Thursday, July 11, 2024

थांब पावसा जरासा

येता पावसाची सर
आला सृष्टीला बहर ।

हिरवे झाले रान
भरे डोळ्यात छान ।

भरले नदी नाले तलाव
नी पोहू लागली नाव ।

फुलला किती आनंद
मनही झाले कसे धुंद ।

पाठ सोडीना आभाळ
घेतले रूप त्याने विक्राळ ।

पाणी पाणी पुर आला
घेऊन उत्साहच नेला ।

घरा घरातली कहाणी
सांगे डोळ्यातले पाणी ।

घर पाण्यात बुडाले ।
छत वाऱ्यासंगे उडाले ।

धरा दुःखात बुडाली
काया तिची झाली ओली ।

दुःख मनात भरले
दिसेना उपाय हरले ।

थांब पावसा तू जरासा ।
हवा थोडासा रे दिलासा ।
Sanjay R.



कपाट

नकळत पडली तुझ्याशी गाठ
आठवणींनी हे भरले कपाट ।
दूर किती आलो कळलेच नाही
वाटतं आता का सरली ती वाट ।
केल्यात लाटा किती त्या पार
सुख दुःख पाठीशी शोधतो काठ ।
सरला दिवस आता रात्र सोबतीला
कळतं मलाही होणार नाही पहाट ।
Sanjay R.


Wednesday, July 10, 2024

भाव भावना

असे ती मनात त्याच्या
फिरते मन भोवती तिच्या ।

तिचा जरी तोच सर्वस्व
पण जग आहे ना फसव ।

माया आईच्या मनात
ढळतात अश्रू क्षणात ।

बाबा झेलतात जरी घाव 
समाज थांबवितो धाव ।

भाव भावनांचा खेळ सारा
दूर जातो मग घेऊन वारा ।
Sanjay R.

Monday, July 8, 2024

कविता प्रकाशित

आज दिनांक 7 जुलै 2024 ला दैनिक तरुण भारत, आसमंत पुरवणीत माझी " पापणी ही ओली " ही कविता प्रकाशित झाली, संपादकांचे खूप खूप आभार .

Saturday, July 6, 2024

पहिल्या पावसाचा आनंद

पहिल्या पावसाचा किती आनंद
धराही होते भिजून कशी धुंद ।

अचानक अवतरतात ढग काळे
मधेच डोकावते आकाश निळे ।

थेंब थेंब जेव्हा बरसतो पाऊस
चिंब भिजून मग फिटते हौस ।

वृक्ष वेली संगे धरा होते आनंदी
दरवळ फुलतो हवा होते सुगंधी ।
Sanjay R.