Wednesday, April 21, 2021

" सरिता "

कोरोना आला आणि सुरळीत चाललेला संसार विस्कळीत झाला. रोजमजुरी करून स्वतःचे पोट भरणारा निशांत, गावात असलेल्या आपल्या आई वडील आणि बहिणीला पण थोडी थोडी मदत करायचा. आपल्या रोजच्या कामाईतले थोडे थोडे पैसे वाचवून ते महिन्या दोन महिन्यातून घरी पाठवायचा. बापालाही आपल्या मुलाचा अभिमान वाटायचा. सगळं आयुष्य गरिबीत गेले. बापाचे मजुरी करता करता शरीरच उरले नव्हते. उरला होता फक्त हाडांचा सांगाडा. आई नेहमीच आजारी असायची. कधी तिला बरं वाटलं तर ती कामावर जायची पण तिच्याने जास्त कष्ट व्हायचे नाही. आणि म्हणूनच तिला कोणी कामावर बोलवत नसे. बहिन छोटीच होती. पण खूपच गोड आणि सुंदर होती. सगळे तिचे लाड करायचे. तिचीही शाळा सुरू होती. यंदा ती दहावीच्या परीक्षेला बसणार होती.

गेल्या वर्ष भरापासून निशांतला कामच नव्हते. कसेतरी स्वतःचे पोट भरणे चालू होते. घरी पाठवण्याइतके पैसेच त्याच्याकडे वर्षभरात जमले नव्हते. पण गावाला परत जायला त्याचे मन धजत नव्हते. तो इथे नागपूरला राहूनच काम करून आणि नंतर आई बाप बहिनीलापन नागपूरला घेऊन यायचे स्वप्न बघायचा. पण कोरोनाने त्याच्या स्वप्नावर पाणी फिरवले होते. सरकारने परत लॉक डाऊन जाहीर केले नि त्याचे काम बंद झाले. झोपडपट्टीतच त्याने एक छोटीशी खोली किरयाने घेतली होती. तो तिथेच राहायचा. घरमालक खूप छान होते. नेहमी ते प्रेमानेच वागायचे. किरायासाठी कधी काही बोलत नसत. पैसे मागे पुढे झाले तरी सांभाळून घ्यायचे. उलट तेच निशांत ला कधी मधी मदत करायचे. कधी जेवायला पण बोलवायचे. त्यांची एकच मुलगी होती सरिता . सरिता दहावी झाली होती. आणि एका प्रायवेट हॉस्पिटल मध्ये कामाला जायची. सरिता खूप सुंदर नव्हती , सर्व साधारण ठीक ठाक होती. पण सरिता खूप बोलकी होती. तिच्याच्याने गप्प बसणे कधी व्हायचेच नाही. तिची सारखी बडबड सुरूच असायची. अशातच निशांत आणि सारिताची हळूहळू जवळीक वाढली आणि सरिता निशांत च्या प्रेमात पडली. सायंकाळी जेवण वगैरे आटोपल्यावर सरिता निशांतच्या रुममध्येच झोप येईस्तोवर गप्पा करत बसायची. तिच्या आई वडिलांचा पण त्याला विरोध नव्हता. दोघातले प्रेम असेच वाढत होते. फुलत होते. कोरोना काळात मात्र सारिताचे काम सुरूच होते. ती हॉस्पिटलमधल्या गमती जमती निशान्त ला संगत राहायची. त्यातच त्यांचा पूर्ण वेळ निघून जायचा.
आता सारिताचे हॉस्पिटल कोरोना हिस्पिटल झाले होते. काम खूप वाढले होते. त्यामुळे ती थकून जायची, थोडा वेळ निशांतशी बोलून झोपायला निघून जायची.
आज सरिता हॉस्पिटल मधून आल्या आल्या निशांतच्या रुम मध्ये आली आणि तिने तिच्या पर्स मधून काही आषधाचे पॅक काढून निशांत ला देत म्हणाली , हे जपून ठेव, मी नंतर लागेल तेव्हा घेऊन जाईल. आणि ती घरात निघून गेली. रात्री जेवण झाल्यावर ती परत आली आणि निशांत ला सांगायला लागली. अरे हे औषध खूप महागाचे आहे. बाजरात मिळत नाही आहे. लोक या औषधासाठी दारोदार भटकत आहेत. कितीही पैसे ते द्यायला तयार आहेत. हे आपण जर एखाद्या गरजू व्यक्तीला विकले तर एक ते दीड लाख रुपये पण मिळतील. हॉस्पिटल मध्ये खूप पेशन्ट आहेत. मधू आमचा वॉर्ड बॉय आहे ना त्याने माहीत नाही कुठून आणलेत ते. त्याने मला ते  घरी निघताना दिलेत. आणि कोणी ग्राहक शोधून विकायचे सांगितले. तो मला त्यातले अर्धे पैसे देणार असे बोलला. तू तर घरीच असतो. त्यापेक्षा हॉस्पिटलच्या एरियात फिरून ग्राहक शोध. त्याला आपण ते विकून टाकू. तुलाही त्या पैशातला एक हिस्सा मिळेल. आपण त्याचे तीन भाग करू. किंमत जेवढी जास्त येईल तेवढा आपला जास्त फायदा होईल. बघ तू उद्या कर हे. असे म्हणून ती. परत गेली. निशांतही काम नसल्यामुळे परेशान झाला होता. त्याला पैसे मिळतील ही आशा दिसायला लागली.

दुसऱ्या दिवशी निशांत सकाळीच उठून हॉस्पिटल कडे गेला. तर मेडिकल च्या दुकानांपुढे ग्राहकांची झुंबड लागली होती. दुकानात त्या औषधांचा स्टॉक सम्पल्यामुळे ग्राहक त्रस्त होऊन वापस जात होते. निशांतला तेव्हा त्या औषधाचे महत्व पटले. त्याने एक दोन लोकांना विचारले खरच हे औषध बाजारात नाही का. त्यावर त्या लोकांनी त्यालाच विचारले. अरे तुझी ओळख आहे का इथे कुठल्या दुकानात, आम्हाला ते औषध पाहिजेच आहे, नाहीतर आमचा पेशन्ट काही वाचत नाही.
निशांत ने एका ग्राहकाला बाजूला बोलवून विचारले, मी माझ्या ओळखीने तुम्हाला औषध आणून दिले तर तुम्ही किती पैसे द्याल. तर तो ग्राहक बोलला तुम्ही सांगाल तितके पैसे मी तुम्हाला देतो. बस मला औषध हवे आहे, त्याशिवाय आमचा पेशन्ट वाचू शकत नाही. खरच तुमच्या मदतीने औषध मिळत असेल तर माझ्यासाठी आणा. मी आत्ता तुम्हाला कॅश पैसे देतो. मी सगळं शहर शोधून आलो, कुठेच ते मिळत नाही आहे. तुम्ही ते मला आणून दिले तर माझ्यावर खूप उपकार होतील. म्हणजे ते औषध जीव वाचवायला खूपच महत्वाचे होते. ते औषध होते रेमडेसीवर. निशांत ने त्या ग्राहकाला थोडा धीर दिला आणि सांगितले मी प्रयत्न करतो, तुम्ही सायंकाळी सात वाजता इथेच भेटा. मिळाले तर तुमच्या पेशन्टचे भले होईल पण पैसे दीड लाख रुपये लागतील. तसा तो ग्राहक म्हणाला तुम्ही पैशाची चिंता करू नका. मला फक्त औषध हवे. प्लिज कसेही करून मला ते औषध आणून द्या. त्या ग्राहकाच्या डोळ्यात आसवं दिसत होती. त्याची ती अवस्था बघून निशान्त ही गहिवरुन गेला. मी करतो तुमचं काम, तुम्ही संध्याकाळी या असे सांगून घरी परत आला.
आता सायंकाळी  निशांत सारिताची वाट बघत होता. ती केव्हा परत येईल आणि तिला घेऊन आपण ते औषध त्या ग्राहकाला नेऊन देऊ असे त्याला झाले होते. त्याला त्या ग्राहकाच्या पेशन्ट ची चिंता वाटायला लागली होती. त्या पेशन्ट ला देवा वाचव रे असा धावा तो देवाजवळ करत होता. त्याला त्या ग्राहकाच्या डोळ्यातले आसवं स्वस्थ बसू देत नव्हते. वारंवार त्या ग्राहकाचा चेहरा त्याच्या समोर येत होता. त्याची विवशता त्याला आठवत होती. तशी सरिता हॉस्पिटल मधून सरळ निशांतच्या रुममध्येच आली. तिने परत एक बॉक्स आपल्या पर्स मधून काढून निशांत च्या हाती दिला आणि निशांत ला म्हणाली, काय झाले मिळालं का कोणी. तर तो म्हणाला आपल्याला सात वाजता हॉस्पिटलच्या पुढे जे मेडिकल शॉप आहे तिथे जायचे आहे. एकाला ते औषध हवे आहे. तो किती ही पैसे द्यायला तयार आहे. मी त्याला दीड लाख रुपये सांगितले. तो सात वाजता तिथे येणार आहे. तशी सरिता बरं झालं काम होईल, मी येतेच आत्ता म्हणत घराकडे वळली. सरिता तयार होऊन आली साडे सहा वाजले होते. सात वाजायला अर्धा तास होता हॉस्पिटल ला पोचायला वीस मिनिटे लागणार होते. सारितांने काल आणलेले औषध पर्स मध्ये टाकले. आणि आईला येतो एक तासात म्हणून दोघेही हॉस्पिटल कडे निघाले. बरोबर सात वाजता ते त्या मेडिकल शॉप जवळ पोचले तर तो व्यक्ती तिथे अगोदरच येऊन तयार होता. निशान्त ने त्याला जवळपास कोणी नाही असे पाहून जवळ बोलवले आणि औषध त्याच्या हवाली केले. त्या व्यक्तीनेही पैसे निशांतच्या हाती देऊन तो निघून गेला.
निशांत आणि सरिता च्या डोक्यावरचे टेन्शन सम्पले होते. सारितांने पैसे आपल्या पर्स मध्ये ठेवले नि दोघेही परत निघाले. येता येताच सारितांने दोन आईस्क्रीम घेतले आणि दोघेही ते खात खात निशान्त च्या रुममध्ये पोचले. आता उद्या साठी ही निशान्त ला काम मिळाले होते. सारितांने पर्स मधून पैसे काढले आणि मोजले. पैसे पूर्ण दीड लाख होते. तिने त्यातले पन्नास हजार निशान्त ला देऊन ती घरी गेली.
संपूर्ण रात्र निशांतची स्वप्न पाहण्यातच गेली. इतक्या पैशात आता काय काय करायचे या विचारातच तो झोपी गेलो. त्याने त्या मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या पेशन्ट ची मदत केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी परत निशांत त्या मेडिकल स्टोअर जवळ पोचला. आजही काल सारखीच परिस्थिती जाणवत होती. त्यात तो आपला ग्राहक शोधू लागला. आजही एक तसाच गरजू व्यक्ती त्याला भेटला. काल सारखेच त्याने त्यालाही सायंकाळी सात ला तिथेच बोलावले. आणि रूमवर परत आला.
आज  सरिता थोडी लवकरच घरी आली होती. आल्या आल्या ती निशान्त च्या रूममध्ये आली आणि बसली. ती खूप टेन्शन मध्ये दिसत होती. शेवटी निशान्त नेच तिला विचारले काय झाले. तर तिने एक पेपर चे कटिंग निशान्त ला वाचायला दिले. त्यात एक हॉस्पिटल ची नर्स पेशन्ट च्या किट मधून औषध काढून बाहेर विकत होती. पोलिसांनी सापळा रचून तिला पकडले होते. आणि सध्या तीची रवानगी तुरुंगात झाली होती. आता तिची नोकरीही गेली आणि बदनामी ही झाली होती. ती बातमी वाचून सरिता खूपच घाबरून गेली होती. तिला काय करावे काहीच सुचत नव्हते. मधूही काहीच बोलत नव्हता. त्याने ते औषध कुठून आणले तेही सांगत नव्हता. तो फक्त इतकंच सांगत होता की जे झालं ते झालं. आपण खूप मोठी चूक केली. आता परत अस काही करायचं नाही. त्यालाही आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता.
सरिता ची स्थिती पाहून निशान्त ही घाबरला होता. त्याला पण काय करावे सुचत नव्हते. त्याला आपले गरीब आई वडील बहीण दिसायला लागली. आपल्यालाही पोलीस पकडून घेऊन गेलेत तर कसे होईल याची भीती वाटायला लागली. आपल्या आई वडिलांचे नाव आपण डुबवल्याचे लोक म्हणतील. सगळे लोक, नातेवाईक आपल्याला दूषण देतील. त्याला खूपच वाईट वाटायला लागले. शेवटी  निशांतच विचार करून  सरीताला म्हणाला आता जे औषध आहे ते तू परत मधु ला देऊन टाक. आपण काल दिलेले औषध तर परत आणू शकत नाही. पण यापुढे आयुष्यात कधीही असे काहीच करायचे नाही. दुसऱ्या दिवशी सरिता मधूला तो औषधांचा बॉक्स परत करून आली. मधूनेही ते जिथून घेतले होते तिथे परत केल्याचे तिला सांगितले. तेव्हा कुठे सारिताच्या डोक्यावरचे टेन्शन थोडे कमी झाले होते. तरी अगोदरच्या दिवशी केलेल्या कृत्याची तिला खंत वाटतच होती. पण त्यातून परत निघायचा काहीच मार्ग नव्हता. नंतर मधुनेच तिला सांगितले की त्याने ते औषध पण स्वतः खरेदी करून परत केले आहे. आणि परत असे कधीच न करण्याची शपथ घेतली आहे.
आता सरिता निशांत आणि मधु तिघांच्याही डोक्यावरचे टेन्शन कमी झाले होते. एका अगम्य आपराधातून आपण मुक्त होत आहोत हे जाणवले.



No comments: