Thursday, April 15, 2021

" हॉस्पिटलची वारी "

लहानच होतो मी तेव्हा. असेल तिसऱ्या वर्गात. आता जास्त काही आठवत पण नाही. पण तेव्हा कुठल्या तरी आजाराने वेढलं. मला तसा काही त्रास पण नव्हता पण शरीरावर सूज आली होती. खूप जाड झालो असे वाटत होते. त्याच कारणाने पप्पा मला डॉक्टर कडे घेऊन गेलेत. तर डॉक्टरांनी  काही टेस्ट करून घ्यायला सांगितल्या. टेस्ट चे रिपोर्ट्स आलेत नि मग डॉक्टरांनी मला दवाखान्यात ऍडमिट करायला सांगितले.  ते ऐकून माझे पप्पा दवाखान्यातच बराच वेळ तसेच बसून राहिले. त्यांना काय करावे काय बोलावे काहीच सुचत नव्हते. डॉक्टरांना ते लक्षात आले आणि मग डॉक्टरांनी पप्पाना धीर दिला. आणि मग आम्ही काही औषधे घेऊन घरी आलो. पप्पानी आईला पण काही जास्त न सांगता उद्या सकाळी हॉस्पिटल ला जावे लागेल. आणि ट्रीटमेंट साठी तीन चार दिवस हॉस्पिटल मधेच थांबावे लागेल असे सांगितले. तरीही आई समजायचे ते समजली आणि रडायला लागली. मी मात्र तिला खूप समजवायचा प्रयत्न केला. आणि मग ती शांत झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सकाळीच तयारी करून हॉस्पिटल ला पोहोचलो. डॉक्टरांनी मला ऍडमिट करून घेतले आणि आणखी काही टेस्ट करून घेतल्या. आणि सलाईन , इंजेक्शन औषध सुरू झाले. मला दवाखान्यात राहणे बिलकुल आवडले नाही. लोक बघायला भेटायला यायचे. मी कॉट वर पडून असायचो. माझ्याच्याने उठणे बसणे पण होत नव्हते. आईच सगळं करायची. गरम पाण्याने अंग पुसून देण्यापासून तर झोप येयीपर्यंत मला थोपटून थोपटून झोपवण्या पर्यंत सारेच ती करायची. मी खूपच अशक्त झालो होतो. दिवस रात्र सलाईन मधूनच इंजेक्शन सुरू असायचे. आणि मी आपला कॉटवर पडून असायचो. किती दिवस हॉस्पिटल मध्ये होतो ते आठवत नाही पण बहुतेक आठ ते दहा दिवस मी हॉस्पिटल मध्ये असेल.
माझ्या सोबतच तिथे तिथे बरेच पेशन्ट ऍडमिट होते. कोणी आरडा ओरडा करायचे, कोणी हसायचे हे तर कोणी निपचित पडून असायचे. सगळ्यांचे नातेवाईक मात्र गंभीर चिंतेत दिसायचे. आमच्या समोर एक पेशन्ट दिवस रात्र विव्हळत असायचा. त्याचे हात पाय नेहमीच कॉटला बांधून असायचे. त्याला कुठला त्रास होता माहीत नाही. कदाचित तो मनोररुग्ण असावा. तो जागा असला की सारखा ओरडायचा. मग डॉक्टर त्याला इंजेक्शन द्यायचे आणि मग तो शांत व्हायचा नि झोपून जायचा. पण उठताच परत तो खूप ओरडायचा. एक दिवस सकाळी सकाळी तो बेडवर दिसला नाही म्हणून लोक शोधायला लागले. तर तो कुठेच दिसत नव्हता. मग बऱ्याच वेळानंतर कुणाला तरी त्याचे प्रेतच हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या विहिरीत तरंगताना दिसले. तो आता आपल्या दुःखातून मुक्त झाला होता.
बाजूला एक आजोबा ऍडमिट झाले होते. त्यांना त्यांच्या नातवाने चावले होते. आणि नातवाला रेबिस झाला होता. त्याला कुत्रे चावले होते. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. आता आजोबांना पण रेबिस ची लक्षण दिसायला लागली होती. म्हणून डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट करून घेतले होते.
आठ दहा दिवसांत मी बरा होऊन घरी आलो पण आलो त्याचे दुसरे दिवशीच दिवाळी होती. त्यावर्षी आमची दिवाळी अशीच गेली. कुणाच्याच चेहऱ्यावर आनंद नव्हता.
मी घरी परत आलो एवढाच एक दिलासा सगळ्यांना उमेद देत. होता. काही दिवसांनी मी पूर्ण पणे बरा झालो आणि परत माझी शाळा मस्ती दंगा सुरू झाला. आणि तो प्रसंग मी पूर्णपणे विसरलो. पण आज लिहायला घेतलं आणि सारं सारं आठवलं. असेही गेलेत  हॉस्पिटल मधील माझे ते दिवस.
संजय रोंघे
नागपूर
मोबाईल : 8380074730


No comments: