Tuesday, December 8, 2020

" पार्वता "

पर्वता वय वर्षे असावे तीस बत्तीस. उंचीही मध्यम बांध्याची . अंग काठी तिच्या उंचीला साजेशी.  रंग काळा सावळा . केस तेल न मिळाल्याने थोडे पिंगट सोनेरी झालेले. नाक थोडे लांब आणि डोळे अगदी कोरीव वाटावे असे .  गालावर नेहमीच हास्य असणारी. तिला सुंदर अस म्हणता येणार नाही पण तिचा चेहराच असा की कुणालाही आकर्षित करेल असा.  तिचा नवरा म्हादू मात्र अगदीच वेगळा. वाटेल यान मागची आंघोळ कधी केली असेल , महिना तर नक्कीच झाला असेल . वयाचा अंदाजच येणार नाही असा. कृश झालेले शरीर. डोक्यावर केस वाढलेले. दाढी मिशी आडवी तिडवी वाढलेली आणि त्यातच त्याचा चेहरा लपलेला. अंगावर फटके कपडे  म्हणजे काय तर फटका पायजामा आणि फाटका सदरा. हात नेहमीच काळ्या वंगणाने भरलेले. त्याचा हा नेहमीचाच असा अवतार असायचा. पण कोणीही आवाज दिला की तो पुढ्यात हजर असायचा. सांगेल ते काम करायचा . आणि दिले तेवढे पैसे घ्यायचा. दुपारी पर्वता त्याची शिदोरी घेऊन यायची आणि म्हादू जेवण करून संध्याकाळ पर्यंत ते काम करायचा. मात्र सायंकाळी काम आटोपतच त्याला नकदी पैसे लागायचे. सायंकाळी मिळालेले सगळे पैसे तो दारूत घालवायचा. पैसे मिळाले की सरळ पार्ध्यांच्या बेड्यावर जाऊन खिशात असेल तेवढे पैसे पार्ध्यापुढे टाकायचा आणि वाटेल तेवढी दारू प्यायचा . आणि मग झिंग आली की बेड्यावरच कुठेतरी पडून रहायचा.  आणि मग रात्री केव्हा तरी पर्वता त्याला शोधत बेड्यावर यायची आणि त्याला  उठवून घेऊन जायची. तो तसाच मग जेवण न करताच झोपून जायचा. हा असा क्रम अगदी नेहमीचाच झाला होता.  घराचा सगळाच भार पर्वतावरच होता. लग्नाला दहा बारा वर्षे होऊनही घरात पाळणा हलला नव्हता. त्यामुळे घरात दोघे होते.
म्हदूचे आई वडील त्याच्या लहान पणीच साथीच्या रोगात गेले होते. पर्वताला तिची आई वडील भाऊ होते पण ते लांब दुसऱ्या गावात असल्यामुळे त्यांचे पण पर्वताशी जास्त सम्बन्ध येत नव्हता. त्यांनी तिचे लग्न करून देऊन आपले कर्त्यव्य पूर्ण केले होते. आणि ते पर्वताच्या बाबतीत बिनधास्त झाले होते. पर्वतानेही कधी आपल्या संसाराची वाच्यता आपल्या आई वडिलांकडे कधी केली नाही. कारण तिला माहिती होते की तिलाच आपला संसार चालवायचा आहे. आई वडीलही गरिबीतच जगत आहेत त्याना सांगून काहीच उपयोग होणार नव्हता. उलट त्यांनी तिलाच दोष दिला असता की तिला तिचा नवरा व्यवस्थित सांभाळता आला नाही. माणूस सांभाळणं बाईच्याच हाती असते. भल्या बुऱ्याचा विचार दोघांनी मिळून करायचा असतो. त्यामुळे पर्वता आपल्या नशिबात असेच असेल म्हणून सारेच सहन करत होती.
नेहमीप्रमाणे आजही पर्वता सकाळी उठली. घरातले काम धाम ही सम्पले तरी म्हादू उठला नव्हता. तिने थोडे दुर्लक्ष करून स्वैपाकाची तयारी केली. तिचा स्वैपाक आटोपला तरीही म्हादू उठला नव्हता. म्हणून ती म्हादू जवळ गेली. आज का कामाले जाच न्हाय का म्हणत तिने म्हादू च पांघरून काढलं  तर म्हादू तसाच पडून होता. तिने त्याचा अंगाला हात लावला तर त्याचे अंग भयंकर तापत होते. तिने त्याला कडावर लोटले तरी तो काहीच हालचाल करत नव्हता. तिला मग मात्र घाबरल्या सारखे झाले. म्हादुचा स्वास मात्र चालू होता. तो मूर्च्छित झाला होता. ती तशीच घराबाहेर आली कुणाला तरी मदतीला बोलवावे म्हणून तिने आजूबाजूला कोणी दिसतो का ते बघितले दूर तिला म्हातारे तानाजी दिसले. तिने त्यांना आवाज दिला आणि घरात बोलवले. तानाजीने म्हादू ला बघितले तर तेही थोडे घाबरलेच. त्यांनाही काही कळले नाही की म्हादुला काय झाले असेल ते.
मग त्यानीच सुचवले याले डॉगतर कड न्या लागते बाई, पाय तू कस करते तं पर डॉगतर शिवाय काई होणार न्हाई. लवकर न्या लागते .  आणि तानाजी निघून गेला. तशी पर्वता विचार करतच बाहेर आली आता याले कसं न्यावं डॉगतर कड, डॉगतर त पाच कोस दूर रायते. गाडी घोडा पहा लागते पर त्याला बी पैसे लागन आन डॉगतरलेबी पसे द्या लागन मंग औशिध बी लागन त्याले बी पैसे पायजे. माया जोळ पाचशे हायेत तेच्यात होईन का सगळं. असा विचार करत करत ती रस्त्यावर आली. नशिबाने तिथे तिला पाटील भेटले. तेच बोलले काओ पर्वता आज कामाले न्हाई जाच का. म्हादू कुनकड गेला कामाले. मग तिने पाटलाला सगळं सांगितलं. तसं पाटलाने आटो वाल्याला आवाज दिला. अरे बाबू पाय बर म्हादू बिमार हाये त्याले घेऊन जाय डोकटर पाशी. भर सवाऱ्या लोकर लोकर न निंग पटकन्या. तसं आटोवाल्याने पटापट सवाऱ्या भरल्या आणि आटो म्हादू च्या घरापुढे आणला. लोकांनीच म्हादू ला धरून आटोत टाकला सोबत पर्वताही बसली. आणि ते डॉक्टर कडे पोचले. डॉक्टर ला पेशन्ट चा अंदाज आला त्यांनी पटापट दोन इंजेक्शन लावले आणि औषधींचा कागद लिहून म्हणाले. मी हे औषध देतो पण याचे लिव्हर खराब होत आहे. दारू पूर्ण बंद करा लागेल नाहीतर काहीच खरे नाही. इंजेक्शन मूळे म्हादू ला  होश आला होता. तो पर्वता कडेच टुकुर टुकुर बघत होता. तशी पर्वता त्याला म्हणाली पेत जाना दारू आन मंग मर असाच. तुले काय हाये. महाच नशीब फुटक. तुह्या पदरी पडली. कोणतं सुख देल तुन मले. आता तं मराले टेकला. तुह्या दारू पाई सगळा सत्यानाश झाला. चार पैसे बी न्हाई ठिवले तुन पदराले बांधून . आणि ती रडायला लागली.
तिचे रडणे आज म्हादू च्या काळजात पोचत होते. पण त्याच्याच्याने काहीच बोलणे होत नव्हते. तो तसाच शांत पडून पर्वता कडे बघत होता.

संजय रोंघे
नागपूर



No comments: