ आहे.......

Sanjay Ronghe
Mobile - 8380074730


No comments: