Thursday, August 26, 2021

" राणी "

     राणी तिचे नाव, वाटावे कुठल्या महा साम्राज्याची सम्राधनी असावी, सुंदर नव्हे तर अती सुंदर , तसेच तिचे राहणे आणि तसेच तिचे वागणे  बोलणे. विचारही तिचे तसेच साजेशे. पण देवाचेच चुकले. गरीब घरात जन्माला घातले.
तिच्या सौंदर्याची विचारांची तिथे काहीच किंमत नव्हती. फाटक्या तुटक्या कपड्यात ती अंग झाकायची. कधी मिळाली तर भाजी भाकरी नाहीतर कुणाच्या घरचं रात्रीचे उरलेले जेवण तेच होतं नशिबात. घर पाहावं तर तेही तुटकं फुटकं पाणोळ्याचं. त्यात एकच खोली त्यातच सगळा संसार चालायचा . सोबतीला म्हातारे आई बाप. आई नेहमीच आजारी. सदा झोपलेलीच असायची. बाप उठून सकाळी मोळी करून विकायसाठी काड्या जमा करायला जायचा नि परत यायचा तो नेहमीच टूल दारू पिऊन यायचा नि सरळ आडवा पडायचा. त्याचे जेवण, खाणे कधीच घरात नसायचे. फक्त झोपायला तेवढा घरात यायचा. राणी त्यांचीच लेक. पण तिच्याकडे कोणीच लक्ष देत नसत. तिला समजायला लागले तेव्हा पासून तीच चार दोन घरी धुणं भांडे करून आईचे आणि स्वतःचे पोट भरायची.  त्यांच्याच घरचं काही उरलं सुरलं घरी घेऊन यायची. स्वतःही खायची. आईला ही खाऊ घालायची. दिवसा मागून दिवस जात राहिले, वर्ष लोटले. आता राणी विस एकवीसची झाली असावी. चेहऱ्यावर तारुण्याची झळाळी आली होती. पण परिस्थिती मुळे चेहऱ्यावर तेज उरलेच नव्हते. लग्नही तिचे व्हायचे होते. आई आजारी असल्याने  मुलगाही कोण बघणार. आणि लग्न केले तर आईकडे कोण बघणार. म्हणून तिनेही लग्नाचा विचार बाजूलाच ठेवला होता.

      आज राणीला एका नवीन घरचे काम मिळाले होते. काम नाईकांच्या घरचे होते. ते बँकेत नोकरीवर होते. घरात ते आणि त्यांची दोन छोटी छोटी मुले नितु म्हणजे नितीन सहा वर्षाचा आणि मीतू म्हणजे मिताली चार वर्षांची. दोघात फक्त दोन वर्षांचा फरक होता. या दोन मुलांना सांभाळायचे काम तिला मिळाले होते. सोबत घरातली सगळी काम,  स्वैपाक, कपडे धुणे, ठेव रेव सगळंच करायचं होतं. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत काम होते. पगारही चांगलाच मिळणार होता. सोबत जेवण नास्ता चहा सगळंच मिळणार होतं.  स्वतःच सगळं करून संपूर्ण घर सांभाळायचं होत. आणि मुलांना पूर्ण काळजीने सांभाळायचे होते. नाईकांची पत्नी कोरोना मधेच गेली होती. मुलांकडे बघायला कोणीच नव्हते. नाईकही मुलांसोबत एकटे पडले होते. ते सारखे विचारात असायचे. मुलांचा प्रश्न सारखा त्यांना अस्वस्थ करायचा. शेवटी त्यांनी निर्णय घेतला पूर्ण वेळ एक बाई ठेवायची आणि मुलांना मोठे करायचे. दुसऱ्या लग्नाचा विचारच त्यांना नकोसा वाटत होता. ते सावत्र आई मुलांना कसे वागवते ते बघून ऐकून होते. म्हणून त्यांनी तो विचारच डोक्यातून बाद केला होता. त्यांनी तसे त्यांच्या बहिणीकडे बोलूनही दाखवले होते. नाईकांची बहीण सरिता . तिच्याकडेच राणी धुणे भांडे करायची. सरीताला राणी बद्दल चांगलीच माहिती होती. तिच्या बद्दल सरीताला पूर्ण विश्वास होता. सरिता तिला अगदी लहानपणापासून ओळखत होती. म्हणूनच तिने तिच्या दादाकडे राणीला कामासाठी लावून दिले होते. नाईकांनाही  अशीच महितीतली बाई कामं आणि मुलांचा समभाळ करायला हवी होती. त्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता. राणीला कामाला ठेवल्यामुळे नाईकांची मुलांची दिवस भराची काळजी कमी होणार होती. बाकी वेळ ते घरी असणारच होते. अडी अडचणीला सारिताही मदतीला राहणारच होती. राणीही नवीन काम मिळाल्याने खूप खुश होती.

      आज तिचा कामाचा पहिलाच दिवस होता. तिने तयार होऊन देवाला हात जोडले. आईला नमस्कार केला. तिचा आशीर्वाद घेऊन ती नाईकांकडे पोचली. नाईक वाटच बघत होते. राणीने नाईकांना अगोदरही सरिता ताई कडे बघितले होते. तिला नाईकांबद्दल  माहिती होती. नाईक खूप चांगल्या स्वभावाचे आहेत हे राणीला ठाऊक होते. नाईकांनी राणी ला घरातले सगळे काम , स्वयंपाक घरातले बाकी सामान कुठे काय आहे ते सगळे समजावून सांगितले. सोबत नितु आणि मीतू च्या जेवण नास्ता, अभ्यास, खेळ, झोपणे सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि ते  नितु मितूला राणीच्या स्वाधीन करून ऑफिसला निघून गेले.  आज पहिला दिवस असल्याने स्वयंपाकाला वेळ होणार होता म्हणून नाईक बाहेरच जेवण करणार होते. पण उद्या पासून ते सोबत टिफिन घेऊन जाणार असे त्यांनी राणी ला सांगितले. तेव्हा आल्याबरोबर तिला स्वयंपाकाला लागावे लागणार होते. बाकी घरातले सामान भाजी पाला नाईक स्वतःच आणून देणार होते. त्यामुळे राणीला फक्त घरातले तेवढे बघायचे होते.

       नितु मीतू जवळच्याच स्कुल मध्ये शिकत होते. नितु फर्स्ट क्लास ला तर मीतू के जी वन ला होती. पण स्कुल बंद असल्याने ते घरीच राहणार होते. नितु मीतू दोघेही शांत स्वभावाचे असल्याने राणी ला खूप छान वाटत होते.  थोड्याच वेळात ते राणीशी राणी आंटी राणी आंटी करून तिच्या सोबत मिक्स झाले होते. तिच्या मागे पुढे करत होते. राणीने स्वयंपाक करून मुलांना आणि स्वतः साठीही वाढून घेतले. आज पहिल्यांदा ती आरामात बसून मुलांसोबत जेवण करत होती. मुलंही तिच्या सोबतीने खुश होती.  जेवण करून मुलं आपल्या अभ्यासाला लागली. सोबत राणीही त्यांची पुस्तके बघण्यात वाचण्यात दंग झाली. तशी राणीही वर्ग सात पर्यंत शाळेत जात होती. पण आई आजारी पडायला लागल्यावर सगळा भार तिच्यावर आल्याने तिची शाळा बंद झाली होती.  अभ्यास आटोपल्यावर ते राणीला तिच्या कामात मदत करत होते. त्यांचे राणीला हे दाखव ते दाखव सारखे सुरू होते. तशातच मुलं थकून गेली आणि बेडरूम मध्ये जाऊन झोपी गेली. राणी मग इतर कामाला लागली. तिने कपडे भांडे केले. घर साफ सफाई केली. सगळे सामान व्यवस्थित लावले. तोपर्यंत मुलं झोपेतून उठली. राणी ने त्यांना दूध बिस्कीट दिले. मुलं खूप खुश होती. त्यांचं सगळं राणी अगदी आई सारखं करत होती. पाच वाजता तिने परत स्वयंपाक करायला घेतला.  स्वयंपाक करून तिने भांडे धुवून व्यवस्थित लावून ठेवले. जेवणाचे डायनिंग टेबल वर आणून व्यवस्थित झाकून लावून ठेवले. तोपर्यत नाईक ऑफिस मधून परत आलेत. मुलांना खुश पाहून नाईकही खुश झालेत. राणी ने नाईकांना चहा देऊन, नाईकांना सांगून ती घरी परत आली.

      आज राणी खूप खुश होती. तिने आईला नाईकांकडे काय काय केले ते सगळे सांगितले. आईला पण पोरीचे नवीन काम ऐकून बरे वाटले. 
तिच्या चेहऱ्यावर ही हास्य फुलले. राणीने आज देवाच्या फोटो पुढे दिवा दिवा लावला आणि नमस्कार करून तिने आज आईसाठी खास खिचडी मांडली. माय लेकी आज पहिल्यांदा आनंदात जेवत होत्या. बाप कधीतरी रात्री येऊन झोपला आणि सकाळी उठून आपल्या कामाला निघून गेला.

      राणी सकाळी उठून तयार होऊन नाईकांकडे कमला आली. आज तिने नाईकांना टिफिन करून दिला. नाईक आपला टिफिन घेऊन कामावर निघून गेले. मुलांना पण आता राणी आंटी ची सवय होऊन गेली होती आणि  राणीला ही मुलांची सवय झाली होती. ती आता मुलांचा अभ्यास पण घ्यायला लागली होती. त्यांना प्रत्येक गोष्टीत ती मदत करायची. मुलं सकाळ होताच राणीची वाट बघायला लागले होते. त्यांना तिच्याशिवाय बिलकुल करमत नसे. दिवस भर आंटी आंटी करून तिला भंडावून सोडायचे. राणीलाही मुलांचे सगळे करण्यात खूप आनंद मिळायचा. तिला मुलाशिवाय आणि मुलांना राणी शिवाय बिलकुल करमत नसे.

      असेच दिवसामागून दिवस जात होते. अशातच एक दिवस राणीच्या आईची तब्येत खूप बिघडली. राणी तिला दवाखान्यात घेऊन गेली. पण परिस्थिती हाताबाहेर असल्याचे सांगून डॉक्टरांनी  आईचा अंत जवळ असल्याचे सांगितले. नाईकांनी ही जमेल तेवढी मदत केली. औषध पाणी, डॉक्टरांची फी सगळं नाईकच करत होते. पण देवाच्या इच्छेपुढे कुणाचे काय चालते. आणि आईने आपले प्राण सोडले. राणी खूप दुःखी झाली होती. आई साठी राणी खूप रडली. तिला काहीच सुचत नव्हते. ती तशीच बसून रहायची अशातच पंधरा दिवस निघून गेले. राणी चे वडीलही गेल्या चार पाच दिवस पासून परत आले नव्हते. त्यांचा पण कुठेच पत्ता लागला नव्हता. राणीला काहीच सुचत नव्हते. शेवटी नाईकच राणी च्या घरी आलेत आणि तिला समजावून आपल्या घरी घेऊन आले. नितु मीतू ही राणी च्या दुःखात  खूप दुःखी झाले होते.  राणी रडायला लागले की तेही राणी सोबत रडायचे.  परिस्थिती ची जाण ठेऊन नाईकांनी राणीला त्यांच्याच घरी आउट हाऊस मध्ये राणीला राहायला एक खोली दिली होती. आता राणी दिवसभर पाहिजे तेव्हा मुलांचे करायला हजर होती. हळू हळू राणी आपले दुःख विसरून जायचा प्रयत्न करत होती. आणि ती आपला पूर्ण वेळ मुलांना द्यायला लागली होती. मुलंही राणी शिवाय राहायचेच नाहीत. राणीचा पूर्ण झोपे पर्यंतचा वेळ मुलांसोबतच जायचा.

      असेच काही वर्षे निघून गेली. मुलंही आता मोठी झाली होती. पण मुलं आणि राणी मधले प्रेम कमी होण्या ऐवजी वाढतच गेले.  ते राणीला आपल्या आईच मानायला लागले होते.  राणीचाही मुलांमध्ये खूप जीव होता. मुलांच्या प्रेमापोटीच तीच्या मनात  स्वतःचा विचारही  कधीच आला नव्हता. तिने आपले सर्वस्व मुलांना देऊन टाकले होते.  ती नाईकांच्या घरालाच आपले घर समजून सगळे प्रेमाने करत होती. ती आता नाईकांच्या घरातील एक मेम्बरच झाली होती. ते मुलं आणि राणी मधले एक अनोखे बंधन होते. आणि राणी नितु मीतूची खरी आई झाली झाली होती.
Sanjay R.


No comments: