Wednesday, September 22, 2021

नाईलाज - राणी भाग सहा

      नाईक आता आजरातून बरे झाले होते. ते आपल्या नेहमीच्या कामात लागले होते. रोज ऑफिसला जाणे घरातील, बाहेरील साऱ्या जवाबदाऱ्या पार पाडणे यात मग्न झाले होते. सगळेच व्यवस्थित सुरू होते. राणी वरही आता त्यांचे प्रेम जडले होते. राणीही त्यांच्यावर खूप प्रेम करायला लागली होती. नाईक घरात असे तोवर ती सारखी त्यांच्या मागे पुढे राहून नाईकांना खुश ठेवण्या साठी जेही करावे लागायचे ते सगळं अगदी आनंदाने खुशीने करायची. तिला तर आता नाईक ऑफिसला गेल्या नंतर सगळी कामं आटोपून नाईकांच्या आठवणी काढण्यात आनंद वाटायला लागला होता. नाईकांची परतीची वेळ झाली की ती अस्वस्थ व्हायची. सारखी नाईकांची वाट बघायची. नाईक घरी पोचे तोवर तिच्या कितीतरी चकरा अंगणात व्हायच्या. नाईक दारात दिसताच ती आनंदी व्हायची. ते येताच ती त्यांच्यासाठी चहा घेऊन जायची. चहा पिणे होईतोवर त्यांच्याकडेच बघत बसायची. सतत काही ना काही तरी बोलत रहायची. नाईकही तिच्या वर खूप खुश होते. त्यानाही राणीचा सहवास खूप आवडायचा. तेही दिवसभराच्या त्यांच्या ऑफिसमधील गोष्टी तिच्या सोबत शेअर करायचे. रात्री जेवण आटोपल्यावर मुलं झोपी गेल्यानंतर ती नाईकांच्या रुम मध्ये जाऊन नाईकांशी गप्पा गोष्टी करत नाईकांचे हात पाय, डोके दाबून द्यायची. विविध विषयांवर त्यांची चर्चा चालायची.  राणी आता सम्पूर्णतः नाईकांची अर्धांगिनी झाली होती.  दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटायचा. राणी नाईकांच्या कुशीतच मग झोपून जायची.

      असेच दिवस जात होते. दोघांमधले प्रेम दिवसागणिक अजूनच फुलत फळत होते. मुलंही आता मोठी होत होती. मात्र दोघांच्या या जवळीकीमुळे मुलांना आपली आई आपल्या पासून दूर जात आहे असे वाटायचे. कारण नाईक ऑफिसमधून घरी आल्यानंतर राणीचा जास्त वेळ नाईकांसोबत जायचा. तशात मग मुलं थोडी चीड चीड करायचे.सारखं तिला बोलवून बोलवून काही न काही सांगून आपल्या जवळ गुंतवून ठेवायचा प्रयत्न करायचे. पण तेव्हाच मग नाईकही तिला आवाज देऊन स्वतःकडे बोलवून घ्यायचे. तिला इकडे बघू की तिकडे बघू असे होऊन जायचे. ती मुलांचं मन जपायचा खूप प्रयत्न करायची. पण तिला नाईकांना टाळणेही जमत नसे. अशात तीच स्वतःची ओढाताण करून घेत होती. नाईक घरी नसतानाचा सम्पूर्ण वेळ ती मुलांना द्यायची पण नाईक घरी असले की पूर्ण वेळ मुलांना देणे तिला कठीण व्हायचे.

      असेच एक दिवस नितुला त्याचे शाळेतून होमवर्क मिळाले पण त्यासाठी लागणारे पूर्ण साहित्य आणायचे कामाच्या गराड्यात राहून गेले होते. आज तिने घरातले जास्तीचे काम काढले होते. ते करता करताच सगळा वेळ निघून गेला होता. बाजरात जाणे तिला शक्यच झाले नाही. त्यामुळे नितु सारखा चीड चीड करत होता. नाईकांची ऑफिस मधून यायची वेळ झाली होती. पण नितुची चीड चीड बघून राणीने सगळ्या लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट करून ती बाजारात गेली. सगळ्या वस्तू तिने खरेदी केल्या आणि घरी परत निघाली. पण येता येता तिला बराच वेळ लागला. नाईक ऑफिसमधून घरी पोचले होते. पण आज रोजप्रमाणे त्यांना राणी घरात दिसली नाही. आज चहा ही मिळाला नाही. ऑफिसमध्येही कामात काही चुका झाल्यामुळे साहेबांशी त्यांचा खटका उडाला होता. त्यामुळे त्यांचे मन अशांत होते. घरात राणीला न पाहून ते जास्तच अशांत झाले.

      राणीलाही परत यायला बराच वेळ लागत होता तशी त्यांचीही चीड चीड व्हायला लागली.
बाजारातून घरी येताच नितु राणी वर जणू ओरडलाच, आई तू आता हे सामान आणून दिलंस आता मी होमवर्क केव्हा करणार. रात्रभर मला आता करत बसावे लागेल. तशी राणी म्हणाली, रागावू नको राजा, होईल सगळं अगदी व्यवस्थित, तू काळजी करू नकोस. मी करते ना तुला मदत. चल आपण दोघे मिळून करू या. पण नितुचा राग मात्र शांत होईना. तशातच ती नितु सोबत त्याला मदत करत राहिली. वेळ फार झाला होता. स्वयंपक ही अजून व्हायचा होता. आज नाईकांकडे बघायला सुद्धा तिला वेळ मिळाला नव्हता. नाईकांना चहा पण देता आला नव्हता. नाईकही चीड चीड करत होते . सारखा तिला आवाज देऊन तिला बोलवत होते. सगळं केल्या शिवाय तिला जाणे जमलेच नाही. आता दहा वाजायला आले होते. तिने स्वयंपाक आटोपून ताट केले आणि मुलांना व नाईकांना जेवायला बोलवले, तर मीतू झोपी गेली होती. राणीने तिला जागे करून जेवणाच्या टेबलवर बसवले. त्यामुळे तीही चिडत होती. राणी सगळ्यांची चीड चीड बघून आणखीच थकून गेली होती. तिला सगळ्यांना कसे खुश करावे काहीच कळत नव्हते.

      जेवण आटोपून सगळे आपापल्या रुम मध्ये गेले. राणीने ताट उचलून सिंक मध्ये नेऊन ठेवले सगळं साफ सुफ करून ती नितु च्या रुम मध्ये गेली. त्याचे होमवर्क आटोपले होते. आणि तो झोपायच्या तयारीत होता. राणीला बघून तो ओरडलाच बघ तुझ्या मूळे मला किती लेट झालं. माझं होमवर्क नसत झालं तर टीचरनी मला पनिश केले असते. राणीने त्याला थोपटण्याचा प्रयत्न केला पण नितुने तिचा हात ढकलून दिला. आणि म्हणाला जा तू आता मीच झोपतो. राणीने त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण सारेच निश्फळ झाले. तिला खूप वाईट वाटत होते. पण काहीच इलाज नव्हता. तशी ती मीतू कडे वळली तर तीही झोपी गेली होती.  लाईट बंद करून दुःखी मनाने ती नाईकांच्या रुम मध्ये आली. तर नाईकही झोपी गेले होते. सगळेच आज तिच्यावर नाराज होते. सगळ्यांना खुश करण्याचा तिने पूर्ण प्रयत्न केला पण आजच्या घटनेला तिचा नाईलाज होता. तीही या सगळया मुळे थकून गेली होती. ती तशीच मग लाईट बंद करून नाईकांच्या शेजारी झोपी गेली. आज कितीतरी दिवसानंतर नाईकांनी तिला आपल्या कुशीत जवळ घेतले नव्हते.
Sanjay R.


No comments: