Saturday, June 15, 2024

बरसू दे सर आता

बरसू दे ना सर आता
येऊ दे पाऊस जोरात ।
घामाने या भिजलो चीप्प
भिजावे वाटते पावसात ।

झाडांची पाने गळली
गवत झुडपे कशी वाळली ।
ऊन गर्मी म्हणते मी
उन्हापाई वाचा वळली ।

एसी कुलर सारे थकले
विहीर नाले किती सुकले ।
निसर्गाने टाकली मान
मोठमोठे वृक्ष ही झुकले ।

येरे येरे पावसा आता
भिजू दे ना काळी माती ।
पेरलेले रुजेल तेव्हा
पिकेल रे आमची शेती ।

चार पैसे येतील पदरी
मिटेल हा भुकेचा ध्यास ।
दर वर्षी तर तुझ्यावरच
शेतकऱ्याची असते आस ।

संजय रोंघे, नागपूर.
मोबाईल - 8380074730


Friday, June 7, 2024

नाते

मनात एक आशा
अंतरात ही ओढ ।
लागेना तुजवीण मज
काय कसे ते गोड ।
मनास हवी मनाची
एक तीच जोड ।
नको ताणू हे नाते
हट्ट तू जरासा सोड ।
Sanjay R.


वेड पावसाचे

होऊ नको तू वेडी
बरसेल हा पाऊस ।
भिजून त्यात चिंब
फिटेल सारी हाऊस ।

येईल ती सर धाऊन
सोबतीला असेल वारा ।
ठेव सांभाळून पदर
डोईवर पडतील गारा ।

बेधुंद मोकळे हे मन
होईल किती आनंद ।
फिटतील साऱ्या आशा
हवा वाटतो तो सुगंध ।
Sanjay R.


पाऊस

वेड पावसाचे मज
चिंब भिजते मन ।
ओघळतात धारा
ओले ओले तन ।

गरजते आकाश
दाटले त्यात घन
लखलखून जाते
वीज एक क्षण ।

होता ओली धरा
हिरवे होईल रण ।
वाटे वेचावा मज
पावसाचा येक कण ।
Sanjay R.


Wednesday, June 5, 2024

पंख

स्वप्नांनाही असतात पंख
येतो गगनात मी फिरून ।
सहजच मनाला वाटतं मग
बघावं तुझ्या हृदयात शिरून ।
Sanjay R.