Tuesday, April 28, 2020

" पावसाची रात्र "

" पावसाची रात्र "

ही गोष्ट फार पूर्वीची आहे. आम्हा विदर्भ वासीयांना मुंबईचे एक विशेष आकर्षण असते. मलाही मुंबईचे खूप आकर्षण होते. मला पण वाटायचं श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंती देणारं एकच शहर आहे आणि ते म्हणजे मुंबई. आपणही मुंबई ला जावं आणि खूप श्रीमंत व्हावं. कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या दृष्टीने प्रयत्न केलेत आणि नोकरीनिमित्ताने माझ्या एक मित्र सोबत पोचलो मुंबई ला .
मुंबईला राहण्याची व्यवस्था आमच्याच एका मित्राच्या सोबत नवी मुंबई येथे झाल्या मुळे ती एक मोठी चिंता मिटली होती.
चिंता फक्त नोकरीची राहिली होती. तेव्हा आम्ही मुंबई ला पोचताच तिथले लोकल पेपर्स घेऊन नोकरी च्या जाहिराती वाचन सुरू केले.
आणि योग्य जाहिराती शोधून, तिथे सम्पर्क करण्यास सुरुवात केली, साधारणतः 8 दिवसातच आम्हा दोघा मित्रांना नोकरी मिळाली पण माझी नोकरी वसई येथे अति दूर असलेल्या भागात मिळाली. वसई मी कधीच बघितले नव्हते, म्हणून अगदी पहाटेच उठून तयार होऊन नोकरी जॉईन करायला मी देवाला नमसकार करून घराच्या बाहेर पडलो , तेव्हा नवी मुंबई वरून बसने ठाण्याला यावे लागायचे आणि नंतर तिथून लोकल ने पाहिजे तिथे जाता यायचे मी . ठाण्याला येऊन लोकलने दादर आणि मग दादर हुन वसई ला पोचलो. यातच मला दुपार झाली. नोकरी ज्या कंपनीत लागली ती कम्पनी शोधत शोधत मी पोचलो आणि नोकरी जॉईन केली. ऑफिसची वेळ 10 ते 6 राहणार होती. माझ्या मनात नोकरी मिळाल्याची खुशी होती परंतु कम्पनीत मला लागलेला वेळ आणि कष्ट बघून चिंता पण वाटत होती. त्या विचारातच 5 वाजले. पहिला दिवस असल्याने मी परवानगी घेऊन 5 लाच तिथून परत निघलो आणि स्टेशन ला पोचलो. स्टेशनवरची गर्दी बघून तर मला फारच भीती वाटली. दादरकडे जाणारी प्रत्येक ट्रेन अगदी गच्च भरून येत होती आणि उतरणाऱ्यांपेक्षा जास्त चढणाऱ्यांना घेऊन ट्रेन निघत होती. गर्दी मूळे मात्र माझी गाडीत चढण्याची हिम्मतच होत नव्हती. मी तसाच दोन तास दादरला जाणाऱ्या ट्रेन चे निरीक्षण करत फ्लॅटफॉर्म वरच बसून राहिलो. शेवटी 7 वाजता हिम्मत करून ट्रेन मध्ये घुसलो, कारण आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. आकाशाकडे तर मुळीच लक्ष नव्हते. आता फक्त मित्र आणि घर च दिसत होते. दादर येयीस्टव, ट्रेन मधली गर्दीही कमी झाली होती. मी थोडा आरामातच दादर ला उतरलो आणि ठाण्याला जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसलो.
ट्रेन मध्ये बसल्या बसल्या पावसाला सुरुवात झाली . पाऊस खूपच जोरात कोसळत होता. तशातही ट्रेन पुढे निघाली पण कुरल्याला येऊन ती थांबली आणि  जवळपास एक दीड तास तिथेच थांबून राहिली . ट्रॅक मध्ये पाणी असल्याने पुढे ट्रेन जाणार नाही असा निष्कर्ष लोक काढत होते. त्यातच ट्रेन परत सुरू झाली आणि धक्के खात खात घाटकोपर येथे पोचली. मात्र घटकोपरला अनौन्समेंट झाली की आता ट्रेन पुढे जाणार नाही. माझ्या तर काळजात धस्सच झाले, पोटातले कावळे पण खूपच त्रास देत होते.
फ्लॅटफॉर्म वर उभे राहायला पण जागा नव्हती जिकडे तिकडे लोक आणि पाणी याशिवाय काहीच दिसत नव्हते. मी विचार केला चला ट्रेन जाणार नाही तर बस  बघू या, बसने पोचता येईल म्हणून स्टेशन च्या बाहेरच्या बाजूला आलो तर रस्त्यावर कमरे इतके पाणी होते, आणि मध्ये मध्ये ड्रेनेज चे झाकण उघडल्याचे जाणवत होते, रस्ता पार करणे ही कठीणच होते . मग मी परत तसाच फ्लॅटफॉर्म वर परत गेलो आणि पाणी कमी होण्याची वाट बघत राहिलो. रात्री तीन वजताचे दरम्यान थोडे रस्त्यावरील पाणी कमी झाले, मग लोकांच्या मागे मागे मी पण पायीच ठाण्याला निघालो. दोनेक तास पाई चालल्यावर ठाणे  बस डेपो ला पोचलो. तिथून बस पकडून मी घरी पोचलो तर सकाळ झाली होती.
मित्र उठून चहा पित बसला होता.
मला बघताच तो विचारतो अरे रात्री कुठे होतास, किती पाऊस झाला, कुठे होता, आता येतो आहेस, तुझी तर नोकरी वर जायची वेळ झाली आहे.
मी त्याला झालेला प्रसंग सांगितला आणि माझ्या डोक्यावरचे पूर्ण प्रेशर रिलीज केले, चहा नास्ता करून जो झोपलो तो दोन दिवस मस्त घरीच लोळून काढले. नंतर पेपर मध्ये पावसाचा कहर आणि त्या मुळे झालेले नुकसान वाचून कळले की मुंबईचा पाऊस साधा नसतो, तो अनुभवायचा असतो. जो मी अनुभवला होता.

आणि हो त्या नंतर मी वसई ला परत कधी गेलोच नाही. माझ्या त्या नोकरीचा तो पहिला आणि शेवटचा तोच दिवस होता.
अशी हाती माझी मुंबईतली पहिली नोकरी ....

Sanjay R.


No comments: