Saturday, June 26, 2021

" वाट मी पाहतो "

वाट मी पाहतो
कधी येशील तू ।
वाटेवर डोळे आता
वळून बघशील तू ।

मनात ओढ तुझी
आतुर झाली नजर ।
मागोवा घेती कान
श्वासांचीही थरथर ।

आहे उभा मी वाटेत
थकले पायही आता ।
गती हृदयाची वाढली
आठवे मनातली गाथा ।

फुलले मन माझे
दुरूनच तुला बघून ।
हरपलो तुझ्यात मी असा
गेली त्यातच तू निघून ।
Sanjay R.


" नको वाटते ही शांतता "

नको वाटते ही शांतता
गोंगाटच हवा ऐकायला ।
सवय झाली माणसांची
हवे ना कोणी बोलायला ।
होते कधी चीड चीड
हात ही उठतात मारायला ।
शांतता मात्र नको वाटते
शॉटच हवा थोडा डोक्याला ।
पहाटे चाले किलबिल पक्षांची
दिवसभर ऐकायचे गोंधळाला ।
रात्री असते निरव शांतता
नसतो कुणीच जागायला ।
रातकिडे मग देतात हाक
भूतच निघतात नाचायला ।
म्हणून वाटते नको ही शांतता
सोबत हवेच कोणी हसायला ।
Sanjay R.

" खेळ हा लपाछपीचा "

कसा खेळ हा लपाछपीचा
होते चुकामुक दोष कुणाचा ।
विलंब होतो थोड्या क्षणाचा
छळ होतो निर्दोश मनाचा ।
हवा घडीभर वेळ सुखाचा ।
नको लवलेश त्यात दुःखाचा ।
जीवनात ऊन पाऊस कधी वारा
आसरा मज आहे सावलीचा ।
Sanjay R.


Friday, June 25, 2021

" भावनांचा खेळ सारा "

भावनांचाच खेळ सारा
विचारांचा झुलतो वारा ।
काय येईल मनात केव्हा
मधेच चमकून जातो तारा ।
सहजच मग आठवण येते
धुंद होतो प्रकाश सारा ।
आठवणीच कधी देती दुःख
वाहे डोळ्यातून टपटप धारा ।
Sanjay R.

Thursday, June 24, 2021

" कसली ही लढाई "

अस्त्र नको, शस्त्र नको
कशी ही लढाई ।
पैशाच्या बळावर
मारायची नुसती बढाई ।

निर्बल बघून सारे   
करतात मग चढाई ।
निरपराधी जातात बळी
म्हणे  कोण कुणाचा भाई ।

नाव किती गाव किती
वाळत नाही शाई । 
खबरे मागून खबर येते
जातो जीव त्राही ।

विचारांना थारा कुठे
सारे उचलतात बाही ।
रक्त गळते डोळ्यावाटे
पुसायला कोणी नाही ।

मनातच उठतात ज्वाला
होते लाही लाही । 
दूर निपचित पडले प्रेत
बघते दिशा दाही ।

हरलो जिंकलो वाद कुठला
मी जगतो शाही ।
सांगू नका वरचढ कोण
कोण कुणाला पाही ।
Sanjay R.