Saturday, September 25, 2021

" जपायचं सारं अंतरात "

वेळ लागतो थोडा
काही मिळवायला ।
मन असेल ते तर
त्यालाही ओळखायला ।
क्षणही असतो अपुरा
सर्वस्व गमवायला ।
नातं असो वा वस्तू
नको कधी हरवायला ।
जपायचं सारं अंतरात
पुरेल जन्मभर जगायला ।
Sanjay R.


Friday, September 24, 2021

" मन कुणावर जडते "

सारंच काही अडते
जेव्हा मन कुणावर जडते ।
सांगून कुठे काय होते
नकळतच सारे घडते ।

विसर पडतो सारा
मिळता प्रेमाची साथ ।
सुचेना काही कशाचे
सदा मन असते गात ।

प्रीतीची तऱ्हाच वेगळी
ऐकेना मन मनाचे ।
विचार असे फक्त एकच
करू काय या मनाचे ।
Sanjay R.


बाप - राणी भाग आठ

      आता हळूहळू मुलांचे आणि राणीचे जमायला लागले होते. राणी मुलांना मुद्दाम वेळ काढून त्यांच्याशी कधी गप्पा कधी मुलांना बाहेर घेऊन जाणे, कधी त्यांच्या अभ्यासात मदत करणे, कधी त्यांच्या आवडीच्या वस्तू आणून देणे, तीन के हवे काय नको त्याकडे लक्ष ठेवणे याकडे जास्त लक्ष देत होती. त्यामुळे मुलं खुश होती. मुलांना खुश बघून नाईकही खुश असायचे. त्यांच्याकडेही राणी तेवढेच लक्ष द्यायची. त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करायची. दोघनमध्ये प्रेमही वाढले होते. नाईक स्वतःच राणीला तिच्या कामात पण छोटी मोठी मदत करायचे. त्यामुळे दोघांमधली जवळीक अजूनच घट्ट झाली होती. नाईक कधी कधी राणी साठी मोगऱ्याचा गजरा आणायचे.  राणी तो गजरा मळून नाईकांच्या रम मध्ये जेव्हा जायची. वातावरण मोगरीच्या सुगंधाने धुंद व्हायचे. नाईकांचा कल ओळखून ती त्यांच्या मिठीत विसावायची. मग ती रात्र त्या दोघांची सम्पूर्ण सुखाची रात्र असायची. इतकं प्रेम इतका आनंद राणी साठी मात्र एक पर्वणी असायची. तिने अगोदर कधीच तो आनंद ते प्रेम तो सहवास अनुभवला नव्हता. ते तिच्यासाठी स्वर्ग सुखच होते.

       राणीचे आता आनंदाचे दिवस परत सुरू झाले होते. तिला आपल्या संसाराला आनंदी करायची जणू किल्लीच गवसली होती. मुलं पण आता तिच्या सोबत खूप आनंदी होते. त्यांना आता समज आली होती. राणी त्यांच्या साठी किती धडपडत असते हे ते बघत होते. तेही राणीला छोटी मोठी मदत करायचे. दुपारी एकटी असताना मात्र तिला बिलकुल करमत नसे. मग ती काहीतरी काम काढून त्यात आपले मन रमवायची तर कधी सरिता ताई कडे जाऊन यायची. कधी त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जायची. त्यामुळे सरीतालाही राणी बद्दल आपुलकी प्रेम वाटायचे. तिनेही राणीला आपली भावजय म्हणून स्वीकारले होते.

       आज राणी एकटीच घरात बसून आपले काम आटोपत होती. मुलं शाळेला गेली होती. नाईक ऑफिसला गेले होते. अचानक दार वाजले तिने कोण म्हणून दार उघडले . तर समोर तिच्या  जुन्या घरापुढे राहणारे गृहस्थ उभे होते. क्षणभर राणीला काही सुचलेच नाही. ती आपले जुने आयुष्य पूर्णतः विसरली होती. आता तिला कुणाचीच आठवण येत नव्हती. आई तिच्या दुःखातून मुक्त झाली होती. बाप कुठे गेला ते कळलेच नव्हते. आणि आज अचानक ते गृहस्थ दारा पुढे बघून तिच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या . शेवटी ते गृहस्थच बोलले. राणी कशी आहेस . ठीक आहेस ना बेटा. मी सहजच इकडन जात होतो तर तुझी आठवण आली. तुला बघावसं   वाटलं. म्हणून आलो बघ. तुला एक निरोप पण द्यायचा होता. त्यांना राणीला तो निरोप देऊ की नको असे होत होते. मग तीच म्हणाली अहो काका सांगा ना काय निरोप आहे. कुणाचा निरोप आहे. काही झालं का सांगा ना. राणीची उत्सुकता वाढली होती. सोबत काळजी ही वाढली होती. ते गृहस्थ भानावर येत म्हणाले. राणी अग तुझा बाप, तो आजारी आहे. झोपडीत आता एकटाच पडून असतो. चार पाच दिवसच झाले तो आल्याला. मध्ये कुठे होता, कसा होता काहीच सांगत नाही. खूप आजारी आहे. शेवटच्या घटका मोजत आहे. फक्त तुझे नाव तेवढे घेतो. काही खात नाही पिट नाही. आम्हीच त्याला बघतो. आता त्याला कोण दवाखान्यात नेणार. बघ तुला जमलं तर तू जाऊन भेटून ये त्याला. कदाचित तुझ्या भेटीने त्याला मुक्ती मिळेल. बघ बेटा तो तुझा बाप होता. कसाही असेना पण बाप तर होता ना. एकदा भेट त्याला. आणि मुक्त कर या जीवनातून. आणि ते गृहस्थ निघून गेले.

        राणीला काय करावे काहीच सुचत नव्हते. तिच्या डोळ्यांना मात्र अविरत धारा लागल्या होत्या. शेवटी धीर एकवटून तिने आपला तोल सांभाळला. तिने नाईकांना घरी बोलवून घेतले. आणि त्या गृहस्थाने सांगितलेले सगळे नाईकांना सांगितले. नाईकही ते ऐकून व्यथित झाले. त्यानी ताबतोब राणीला सोबत घेतले आणि राणीच्या त्या झोपडीकडे दोघेही निघाले. झोपडीची बरीच तूट फूट झाली होती. दार उघडेच होते. आत राणीचा बाप पडून होता. त्याची हालत खूपच खराब दिसत होती. पोट पाठीला लागले होते. हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. चेहरा सुकून गेला होता. डोळे खोल गेले होते. तो डोळे मिटून पडून होता. जोरजोरात श्वास सुरू होते तोंडातून काही अस्पष्ट पुटपुटत होता. राणीने त्याला आवाज दिला बा बा पण त्याने बघितलेच नाही तेव्हा राणीने त्याला हलवून जागे केले. त्याने हळूच डोळे उघडले. आणि पुटपुटला राणी. राणी म्हणाला होय बा मी राणी आहे, बघ ना माझ्याकडे. मी आली आता, तू नक्की बरा होशील रे. राणीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी त्याच्या चेऱ्यावर समाधानाची लकीर उमटली. त्याने कसा बसा आपला हात उचलून राणीचा हात आपल्या हातात घेतला. आणि मुखाने उद्गारला बाई सुखी राहा. श्वास थांबले होते. चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसत होती. राणीच्या डोळ्यातून आसवे गळत होती.

        नाईकांनी अंतसंस्काराची पूर्ण तयारी करून अंत संस्कार आटोपले. आणि दोघेही घरी परतले.राणीला आपल्या बालपणासुनचे सम्पूर्ण चित्र दिसत होते. तिचे अश्रू थांबत नव्हते. आयुष्यभर कधीच लक्ष न देणारा बाप मरतेवेळी मात्र भरभरून आशीर्वाद देऊन गेला होता. त्याने तिच्या मांडीवर डोके ठेऊन आपले प्राण सोडले होते.
Sanjay R.


गुलाबजाम - राणी भाग सात

     जसजसे दिवस जात होते राणी बद्दलची मुलांच्या मनात धुसफूस वाढतच होती. राणी आपल्या परीने मुलांना खुश करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती पण त्यात ती असफलच होत होती. आज सकाळचीच गोष्ट बघा. मीतू ला आज शाळेला एक तास अगोदर जायचे होते पण त्याची कल्पना तिने राणीला दिलीच नाही. ती राणीला सांगायला विसरली. मग मात्र वेळेवर तिची खूप घाई झाली. राणीला पूर्व कल्पना नसल्याने ती आपल्या नेहमीच्या गतीने घरातली कामे करत राहिली. मीतूचा टिफिन, युनिफॉर्म प्रेस करणे, शूज पोलिश सगळेच व्हायचे होते. वेळ झाला असल्याने मीतू मग चीड चीड करायला लागली. ती राणीला म्हणाली बघ आई आता मला तुझ्यामुळेच वेळ होत आहे, माझा टिफिन, स्कुल बॅग, युनिफॉर्म, शूज तू काहीच तयार करून ठेवलं नाहीस. टीचर  उशीर होण्याचं कारण विचारतील तर मी तुझंच नाव सांगणार. तूच मला तयार केलं नाहीस. आता लेट तर नक्कीच होणार. तू नेहमी अशीच करते. आमच्याकडे लक्षच देत नाहीस. नेहमी आपलीच कामं करत असतेस.  आम्हाला मुळीच मदत करत नाही. तुझ्यामुळे आमचं नुकसान होत आहे. पप्पा बघा ना आता मला किती वेळ होणार, आज टीचारनी एक्स्ट्रा क्लास साठी एक तास अगोदर बोलवले, पण आईने माझे अजून काहीच करून दिले नाही. मी आता आईमुळेच लेट होणार. सांगा ना तिला काही. ती आमचे काहीच ऐकत नाही.


     मीतूचे बोलणे ऐकून नाईकांच्या मनातही राणी बद्दल थोडा रोष निर्माण झाला. मात्र तिकडे राणीची सारखी धावपळ सुरू होती. तिची ती धावपळ बघून ते शांतच राहिले. राणीने मीतूचा युनिफॉर्म प्रेस केला. तिची स्कुल बॅग रेडी केली. आणि तिला स्कुल साठी तयार करायला लागली. त्यात तिचा टिफिन भरायचा राहिला. तशी ती मितूला म्हणाली . मीतू बेटा तू सावकाश स्कुल मध्ये जा. मी तुझा टिफिन नितु जवळ देते. स्कुल मध्ये तो आणून देईल तुला. जा आता लवकर जा स्कुल मध्ये , तुला वेळ व्हायला नको. पण अगोदरच चिडचिड करणारी मीतू अजूनच चिडली. काही नको मला टिफिन आज मी उपाशीच राहणार. तू टिफिन नितु जवळ पाठवूच नको. तुला बरंच आहे ना मी नाही जेवली तर. राणी नितुच्या बोलण्याने खूप नर्व्हस झाली. तिच्या डोळ्यात आसवे आली . तिने ते हळूच आपल्या पदराने पुसले आणि ती आपल्या कामाला लागली. तिला आता नाईकांची तयारी करायची होती. ती त्या तयारीला लागली. नाईक ऑफिसला निघून  गेले मागोमाग नितुही स्कुलला जाय साठी तयार झाला. तिने मीतूचा टिफिन नितु कडे दिला पण नीतूही मीतूचा टिफिन घेऊन जायला तयार नव्हता. तो म्हणाला , आई तू तिला टिफिन नाही दिला ना, मग मी कशाला नेऊ. आता तूच तिला नेऊन दे. मी टिफिन नेणार नाही. राणीने नितुला समजवायचा खूप प्रयत्न केला पण नितु ऐकायलाच तयार नव्हता. आणि तो तसाच स्कुल ला निघून गेला. राणीला मात्र आता रडणे आवरले नाही. तिच्या डोळ्यातून सर सर आसवे गळत होती.


      सगळी कामं तिने भराभर आटोपून घेतली आणि मग मीतूचा टिफिन घेऊन ती स्कुल ला जायला निघाली. वाटेतच तिला सरिता भेटली. सरिता नाईकांची बहीण. ती काही काम निमित्त बाहेर निघाली होती. राणी ला बघून तीच थांबली. तिनेच राणीला आवाज दिला. राणीचे सरीताकडे बिलकुल लक्ष नव्हते. ती आपल्याच विचारात घाई घाईने स्कुल कडे निघाली होती. सारिताचा आवाज ऐकून राणी थांबली आणि सारिताच्या जवळ पोचली. सारिताने तिला विचारले, काय ग राणी इतक्या घाई घाई ने कुठे निघालीस. घरी सगळे ठीक आहेत ना. कुणाला बरं नाही का. आणि कुठल्या विचारात आहेस तू. राणी फक्त सरिता कडे बघतच राहिली. तिला काय बोलावे तेच कळेना . तशी सरिता म्हणाली अगं तुलाच विचारतेय. काय झालं , तुला बरं नाही का. तू ठीक आहेस ना. तसे राणीच्या डोळ्यातून आसवं टपटप गळायला लागली. सरिता राणीच्या डोळ्यात आसवं बघून अजूनच घाबरली. अगं काय झालं सांग ना. तशी राणी बोलली ताई अहो आज मीतू  टिफिन न घेताच स्कुलला गेली. माझंच वेळेवर झालं नाही चूक झाली माझी. तिला मी टिफिन पोचवून येते. त्यासाठी निघाली होती. तशी सरिता बोलली,  ते ठीक आहे ग पण तू रडत का आहेस. दादा काही बोलला का तुला. तू टेन्शन नको घेऊस, मी सांगते दादाला .  तो असाच आहे. काही न समजून घेताच काहीही अर्थ लावून घेतो. मी समजवते दादाला. चल मी येऊ का तुझ्या सोबत. मला काही जास्त काम नाही. लवकर होईल माझे काम  वेळाने गेले तरी चालेल. चल मी  येते तुझ्या सोबत. म्हणून सारिताही तिच्या सोबत स्कुल कडे निघाली.


      दोघीही स्कुल मध्ये पोचल्या. त्या नितुच्या क्लास मध्ये पोचल्या. क्लास सुरू होता. राणीने टिचरला मीतूचा टिफिन आणल्याचे सांगितले. तसे टीचारनी मितूला बोलवून तिला तिचा टिफिन घेण्यास सांगितले. मीतू जवळ येताच राणीने मितूच्या डोक्यावरून हात फिरवला  आणि तिच्या हातात टिफिन देत म्हणाली मीतू बेटा , जेवण करून घेशील. छान हं  माझं बाळ . जा बस आता क्लास मध्ये. मी निघते. सारितानेही मीतूची पप्पी घेतली . मीतू क्लास मध्ये जाताच दोघीही परत निघाल्या . वाटेतच सारिताने आपले काम आटोपले. राणीने सरीताला घरी चलण्याचा आग्रह केला. मग दोघीही नाईकांच्या घरी आल्या. राणीने सरिता साठी चहा ठेवला. दोघीनीही आपला चहा संपवला. सारिताच्या मनात अजूनही प्रश्न कायम होता. राणी का रडत होती.  सारिताने राणीला परत विचारले काय गं मघाशी तू रडत का होतीस. मला काही सांगशील का.  तसे राणी परत रडायला लागली. तिने आपल्या मनात होणारी ओढाताण सरिता जवळ व्यक्त केली. मुलांची तिच्यावर होणारी चिडचिड , घरच्या कामात तिची होणारी ओढाताण सांगितली. सारिताने राणीला समजावले. अगं घरात हे चालतच असते. सगळं मॅनेज करावे लागते. हळूहळू जमेल तुला. आता मुलं मोठी होत आहेत. कळेल त्यानाही तू त्यांच्यासाठी किती धावपळ सहन करतेस ते. प्रेम द्यायचे प्रेम घ्यायचे हा नियमच आहे. तसही तू छान सांभाळलं आहेस सगळं. मुलांना आनंद कशात होतो ते शोधायचं. त्यांना आनंदी ठेवायचं. ते खुश असलेत की सगळे खुश असतील. तू टेन्शन नाही घ्यायचं. राणीला काही संसारतल्या टिप्स देऊन सरिता निघून गेली.


       राणीने दुपारचे आपले सगळे काम आटोपले. आज स्कुल मधून मुलांना खुश करायचेच त्यांना आनंदी करायचे असे तिने ठरवले. त्यासाठी काय करावे. राणीला काहीच सुचत नव्हते. तेव्हा राणीला आठवले की नितु मीतू बरेच दिवसापासून राणीला गुलाब जाम करायला सांगत होते. त्यांना गुलाब जाम खूप आवडायचे. तीने पक्के केले आज गुलाबजाम करायचे. राणी ताबडतोब उठून तयार झाली आणि गुलाबजाम साठी खवा घेऊन आली मुलं घरी यायच्या आधीच तिने गुलाबजाम करून ठेवले.  सायंकाळी मुलं येताच ती फ्रेश होऊन आपल्या रूम मध्ये गेली. राणीने मुलांसाठी डिश मध्ये गुलाब जाम काढले आणि ती मुलांना बोलवायला त्यांच्या रुम मध्ये गेली. नितु मीतू  चला डायनिंग टेबल वर चला आज मी न तुमच्यासाठी एक स्पेशल डिश बनवली आहे. चला चला. चला पटकन आणि बघा काय आहे ते. मुलं डायनिंग टेबलवर आली. गुलाब जाम बघून तर दोघेही नाचायलाच लागली. तेवढ्यात नाईकही घरी आले. राणीने त्यांच्यासाठी पण डिश तयार केली. नाईक मुलांना खुश बघून स्वतःही खुश झाले होते. सगळ्यांनाच गुलाब जाम खूप आवडले होते.

Sanjay R.


Thursday, September 23, 2021

" हरवला कुठे तो शब्द "

तो एकच शब्द
देतो मदतीचा हात ।
मनास मग वाटे
जन्मोजन्मीची साथ ।
देतो दुःख झुगारून
होई सुखाची बरसात ।
आनंद मावेना मग
येतो फिरून गगनात ।
प्रकाशाचा एकच किरण
सरते अंधारी रात ।
झगमगते जीवन
होते आनंदाची प्रभात ।
हरवला कुठे तो शब्द
शोधू कुठे मी ती साथ ।
शब्दांचेच मायाजाळ
शब्दानाही हवा हात ।

Sanjay R.