Wednesday, December 18, 2024

आस

सांग मी तुज शोधू कुठे
का असा तू लावला ध्यास ।
मनात आठवणींचा सागर
नी मिलनाची आहे आस ।

भिर भिर ही होते नजर
पडतात मंद का हे श्वास ।
का धडधडते ही छाती
वाटतो बरा का एकांत वास ।

हरवतो मग मीही मलाच
सोसतो हवे नको ते त्रास ।
एकेक क्षण होतो कठीण
चढते धुंद नी तुझेच भास ।

सारून तो मधला पडदा
ये ना सखे मज तुझा हव्यास ।
तुझ्याविना नको मज काही
आहेस तुच माझा एक श्वास ।
Sanjay Ronghe


मज ते काय हवे

शब्दांनी तुझ्याच आता
गुंफले मी हे काव्य नवे ।
बघ डोळ्यात. तू एकदा
दिसेल मज ते काय हवे ।

बघतो आकाश मी जेव्हा
नसते तिथे ते आभाळ ।
मात्र डोळ्यात दिसते सारे
वाटते झाली आता सकाळ ।

जाते अंगही हे शहारून
हलतो जेव्हा गार वारा ।
कुठे शोधू मी सांग जरा
भर दुपारी कुठला तारा ।

तू धरा आणि मी आकाश
मधेच येतो तो ढग काळा ।
सारून ते नभ तू ये जरा
नको विझवू आता ज्वाळा ।
Sanjay R.


Tuesday, December 17, 2024

आसवात भिजले सारे

डोळ्यात शोधतो मी
हरवलेले एक स्वप्न ।
आसवांनी भिजले सारे
विसरलो तेही जपणं ।

प्रकाशात सूर्याच्या ही
असते आग पेटलेली ।
अंधार असू देना रात्री
भूक पोटाची तापलेली ।

वेदनांना कुठले औषध
मन मनात सोसते सारे ।
उठे शब्दा शब्दात हुंदका
आभाळ भरून तारे ।
Sanjay Ronghe


Saturday, December 14, 2024

थंडी थंडी नाव तिचे

मी परत येईल म्हणत
आलीच ती परत  ।
नको नको म्हंटले तरी
सुटली आम्हा छळत ।

चार दिवस होते बरे
आता नाहीच सोसवत ।
स्वेटर मपलर लपेटले
तरी नाही ती ढळत ।

रजईतच वाटते बसावे
नाही काहीच कळत ।
पेटवा जरा शेकोटी
असू दे तिला जळत ।

हात पाय झाले थंड
बोटं ही नाही वळत ।
दिवस आता मोजतो मी
जाईल केव्हा पळत ।

थंडी थंडी नाव तिचे
असते सळ सळत ।
बरी ही वाटते जराशी
मन फुलवते नकळत ।
Sanjay Ronghe


Friday, December 13, 2024

जगू दे रे बाबा

कशाला कुणाशी तू
असा खाजवतो रे बाबा ।
आपलेच विचार का
असा गाजवतो रे बाबा ।

जगायचे तुला आहे जसे
मला ही तू जगू दे रे बाबा ।
सरल्यावर सगळ्यांनाच तर
तिथे जायचे आहे रे बाबा ।

असेल रे ज्ञानी जरा तू मोठा
अज्ञानी आम्हीच बरे रे बाबा ।
जगतो मारतो करून कष्ट
बहुत इथे दुष्ट नको रे बाबा ।

माणूस माणसाचा शत्रू कसा रे
मैत्रीचे हे ढोंग नको रे बाबा ।
जगण्या मरणाची भीती कुणाला
आहे तोवर तर जगू दे रे बाबा ।
Sanjay Ronghe