Thursday, August 22, 2024

जीवन गाणे

जीवनाच्या मंचावर
रंगांची मिळते साथ ।
रात्रीचा सरतो अंधार
परत गुलाबी प्रभात ।

काम कष्ट गाळतो घाम
सोबतीला दोन्ही हात ।
पडतो पुन्हा मी उठतो
देऊनिया साऱ्यास मात ।

नवी उमंग नवा उत्साह
देतो सोडून जुनी कात ।
दिवस मी सारतो मागे
जीवनाचे गाणे गात ।
Sanjay R.

Tuesday, August 20, 2024

आठवण

येना येगं तू आता परत
दिवस हे झाले किती ।
तुझ्या विना वाटे मज
एकटा एकाकी किती ।

माहेर ते तुझ्यासाठी
जणू आभाळ हाती ।
घे वेचून तू ढग सारेच
पण विसरू नकोस नाती ।

आठवण तुझी मनात
जळतात अंतरात वाती ।
घरही उदास इथे आता
आसुसलेली आहे माती ।
Sanjay R.







Friday, August 16, 2024

स्वातंत्र्य

आजूबाजूला बघतो जेव्हा
माणुसकीचा दिसतो अंत ।
स्वातंत्र्य हे टिकणार कसे

आहे मनाला हीच खंत ।

महाराज कोणी होतो बाबा
म्हणतो आहे मीच संत ।
व्यभिचारी इथे दुराचारी
होऊन फिरतात मोठे महंत ।

राजकारण्यांचे नाव नको
दाखवतील ते वाचले ग्रंथ ।
तोडा फोडा राज्य करा
एकच त्यांचा मूळ मंत्र  ।

जाती जातीत द्वेष किती
विचारतात ते कुठला पंथ ।
हिंदू मुस्लिम शीख ईसाई
मारा मारा कोण म्हणतं ।

नाही उरली माणुसकी हो
चिरडतात ते जसा जंत ।
विनाशाच्या वाटेवरचा
समोर दिसतो होईल अंत ।
Sanjay R.



Wednesday, August 14, 2024

मन झाले माझे मोर

मन झाले माझे मोर
रात्रीची जणू चंद्र कोर ।
उनाड हा वारा नी
आहे पावसाचा जोर ।
नाच नाचू मी कसा
भिजले अंगण समोर ।
झुलते हे झाड किती
ठेवला बांधून दोर ।
मन मुक्त जयाचे
नाचतो तोही पोर ।
मन झाले माझे मोर
जणू रात्रीची चंद्र कोर ।
Sanjay R.


Tuesday, August 13, 2024

मित्र

एकेक लागला गळायला
नी पाय माझे वळायला ।
काळ लोटला वेळ लोटली
मित्रांसाठी लागलो हळहळायला ।

दिवस तेव्हाचे आठवतात
भारी वाटायचे याच मित्रात ।
शाळा सुटली नोकरी लागली
काम काम तेच होतं कर्मात ।

आता थोडी मिळाली उसंत
बोलावे भेटावे वाटत मित्रांना ।
पण तेही निघालेत दूर आता
सांगा थांबवू कसे मी सर्वांना ।
Sanjay R.