Friday, November 29, 2019

" शिक्षण वाटे एक भार "

वाटे शिक्षण साऱ्यास
जीवनाचा आधार ।
होईल कमी थोडा
या गरिबीचा भार ।

पण हा तर आहे
फक्त एक विचार ।
होते बंद कसे
उपजीविकेचे दार ।

उच्च शिक्षित किती
झालेत कसे बेरोजगार ।
नोकरी विना भटकती
बघा सारेच हुशार।

सांगा हुशार किती
आपले हे सरकार ।
अर्ध्या आयुष्याचा
केला कसा बाजार ।

दिला शिक्षणाने
युवकांना कसा आजार ।
घेतला हिसकावून
जगण्याचा आधार ।

काम धाम नाही कुणा
वाटे घरात तो भार ।
हाच तर आहे बघा
शिक्षणाचा सार ।
Sanjay R.

Thursday, November 28, 2019

" जाऊ नकोस दूर "

जाऊ नकोस दूर
मन माझे आतुर
गुंजतो कानात सूर
झरे आसवांचा पूर
का झालास फितूर
हृदय झाले चुरचुर
नको होऊस क्रूर
अंतरात रे तूच
जाऊ नकोस दूर
Sanjay R.

Wednesday, November 27, 2019

" पडकी विहीर "

कान अधीर
डोळे भिरभिर ।
श्वास थांबले
सुटला धीर ।
शब्द सुचेना
मन अस्थिर ।
सांज ढळली
झाला उशीर ।
रात किडेही
करती किरकिर ।
काळोखात ती
पडकी विहीर ।
कुणी हसले
सुटले तिर ।
स्वप्न सरले
मिटली लकीर ।
Sanjay R.

Tuesday, November 26, 2019

" लोकशाहीला जीवच नाही "

ही कशी हो
लोकशाही ।
हसताहेत सारे
दिशा दाही ।
हरले जिंकले
पुढारी काही ।
बहुमत मात्र
कुणालाच नाही ।
खुर्ची साठी
त्राही त्राही ।
सत्ते साठी
स्वप्न पाही ।
कुणी सारतो
शर्टाची बाही ।
बोलतो दुसर्यास
नाही नाही ।
नीतीमत्ता तर
धारा शाई ।
लोक शाहीला
जीवच नाही ।
Sanjay R.

" मनातलं खूप सारं "

मनातलं खुप सारं
मनातच असू द्या ।
गालावर फक्त
हास्य दिसू द्या ।

डोळ्यातली आसवं
डोळ्यातच असू द्या ।
आसवांची फुलं
डोळ्यातून गळू द्या ।

कान किती तीक्ष्ण
सारच त्यांना ऐकू द्या ।
चांगलं ते सोडून
बाकी सारं विसरू द्या ।

मुखी शब्दांचे भंडार
त्यांनाही थोडं हलू द्या ।
जिंकायचे असते मन
शब्द तशेच बोलू द्या ।

आभाळ विचारांच उरी
त्यालाही थोडं धावू द्या ।
गर्जनाऱ्या आभाळातून
बरसात सुखाची होऊ द्या ।
Sanjay R.