Thursday, October 20, 2022

आठवण

आठवणीनेच मला
होतो किती आनंद ।
वाटतं आता जडला
मला तुझाच छंद ।

तुझ्या आठवणीत
शोधतो मी गंध ।
येशील का जवळ
होशील का सुगंध ।

तुझ्या नि माझ्यात
जुळला एक बंध ।
जवळ आलो की
का होतो मी बेधुंद ।
Sanjay R.


मन झाले सैरभैर

मन झाले सैरभैर
सावरू कसे मी त्यास ।
सुचेना मज काही
सदा असे तुझा ध्यास ।

मनात एकच आस
त्यातही आहे विश्वास ।
बरसतील सरी आणि
भिजतील चिंब श्वास ।

नको सावरू तू मन
नको आवरू तू तन ।
चल जाऊ दूर कुठे
तिथे घालवू दोन क्षण ।
Sanjay R.


नाव ही जीवनाची

अथांग सागरात निघाली
नाव ही जीवनाची ।
नाही ठाउक किनारा
ओढली चादर आकाशाची ।

नकळे मी जाऊ कुठे
मावळल्या साऱ्या आशा ।
सूर्य होता सोबतीला
ठरवली त्यानेच दिशा ।

सूर्य मावळता आकाश्यातून
लागला चन्द्र दिसाया ।
चांदण्यांनी दिली वाट
लागलो मीही हसाया ।

पहाटेला लागला किनारा
होता गार गार वारा ।
पक्षांची झाली किलबिल
आला सूर्य होऊन तारा ।
Sanjay R.


Wednesday, October 19, 2022

जीवनाच्या वाटेवर

जीवनाच्या वाटेवर
किती इथे प्रवासी ।
जगताहेत सारेच
काही त्यात हौसी ।

सुख असो वा दुःख
कुणी सदा रडतो ।
कुणी अडखळून
वाटेतच पडतो ।

काटेकुटे दगड धोंडे
वाट आहे कठीण ।
हसत हसत करू पार
येईल कशाला शीण ।

लोभ नको मोह नको
करतात आम्हा दिन ।
बघा एकदा करून
माणूसच हवा लिन ।
Sanjay R.


Tuesday, October 18, 2022

रेशीमगाठ

बांधली तू गाठ जशी
जीवनात माझ्याशी ।
सोडू नकोस आता
भांडलो जरी तुझ्याशी ।

घरातली भांडी जशी
आवाज तर करतातच ।
तुझ्या माझ्यातला वाद
असू दे तेवढ्या पुरताच ।

सदा असाच फुलू दे
नात्याचा हा रेशमी बंध ।
निघेल उजळून घर सारे
दरवळेल प्रेमाचा सुगंध ।
Sanjay R.