Saturday, May 25, 2019

" पाणी पाणी करायचं कोणी "

उन्हाळा आला की सगळ्यांच्या पुढे एकच प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे पाणी . भारताच्या बहुतांश भागात पाण्याची खूप मोठी समस्या आहे .
काही भाग तर असेही आहेत कि जिथे वर्षभर पाण्याची समस्या असते . आणि जिथे पाणी आहे त्या भागात पाण्याचे नियोजन नाही, पाण्याचा अपव्यय जास्त आहे . जशे कुणालाच काही देणे घेणे नाही . या विषयाच्या मुळाशी आपण गेलो तर असे लक्षात येईल कि हि पाणी समस्या आपणच आपल्यावर ओढवून घेतलेली आहे.
पाणी समस्येचे पहिले प्रमुख कारण म्हणजे वृक्ष तोड . आपण बघतोच आहोत हळूहळू जंगल नाहीसे होत आहेत आणी ठीक ठिकाणी कारखाने, माणसांच्या वस्त्या झपाट्यानं वाढत आहेत. जंगल कमी होत असल्यानं तिथले पशु पक्षी प्राणी यांची संख्या पण कमी होत आहे. आणि मग त्यांचे अतिक्रमण माणसांच्या वस्त्यांमध्ये होत आहे .पूर्व शेतांमध्ये आंबा चिंच वाद पिंपळ जांभूळ मोह लिंब या मोठमोठया वृक्षांची लोक शेताच्या कडेने जोपासना करत. त्या मुळे शेतात वातावरण थंड राहून पाण्याची पूर्तता व्हायची , पाण्याची पातळी पण जास्त खोल नसायची. परंतु आज सगळे कडे वृक्ष तोड सुरु आहे. शेतकरी शेतातील आणि बांधावरील झाडं तोडून त्यांच्या वाहितीची जागा वाढवत आहेत. शेतातील वृक्षतोडीचे दुसरे कारण म्हणजे शेतातील झाडांवर माकडांचे कळप येऊन वस्ती करायला लागलेत आणि पिकांचं नुकसान करायला लागलेत , म्हणून शेतकरी ही झाडच कापून नष्ट करत आहेत . जंगल कमी झाल्याने तिथल्या प्राण्यांनी त्यांचा मोर्चा गावाकडे वळवला आणि शेतात घुसून आपले पोट भरू लागलेत. हयात प्रामुख्याने रोही, रान डुक्कर, हरीण, नीलगाय मोर, ससे, उंदीर आणि इतर जंगली पशु, पक्षी, प्राणी, आहेत. यामुळे सारे निसर्गाचे चक्रच बदलले दिसत आहे. नद्या, नाले, तळे, डबके सगळेच संपुष्टात आले आहेत. जंगलात पाण्याचे स्रोत सुकून गेलेत, पशु, पक्षी, प्राणी अन्न आणी पाण्याच्या शोधात गाव, शहरापर्यंत येऊन पोहोचलेत. त्यामुळे मानवाच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे.

पाणी समस्येचे दुसरे प्रमुख कारण पृथ्वीच्या तापमानातील वाढ. सूर्य आणि पृथ्वी यांच्या कक्षेतील अंतर हळू हळू कमी होत आहे त्यामुळे पृथ्वीवरील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या परिणामामुळे पृथ्वी वरील पाण्याचे बाष्पीभव होऊन पाण्याचे साठे प्रभावित होत आहेत. पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. जमिनीतील पाण्याची पातळीही खूप खोल जाऊन पोहोचली. तापमानातील वाढी मुळे लोकांचा कल हवा थंड करणाऱ्या उपकरणाच्या वापराकडे वळला. हि उपकरणे वातावरणात स्वतःची गर्मी सोडत असल्या मुळे वातावरण अजून गरम व्हायला लागले. तसेच लोकसंख्या वाढी मुळे वाहनांची संख्या वाढली. त्या मुळे वातावरण अजूनच गरम होत आहे. आणि वायूचे प्रदूषण जास्त प्रमाणात व्हायला लागले . या सर्व परिणामांमुळे निसर्गाचा असमतोल निर्माण झाला आणी पाण्याची भीषण कमतरता होऊ लागली.

पाणी समस्येचे तिसरे प्रमुख कारण म्हणजे लोकसंख्येची वाढ. जगात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून गाव आणि शहरांच्या सीमा झपाट्याने वाढत चालल्या आहेत, शेती, जंगल आणि वृक्ष कमी होत आहेत. सिमेंट कॉंक्रिट ची घरे, रस्ते मोठ्या प्रमाणात बांधली जात आहेत ज्यामुळे भूतलावरील तापमानात अजून भर पडत आहे. लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्या यासाठी कारखाने आणी उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तिथे पाण्याचा वापर वाढलेला आहे. कारखान्यात लागणाऱ्या सयंत्रांमधून निघणाऱ्या धूर, विषारी गॅसेस, सांडपाणी या मुळे परिसरातील हवा पाणी आणि जमीन प्रभावित होत आहे, प्रदूषित होत. सभोवतालचे तापमान वाढत आहे . या सर्व कारणांमुळे निसर्गाचा असमतोल निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झालं , आणि दुष्काळाचे सावट अधिक गंभीर रूप धारण करायला लागले, विहारी, नद्या, नाले, तळे आटायला लागलेत. उन्हाळ्यात तर सगळे पाण्याचे स्रोत ठण ठण व्हायला लागलेत. जमिनीतील पाण्याची पातळी अति खोलात जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्या वाढी मुले पाण्याची गरज वाढली आहे. घरोघरी विहिरी, बोअर झालेत आणि जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला. त्या मुळे जमिनीतील पाण्याची पातळी जास्तच खोल गेली. आणि सर्व सृष्टी वरील जीव जंतू प्राणी वृक्ष यांना पाण्याच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

गावात शहरात आपण बघतोच आहोत पाण्याची किती भीषण समस्या आहे. नद्या नाले विहिरी सुकून गेलेत. जमीन कितीही खोदली तरी पाण्याचा एक थेम्ब सुद्धा हाती लागत नाही. मनुष्य प्राण्यांचे स्थलांतरण होत आहे. निसर्गाच्या असमतोलपणामुळे पाऊस पाडण्याचे प्रमाण काम झाले . उन्हाळ्याचा काळ खंड वाढला आणि पाऊस थंडी चा कमी झाला. हिवाळा पण उन्हळ्यासारखाच भासायला लागला. पावसाळ्यात कुठे पाऊस बिल्कु पडत नाही आणि कुठे पडलाच तर अतिवृष्टीच्या होऊन पुराचे थैमान बघायला मिळते. गर्मी जास्त आणि पाऊस कमी या अश्या निसर्गाच्या असमतोलपणा मुळे माणसाचे जीवन फारच कठीण होऊन गेलेलं आहे. शेती व्यवसाय संपूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्या मुळे शेतामध्ये धान्याचे उत्पादन कमी झालेले आहे. शेतकरी हलाखीचे जीवन जगण्यास बाध्य झाला आहे. अन्न धान्याच्या किमती शिगेला जाऊन पोहोचल्या. भाज्यांच्या किमती नियंत्रणाच्या बाहेर गेल्या. माणसाचे जीवन अगदी खडतर झाले. याचा परिणाम संपूर्ण मनुष्य जातीला भोगावा लागत आहे.

निसर्गाचे चक्र जर असेच सुरु राहिले तर हळू हळू माणूस, प्राणी, पशु , पक्षी यातील काहीच या भूतलावर उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे. म्हणूनच म्हणतात पुढचे महायुद्ध जे होई ते पाण्यासाठी लढले जाईल आणि ते भाकीत खरे होईल असे वाटते.

या पाणी समस्यांवर वेळीच उपाय योजना करण्याची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. सरकार आपल्या परीने यावर उपाय करण्याचे प्रयत्न करीत आहेच. पण त्याला प्रत्येकाने आपला वाटा उचलण्याची गरज आहे. यासाठी नद्यांची जोडणी, पर्यावरणावर नियंत्रण , वृक्षारोपण, जंगलांचे सवंर्धन, धरण बंधारे यांचे बांधकाम, वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे जमिनीत पुनर्भरण, पाण्याचे नियोजन, पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर , वाहनांचा कमीत कमी वापर, उद्योग कारखाने यात सोलर ऊर्जेचा वापर इत्यादी अनेक उपक्रम हाती घेण्याची फार मोठी गरज आहे.

आंम्ही आजच या समस्ये विषयी सतर्क होऊन पुढची वाटचाल केली नाही तर आमच्या येणारी पिढीला फार मोठी चिंता आम्ही देऊन जाणार आहोत. तेव्हा वेळीच सावध होऊन निसर्ग, पाऊस आणि पाणी यांचे यांचे समायोजन संवर्धन करण्याची गरज आहे.

संजय रोंघे

मोबा- 8380074730




No comments: