Monday, July 19, 2021

" नामा "

        हुश्श का तपुन ऱ्हायलं. पुरं भाजून कहाडल बावा या गर्मीनं. मानसाचा पुरा पापड झाला. कसं होईन. समद्या इरी बी आटल्या. प्याले तं सोडा जीव द्याले बी पानी न्हाई रायलं . उन्हाया व्हय का का व्हय. नामानं आपल्या मनातला दाह तुका जवळ व्यक्त केला . नामा म्हणजे नामदेव आणि तुका म्हणजे तुकाराम दोघेही सारख्याच वयाचे. दोघांची मैत्री अगदी बालपणापासून तर आज पावेतो अगदी तशीच कायम आहे.

दोघेही शाळेत सोबतच दाखल झाले. सातवा वर्ग शिकून दोघांनीही सोबतच शाळेला राम राम ठोकला. आणि घरात मदत व्हावी या उद्देशाने आपापल्या वडिलांना शेतकामात मदत करायला लागले. दिवस भर शेतात राबायचे आणि शेतातून घरी आल्यावर हातपाय धुवून चहा पिऊन सरळ मारोतीच्या पारावर पोचायचे. मग तिथे पोटात भूक लागेतो गप्पा गोष्टी, दंगा मस्ती आज शेतात काय काय केले, उद्या काय करणार, यावर चर्चा चालायच्या. गावात कोणाचे लफडे कोणाशी सुरू आहे, कोणाचे भांडण कोणाशी झाले. कोणी कोणाला शीव्या दिल्या.  कोणाचं पोरगं शाळेतून पळून आलं. मास्तरने कोणाला काय शिक्षा दिली. अगदी झाडून पुसून सगळ्या विषयावर तिथे चर्चा व्हायची. ही चर्चा भूक लागे तोवर चालायची. जेवणाची वेळ झाली की सारे आपले जेवण खावं आटोपून परत पारावर हजर व्हायचे. देवळात भजन मंडळ आपले भजन सुरू करायचे आणि युवा मंडळ आपल्या गप्पा गोष्टी. भजन समपे पर्यंत फुल टाइम गापा चालायच्या. आणि रात्री 11 वाजेपर्यंत भजन आटोपले की सगळे        आपल्या घरी जाऊन मस्त ताणून द्यायचे. परत सकाळी 5 वाजता उठून राजच्या दिनचर्येला सुरवात व्हायची. दिवसा मागून दिवस असेच लोटायचे.

        आता नामा, तुकाचे लग्नाचे वय झाले होते. दोघांच्याही घरात  लग्नाच्या चर्चा व्हायला लागल्या. बाजूच्याच गावाहून नामा साठी निरोप आला. पोरगी पाहायला नामाकडचे लोक पोचले अर्थात नामाने सोबत तुकाला ही घेतले, दोघांचेही एकमएकवाचून काहीच होत नसे. नामाला पोरगी पसंद आली. गोष्टी गोष्टीत तुकाचीही गोष्ट निघाली. तर मुलीच्या बापाने आपल्या लहान पोरीसाठी तुकाकडे गोष्ट काढली. झाले तेव्हाच तुकानेही लहान पोरीला पसंती दर्शवली. आणि नामा, तुका चा दोघांचाही एकाच ठिकाणी योग जुळून आला. लग्नही एकाच दिवशी एकाच मांडवात झाले. आणि दोघांचाही संसार सोबतच सुरू झाला. नामा तुका दोघांमध्ये आता नाते झाले होते. दोघेही साठभाऊ झाले होते. दोघांच्याही बायका खूप समंजस आणि कष्टाळू होत्या. त्यांचा शेतकामात खूप हातभार होत असे.

दोघेही संसारात खुश होते. पण आताशा शेतीचा खर्च वाढला होता. आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन खूप कमी झाले होते. घर चालवणे खूप कठीण होऊन गेले होते. त्यात बायकांचे बाळंतपण पण झाले, घरात आता मुलं पण आले होते. नामा हळूहळू सावकाराच्या जाळ्यात गुंफत गेला. कर्जाने घेतलेल्या पैशावर व्याजा वर व्याज धरून कर्ज वाढतच होते. एक एक वर्ष नुसत्या आशेवर काढणे चालू होते. त्याला वाटायचे कदाचित या वर्षी पीक चांगले होईल आणि आपण कर्जमुक्त होऊ. पण चांगले वर्ष कधीच येत नव्हते. आता मुलांच्या शिक्षण पाण्यात पण बराच खर्च होत होता. नामाला कळून चुकले होते की आपण या आयुष्यात तरी या कर्जातून मुक्त होणार नाही. त्यातच त्याची काळजी वाढली होती. सावकार ही त्याला खूप परेशान करत होता. नामाला काय करावे काहीच कळत नव्हते. त्यात तो आजारी राहायला लागला. आता त्याच्या बायकोनेच शेतकाम स्वतःच्या हातात घेतले होते. तिच्याकडेही काहीच पर्याय उरला नव्हता. सगळे सांगत होते यंदा पाऊस बरा होणार. म्हणजे पीक बरे होईल ही आशा जागली होती. ते पाहून नामालाही हुरूप आला होता. त्याने परत सावकारा कडे मिणत्या करून हात पाय जोडून कसे तरी  बियाण्याची आणि खत औषधाची व्यवस्था केली . पाऊसही बरोबर वेळेवर सुरू झाला. नामा ही खुश होता. तो वारंवार देवाचा धावा करत असायचा. देवा अमदा चांगलं पिकू दे आनं महा किमान अर्ध कर्ज तरी कमी होऊ दे. मी नारायनाची पूजा करीन. त्याने आपला संकल्प केला. आणि रोज शेतात मेहनतीला कुठेच कमी केले नाही. दोघेही नवरा बायको सोबतीने शेतात खपत होते. पराटी पण मस्त वाढून आली होती. फुलही खूप काढले होते. सगळेच खुश होते. आता पराटी ला मस्त लटलट बोन्ड दिसत होते. नामाला आता आशा वाटायला लागली होती. तसे त्याने तुकाला बोलूनही दाखवले होते.

        तुकाशी गप्पा करून नामा खुषीतच घरी पोचला. जेवण करून आरामात झोपी गेला.आणि नेमका रात्री जबरदस्त वादळी पाऊस झाला. नामाला आता काळजी वाटायला लागली हाती. त्याला केव्हा शेतात जाऊन पराटी पाहतो असे झाले होते. मुसळधार पाऊस रात्रभर तसाच चालू होता. नामा घरात अस्वस्थ होत होता. सकाळ होताच नवरा बायको दोघेही अंगावर घोंगशी ओढून शेतात पोचले. शेतात पोचताच दोघांच्याही डोळ्यातून पाणीच गळायला लागले. कोणालाच काही सुचत नव्हते. सगळी पराटी जमिनीवर आडवी झाली. पाऊस थांबता थांबत नव्हता. सगळी मेहनत माती मोल झाली होती.  तशाच पावसात पराटी उभी करायचा प्रयत्न केला पण शेतात. जिकडे तिकडे नुसते पाणी भरले होते. जमीन कुठेच दिसत नव्हती. झाड उभे व्हायला तयारच नव्हते. दोघेही जड अंतकरणाने घरी परत आले. आता दुपार झाली होती. पण पाऊस अजूनही थांबायला तयार नव्हता. तुकाला आता घरात बसवतच नव्हते. हजारो प्रश्न त्याला पागल करून सोडत होते.  नामा परत एकटाच घोंगशी ओढून शेतात पोचला.  काय करावे त्याला काहीच कळत नव्हते. तो शेतात तसाच झाडाखाली बसून राहिला.

        रात्र झाली तरी नामा शेतातून परत आला नाही म्हणून घरात सगळ्यांची काळजी वाढली होती. नामाच्या बायकोला खूप अस्वस्थ व्हायला लागली. तशी ती तुका कडे गेली. आणि तुकाला नामा शेतात गेला आणि अजून परत आला नाही ते सांगितले. तास तुकाही खूप अस्वस्थ झाला. त्याने गावातले चार सोबती जमा केले आणि शेतात पोचला. झाडाजवळ पोचताच समोरचे दृश्य पाहून तुका खालीच बसला.  नामा झाडाला फास लावून तिथेच लटकत होता. कुणालाच काय करावे कळत नव्हते. तसा सोबत्याने सगळ्यांना तिथेच थांबायला सांगून तो गावाकडे वळला. हळूहळू गावात सगळीकडे बातमी पसरली. नामाच्या बायकोचा आकांत पाहून सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. सगळे दुःख व्यक्त करत होते. पोलीस पाटलाने पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती पोलिसला दिली . आणि सगळे गावकरी नामाच्या शेताकडे निघाले.
     निसर्गाच्या या लहरी पणाला कंटाळून आज
नामाचा बळी घेतला होता.  परत एक संसार उध्वस्त झाला होता. जिल्ह्याच्या प्रकरणांच्या यादीत परत एक नाव जुळले होते.
राजकारण्यांना चर्चेसाठी परत एक प्रकरण मिळाले होते. वर्तमानपत्रात ठळक अक्षरात द्यायला एक बातमी मिळाली होती. पण ज्याचा संसार उध्वस्त झाला होता त्याच्याशी कोणालाच सोईर सुतुक नव्हते.

Sanjay Ronghe

Nagpur



No comments: