Wednesday, February 27, 2019

" लय झाली अमिरी "

लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गाड्याच्या
जाऊन थोडं राहा ।

न्हाई बसाले पाट
न्हाई झोपाले खाट ।
जिकडं पहान तिकडं
ठिगळायचा थाट ।

बिमार बुढी कोपऱ्यात
न्हाई औषीध पानी ।
जिरून गेली जागीच
कायजी कोनाले कानीं ।

नागडे पुगडे लेकरं खेयते
भुके पाई रडते भारी ।
कामासाठी धनी कसा
फिरते दारोदारी ।

शिक्षन पानी लेकरायचं
खिशात न्हाई खडकू ।
लक्षुमी त्याची रडते
मानते गुमान ऱ्हावा
नका अशे भडकू ।

पाच पन्नास कमाई त्याची
काय काय थो करन ।
रातच्याले साथरीवर
पायते थो मरन ।

सरनाले बी त्याच्या
लाकडं कसे भेटन ।
पाला पाचोया जमवून
सांगा देह कसा पेटंन ।

मुन मनतो गडया .....

लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गाड्याच्या
जाऊन थोडं राहा ।
Sanjay Ronghe
Nagpur

No comments: