Wednesday, September 22, 2021

नाईलाज - राणी भाग सहा

      नाईक आता आजरातून बरे झाले होते. ते आपल्या नेहमीच्या कामात लागले होते. रोज ऑफिसला जाणे घरातील, बाहेरील साऱ्या जवाबदाऱ्या पार पाडणे यात मग्न झाले होते. सगळेच व्यवस्थित सुरू होते. राणी वरही आता त्यांचे प्रेम जडले होते. राणीही त्यांच्यावर खूप प्रेम करायला लागली होती. नाईक घरात असे तोवर ती सारखी त्यांच्या मागे पुढे राहून नाईकांना खुश ठेवण्या साठी जेही करावे लागायचे ते सगळं अगदी आनंदाने खुशीने करायची. तिला तर आता नाईक ऑफिसला गेल्या नंतर सगळी कामं आटोपून नाईकांच्या आठवणी काढण्यात आनंद वाटायला लागला होता. नाईकांची परतीची वेळ झाली की ती अस्वस्थ व्हायची. सारखी नाईकांची वाट बघायची. नाईक घरी पोचे तोवर तिच्या कितीतरी चकरा अंगणात व्हायच्या. नाईक दारात दिसताच ती आनंदी व्हायची. ते येताच ती त्यांच्यासाठी चहा घेऊन जायची. चहा पिणे होईतोवर त्यांच्याकडेच बघत बसायची. सतत काही ना काही तरी बोलत रहायची. नाईकही तिच्या वर खूप खुश होते. त्यानाही राणीचा सहवास खूप आवडायचा. तेही दिवसभराच्या त्यांच्या ऑफिसमधील गोष्टी तिच्या सोबत शेअर करायचे. रात्री जेवण आटोपल्यावर मुलं झोपी गेल्यानंतर ती नाईकांच्या रुम मध्ये जाऊन नाईकांशी गप्पा गोष्टी करत नाईकांचे हात पाय, डोके दाबून द्यायची. विविध विषयांवर त्यांची चर्चा चालायची.  राणी आता सम्पूर्णतः नाईकांची अर्धांगिनी झाली होती.  दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटायचा. राणी नाईकांच्या कुशीतच मग झोपून जायची.

      असेच दिवस जात होते. दोघांमधले प्रेम दिवसागणिक अजूनच फुलत फळत होते. मुलंही आता मोठी होत होती. मात्र दोघांच्या या जवळीकीमुळे मुलांना आपली आई आपल्या पासून दूर जात आहे असे वाटायचे. कारण नाईक ऑफिसमधून घरी आल्यानंतर राणीचा जास्त वेळ नाईकांसोबत जायचा. तशात मग मुलं थोडी चीड चीड करायचे.सारखं तिला बोलवून बोलवून काही न काही सांगून आपल्या जवळ गुंतवून ठेवायचा प्रयत्न करायचे. पण तेव्हाच मग नाईकही तिला आवाज देऊन स्वतःकडे बोलवून घ्यायचे. तिला इकडे बघू की तिकडे बघू असे होऊन जायचे. ती मुलांचं मन जपायचा खूप प्रयत्न करायची. पण तिला नाईकांना टाळणेही जमत नसे. अशात तीच स्वतःची ओढाताण करून घेत होती. नाईक घरी नसतानाचा सम्पूर्ण वेळ ती मुलांना द्यायची पण नाईक घरी असले की पूर्ण वेळ मुलांना देणे तिला कठीण व्हायचे.

      असेच एक दिवस नितुला त्याचे शाळेतून होमवर्क मिळाले पण त्यासाठी लागणारे पूर्ण साहित्य आणायचे कामाच्या गराड्यात राहून गेले होते. आज तिने घरातले जास्तीचे काम काढले होते. ते करता करताच सगळा वेळ निघून गेला होता. बाजरात जाणे तिला शक्यच झाले नाही. त्यामुळे नितु सारखा चीड चीड करत होता. नाईकांची ऑफिस मधून यायची वेळ झाली होती. पण नितुची चीड चीड बघून राणीने सगळ्या लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट करून ती बाजारात गेली. सगळ्या वस्तू तिने खरेदी केल्या आणि घरी परत निघाली. पण येता येता तिला बराच वेळ लागला. नाईक ऑफिसमधून घरी पोचले होते. पण आज रोजप्रमाणे त्यांना राणी घरात दिसली नाही. आज चहा ही मिळाला नाही. ऑफिसमध्येही कामात काही चुका झाल्यामुळे साहेबांशी त्यांचा खटका उडाला होता. त्यामुळे त्यांचे मन अशांत होते. घरात राणीला न पाहून ते जास्तच अशांत झाले.

      राणीलाही परत यायला बराच वेळ लागत होता तशी त्यांचीही चीड चीड व्हायला लागली.
बाजारातून घरी येताच नितु राणी वर जणू ओरडलाच, आई तू आता हे सामान आणून दिलंस आता मी होमवर्क केव्हा करणार. रात्रभर मला आता करत बसावे लागेल. तशी राणी म्हणाली, रागावू नको राजा, होईल सगळं अगदी व्यवस्थित, तू काळजी करू नकोस. मी करते ना तुला मदत. चल आपण दोघे मिळून करू या. पण नितुचा राग मात्र शांत होईना. तशातच ती नितु सोबत त्याला मदत करत राहिली. वेळ फार झाला होता. स्वयंपक ही अजून व्हायचा होता. आज नाईकांकडे बघायला सुद्धा तिला वेळ मिळाला नव्हता. नाईकांना चहा पण देता आला नव्हता. नाईकही चीड चीड करत होते . सारखा तिला आवाज देऊन तिला बोलवत होते. सगळं केल्या शिवाय तिला जाणे जमलेच नाही. आता दहा वाजायला आले होते. तिने स्वयंपाक आटोपून ताट केले आणि मुलांना व नाईकांना जेवायला बोलवले, तर मीतू झोपी गेली होती. राणीने तिला जागे करून जेवणाच्या टेबलवर बसवले. त्यामुळे तीही चिडत होती. राणी सगळ्यांची चीड चीड बघून आणखीच थकून गेली होती. तिला सगळ्यांना कसे खुश करावे काहीच कळत नव्हते.

      जेवण आटोपून सगळे आपापल्या रुम मध्ये गेले. राणीने ताट उचलून सिंक मध्ये नेऊन ठेवले सगळं साफ सुफ करून ती नितु च्या रुम मध्ये गेली. त्याचे होमवर्क आटोपले होते. आणि तो झोपायच्या तयारीत होता. राणीला बघून तो ओरडलाच बघ तुझ्या मूळे मला किती लेट झालं. माझं होमवर्क नसत झालं तर टीचरनी मला पनिश केले असते. राणीने त्याला थोपटण्याचा प्रयत्न केला पण नितुने तिचा हात ढकलून दिला. आणि म्हणाला जा तू आता मीच झोपतो. राणीने त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण सारेच निश्फळ झाले. तिला खूप वाईट वाटत होते. पण काहीच इलाज नव्हता. तशी ती मीतू कडे वळली तर तीही झोपी गेली होती.  लाईट बंद करून दुःखी मनाने ती नाईकांच्या रुम मध्ये आली. तर नाईकही झोपी गेले होते. सगळेच आज तिच्यावर नाराज होते. सगळ्यांना खुश करण्याचा तिने पूर्ण प्रयत्न केला पण आजच्या घटनेला तिचा नाईलाज होता. तीही या सगळया मुळे थकून गेली होती. ती तशीच मग लाईट बंद करून नाईकांच्या शेजारी झोपी गेली. आज कितीतरी दिवसानंतर नाईकांनी तिला आपल्या कुशीत जवळ घेतले नव्हते.
Sanjay R.


आजार - राणी भाग पाच

     दिवसामागून दिवस जात होते. आता नाईक आणि राणी मध्ये संवाद सुरू झाला होता. नाईकांना राणी आणि राणीला नाईक आवडायला लागले होते. नाईक वेळ मिळेल तसे राणीला घेऊन बाहेर कुठेतरी फिरूनही यायचे. दोघनमध्ये प्रेम जिव्हाळा हळू हळू वाढत होता. नाईकांची आवड निवड आता राणीलाही कळायला लागली होती. त्यांना जे जे आवडते ती तसे करायची. तिलाही त्यात आनंद मिळायचा. मुलांसोबत ती नाईकांना ही खुप जपत होती. नाईकही राणीला हवे नको सारे करायचा प्रयत्न करायचे. नाईकांचा संसार आता फुलायला लागला होता. घरात नेहमी आनंद उत्साह असायचा.

     अचानक एक दिवस नाईकांची तब्येत बिघडली. अंगात थंडी वाजून ताप भरला. तशी राणीला खूप काळजी वाटायला लागली. लागलीच तिने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि नाईकांना घेऊन ती डॉक्टरांकडे पोचली. डॉक्टरांनी चेक करून काळजी चे कारण नाही , व्हायरल फिवर असल्याचे सांगितले, पण तीन दिवस काढावे लागतील असे सांगितले. काही औषधे त्यांनी लिहून दिले. राणीने परत येता येताच ती औषधे घेतली आणि ते घरी आले. नाईकांना बेड वर झोपवून ती कामाला लागली. नाईकांसाठी तिने सोजी आणि वरणाचे पाणी काढले. आणि ती नाईकांच्या रुम मध्ये गेली. नाईक शांत पणे झोपले होते. ती तिथेच नाईकांकडे पहात बसून राहिली. थोड्या वेळात नाईक जागे झाले. तसे राणीने त्यांना थोडे खाऊन घेण्यासाठी विनवले. नाईकांना खाण्याची इच्छाच होत नव्हती पण राणीच्या आग्रहाखातर त्यांनी थोडी सोजी आणि वरण घेतले. नंतर राणीने त्यांना औषधे दिली. आणि ती नाईकांच्या शेजारी बसून राहिली. नाईकांनी राणी चा हात घेऊन तो आपल्या कपाळावर ठेवला. तसे राणी समजली की नाईकांचे डोके दुखत आहे, तिने ते दाबायला सुरवात केली. आता नाईकांनाही बरे वाटत होते. राणीने नाईकांचे कपाळ, डोके, हात पाय. दाबून दिले, तसे नाईकांना बरे वाटायला लागले. ते सारखे राणीकडे टक लावून बघत होते. राणी मात्र मन लावून नाईकांची सेवा करण्यात मग्न होती. तिच्या चेहऱ्यावर नाईकांची काळजी पूर्ण पणे दिसत होती. नाईकांना तिची ती सेवा घेण्यात खूप समाधान वाटत होते. त्यांनी मग हळूच राणीचा हात आपल्या जवळ घेतला . आणि तिच्या हातरुन ते आपला हात कितीतरी वेळ फिरवत राहिले. राणीलाही त्यात खूप समाधान मिळत होते. आज पहिल्यांदाच दोघे इतक्या जवळ येक दुसऱ्याचे हात हातात घेऊन  नजरेत नजर टाकून बघत होते.  दोघनच्याही चेहऱ्यावरून प्रेम भाव व्यक्त होत होता.

     आता सायंकाळ होत आली होती. तशी राणी आपल्या कामात लागली. मुलंही खेळण्यात मग्न झाली होती. राणीने आपला स्वयंपाक आटोपला. आणि परत ती नाईकांच्या जवळ जाऊन बसून राहिली. सायंकाळचे आठ वाजायला आले तसे राणीने मुलांना जेवायला वाढून दिले आणि नाईकांसाठी गरम गरम खिचडी घेऊन गेली. नाईकांना आता बराच आराम वाटत होता. राणीनेच नाईकांना चमच्या चमच्याने नाईकांना खिचडी भरवली. त्यांना पाणी देऊन ती मुलांकडे आली. मुलांचे जेवण आटोपले होते. तिने मग स्वतःसाठी वाढून घेतले आणि जेवण करून सगळी ठेव रेव करून मुलांचे बिछाने व्यवस्थित केले. मुलं ही आता झोपायच्या तयारीला लागले होते. थोडा वेळ ती मुलांच्या रुम मधेच बसून मुलांना थोपटत राहिली.  मुलं आता झोपी गेले होती. तशी ती  परत नाईकांच्या रुम मध्ये आली. नाईक तिला बघून हळूच हसले. तिने नाईकांचे औषध काढून नाईकांना त्यांच्या हातात दिले. आणि त्यांच्या साठी पाणी घेऊन आली. नाईकांनी औषध घेतले. आता त्यांना खूप बरे वाटत होते. तापही उतरला होता. त्यांना चांगले पाहुन राणीलाही बरे वाटत होते. नाईकांनीच तिला आपल्या बाजूला कॉटवर बसवून घेतले. राणी नाईकांकडे बघत बसून राहिली. मग नाईकांनीच तिचा हात आपल्या हातात घेऊन त्यावरून आपला हात फिरवत राहिले. त्यातच राणीचा  साडीचा पदर थोडा खाली गेला. ते राणीच्या लक्षात आले नाही. नाईकांच्या मात्र ते लक्षात आले. राणी आता खूप सुंदर दिसत होती. तिच्या शरीराची ठेवणही तिच्या रुपाला अजून खुलवत होती. नाईक आज पहिल्यांदाच राणीला इतकं जवळ घेऊन  तिचे रूप न्याहाळत होते. राणी खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत होती. तिच्या साडीचा रंग तिचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. नाईकांनी राणीला आपल्या अजून जवळ घेतले. आणि त्यांचा स्वतः वरचा ताबाच सुटला. नाईकांनी हळूच तिला आपल्या मिठीत घेतले. त्यांचे ओठ राणीच्या ओठावर टेकले. तशी त्यांची मिठी अजूनच घट्ट झाली. राणी नाईकांच्या प्रत्येक कृत्याला नकार देऊच शकली नाही. दोघांमध्ये आज प्रथमच स्पर्शाची देवाण घेवाण होत होती. नाईक आणि राणी सर्वस्वाने एक झाले होते. नाईकांच्या मिठीत ती केव्हा झोपी गेली ते तिलाही कळले नाही.

सकाळ झाली होती. पक्षांची किलबिल सुरू होती. तशातच राणीला जाग आली. ती अजूनही नाईकांच्या मिठीतच होती. आणि त्याच स्थितीत दोघेही झोपी गेले होते. ती मिठी अजूनही सैल झाली नव्हती. राणीने हळूच नाईकांच्या मिठीतुन स्वतःला सोडवून घेतले. नाईकांना ती बराच वेळ त्याच अवस्थेत निरखत राहिली. तिने हळूच त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले.  मग हलकेच तिने नाईकांच्या अंगावर पांघरूण घातले. पांघरून वयवस्थित करून मग उठून तिने आपली साडी व्यवस्थित करून घेतली आणि आंघोळीला गेली. आज प्रथमच नाईकांनी राणीला सर्वस्वाने स्वीकार केले होते. राणीही पूर्णपणे नाईकांची झाली होती.  दोघांच्या मधे असलेला पडदा पूर्णपणे दूर झाला होता. ती खुशी तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. तिचा उत्साह द्विगुणित झाला होता.

संजय रोंघे


" प्रश्नोत्तर "

कधी प्रश्नाला प्रश्न
नसे उत्तर तयास ।
उत्तरासाठी चाले
किती किती ते प्रयास ।

असो प्रश्न कसाही
मनात उत्तराचा ध्यास ।
प्रश्नच कधी वाटे
करेल का विनाश ।

शोधतो उत्तर जेव्हा
वाटे प्रश्नच आकाश ।
उत्तरात मिळे कधी
जीवनाचा सारांश ।
Sanjay R.

Tuesday, September 21, 2021

" नकळत घडले सारे "

नकळत घडले सारे
अचानक आले वारे ।
कोसळले का आकाश
गेलीत वाहून घरे ।
ना उरला माणूस
ना उरले गुरे ढोरे ।
होत्याचे झाले नव्हते
कोपला का असा रे ।
सांगू कुणास आता
मन मनास विचारे ।
Sanjay R.

Monday, September 20, 2021

" असा कसा रे तू पावसा "

असा कसा रे तू पावसा
नेमका वेळेवर तू आलास ।
भर रस्त्यात मला रे
चिंब भजवून तू गेलास ।

वाट बघतात तुझी जिथे
तिथून तू निघून आलास ।
भिजव थोडी शेती बागा
तिथेच करतो कशाला मिजास ।

गरीब बिचारा तो शेतकरी
अश्रूही नाही त्याच्या डोळ्यास ।
जास्त कधी कमी कधी
नाही उतरत तू भरवश्यास ।

पड जरा जाऊन तिकडे
दाखवू नकोस नुसते आभास ।
तुझ्याविना जीवन व्यर्थ
करतात सारेच तुझा ध्यास ।
Sanjay R.