Thursday, December 24, 2020

" ती "

सुंदर की अति सुंदर , काय म्हणू मी तिला. सौंदर्याची मलिकाच ती , सौंदर्यवती म्हणू तिला. रंग तिचा गोरा पान , डोळे जशे हरिणीचे, नाक सरळ गाल थोडे गोबरे, ओठ मधूघट जसे. बोलणेही अत्यंत लघवी वाटायचं बस बोलतच राहावं, कुणाही नवख्याला वाटावं बस बघतच राहावं.
पोशाख तिचा असला जरी साधा, शोभतो तिलाच तो तिच्यासाठीच असावा.

सूर्याच्या प्रथम किरणा आधीच ती उठायची. सूर्य डोक्यावर येईस्तो काम सारेच ती सम्पवायची.
दुपार तिची असायची आरामाची सायंकाळ मात्र फिरायची. फिरायला निघाली ती की, येणारे जाणारे लोक तिला न्याहाळायचे. सौंदर्य तिचे डोळे भरून बघायचे. सहजच शब्द दोन निघायचे, वाह अति सुंदर सारेच मनात म्हणायचे.

अस्त व्हायचा सूर्याचा त्या आधीच ती परतायची. घरात ती आहे की नाही कधीच कुणास ती नाही कळायची. मात्र सुर्योदयानंतरच ती परत दिसायची.
झाशीची राणी कधी भासायची. कधी स्वतःतच वावरणारी साधी सरळ जशी सवित्रीच वाटायची.
आज मात्र ती वाटत होती वेगळी. सुर्योदया आधीच तिची कामं आटोपली होती सगळी. काय विशेष असावं काहीच कळेना. चेहऱ्यावरचे भाव तिच्या कशाशीस जुळेना. बघत होती सारखी दूर त्या वाटेवर. घेत होती अंदाज दिसतंय कोण रस्त्यावर.
सारखे तिचे सुरू होते आत बाहेर जाणे. वाटेकडे बघून यायचे लक्षात हिरमुसणे.

आता मात्र तिची उत्कंठा होती वाढली . वाटेवरची नजर तिने नाही आता काढली. तेवढ्यातच एक आटो येऊन थांबला तिच्या दारात. मर्द मराठा सैनिक उतरला तिथे तोऱ्यात. ओवाळणीचे ताट घेऊन आली ती अंगणात . मर्दाला ओवाळताना हसत होती गालात .

पतीचं होता तिचा भारतीय सैन्यात. लग्न करून गेलेला पहिल्यांदाच येत होता घरात. बघून पोशाख त्याचा सैनिकाचा उर आला तिचा भरून , तोही गोड हसला स्यालुट तिला करून .

आता बाहेर निघताना एकटी ती नसायची. नवऱ्यासोबत फिरताना सारखी ती हसायची.
एक महिना गेला कसा कळलेच नाही कुणा.
परत आता एकटेपण सांगा काय तिचा गुन्हा .
घरदार सोडून तो जातो देशासाठी सीमेवर.
तरीही लवलेश नसतो दुःखाचा पत्नीच्या त्या मुखावर. पती जेव्हा असतो देशाच्या त्या सीमेवर. पत्नीही लढते इथे एकाकी त्या जगण्यावर .
कधी मधी येऊन जातात भाऊ बहीण नातेवाईक. मात्र लढते ति एकटीच होऊन स्वतःही सैनिक दुःख तिचे तिलाच ठाऊक.

डोळे असतात वाटेवर आणि कान टीव्ही वरच्या बातम्यांवर. सीमेवरच्या तणावाची बातमी ऐकून उठतो काटा मनावर . करते मग ती धावा देवाचा, म्हणते सुखरूप ठेव देवा कुंकू हे माझे. येईल जेव्हा दारी तुझ्या , फेडील नवस सारेच तुझे.

यावेळी मात्र दिलं देवानं एक वरदान. गर्भात तिच्या वाढू लागला अंकुर एक छान. बातमी आनंदाची पतीला तिने दिली. सीमेवरच होता तो सहजच म्हणाला , मुलगी आपणास झाली तर नाव ठेऊ या मिली. दोघनच्याही मनात नव्हता आनंद मावत. वाटतायचं त्याला कधी आत्ताच उठून जावे घरी धावत.

दिवसामागून दिवस गेले. लेकीचे पाय घरात आले.
कौतुक बघाया नव्हते कोणी. बाप तिचा सीमेवर लेक मात्र गुणी. मधेच बाप येऊन गेला. लेकीचे लाड करून गेला. नव्हते वाटत जावे परत. मात्र सुट्ट्या सम्पताच मनावर दगड ठेऊन गेला तो परत. वर्षातून दोनदा यायचा तो घरी. लाड कौतुक करायचा खूप, बघून आपली परी.

आई सारखीच सुंदर दिसायची त्याची ती मिली.बोबडे बोल बोलायची , जय भारत म्हणून स्यालुट जोरात करायची. बाबांचा तिच्या तिला होता अभिमान. देशाबद्दल मनात तिच्या भारीच सन्मान. हळूहळू मोठी होत होती लेक. मोठे झाल्यावर बाबांसारखेच सैन्य दलात जायचे स्वप्न तिचे एक.

दिवसामागून दिवस वर्षामगून वर्ष जात होते असेच. दृढ होत होता निश्चय ,आयुष्य आपले देशासाठीच द्यायचे. आणि सीमेवरून एक दिवस खबर आली  बाबा शहीद झाले. शेवटचा स्यालुट करत अश्रूपूर्ण नेत्रांनी स्वप्नपूर्तीचे आश्वासन बाबांना तिने दिले.
Sanjay R.







No comments: