Thursday, July 15, 2021

" भावनांचे घर मनात "

भावनांचे घर मनात
रूप बदले एक क्षणात ।
वदे वाचा बोल काही
कार्य करणे असे हातात ।

उचले ना जेव्हा हात
प्रश्न होई काय या मनात ।
मनच जाणे उत्तर त्याचे
बदलू नकोस क्षणा क्षणात ।
Sanjay R.


Wednesday, July 14, 2021

" काटेरी वाट "

वाट बघायला तूझी
मज तू लावू नकोस ।
घाव मनाला या असे
परत पुन्हा तू देवू नकोस ।

वेदना या माझ्या मनाच्या
तू  तुझ्यात घेऊ नकोस ।
साधना किती या अंतराची
अजाण तू जाणू नकोस ।

तपश्चर्येच्या वणव्यात
मलाच तू जाळू नकोस ।
नाही होणार राख शांत
हात स्वतःचे पोळू नकोस ।

असेल अग्नी तो साक्षीला
साक्ष माझी तू मागू नकोस ।
अश्रूंचीही सरली बरसात
अजून मजला रडवू नकोस ।

हो सुखी तू तुझ्या दारी
परत वाट ही धरू नकोस ।
वाटेवरती काटे अंथरले
कट्यामधून तू चालू नकोस ।
Sanjay R.

Tuesday, July 13, 2021

" थांबून नको पाहू "

थांबून नको पाहू
सांग मी कसा राहू ।

दूर जाते ही वाट
मधेच उंच घाट  ।

उंचच उंच वृक्ष
देऊ कुठे मी लक्ष ।

पक्षांची किलबिल 
डबडबले झिल ।

रिमझीम पाऊस
भागली माझी हौस ।

मस्तीत हा  नजारा 
धुंदीत होता वारा ।

तृप्त झालेत नेत्र 
भिजले माझे वस्त्र ।

निसर्गाची किमया 
जीवनाचा हा पाया ।
Sanjay R.


" पावसाचा उपवास "

कमला छोटयाशा गावात राहणारी गृहिणी. घर छोटेशेच , कुडाच्या भिंती आणि वर टिनाचे छत.  कसे तरी आपला स्वतःचा आधार स्वतःच सांभाळत उभे होते. केव्हा उडून जाइल काहीच नेम नव्हता. घर नव्हतेच ते. अशा या घरात दोन म्हातारे आई वडील, दोघे नवरा बायको आणि दोन मुलं सहा जणांचा संसार दिवसा मागून एक एक दिवस ढकलत आपापले आयुष्य जगत होते.  
आशा तर केव्हाच निराशेत बदलल्या होत्या. प्रत्येकाच्या कपाळावर मवळलेल्या अपेक्षांच्या रेघोट्या स्पष्ट पणे दिसत होत्या. कारण त्या कधीच पूर्ण होणार नव्हत्या. 
         जिथे रोजच्या दोन घास अन्नाची मारामार होती. त्यासाठी रक्ताचे पाणी होईस्तो मरेपर्यंत कष्ट उपसावे लागत होते तिथे , रोजचे ते काम पण मिळत नव्हते. कधी मिळाले तर मिळायचे नाही तर तसेच आभाळाकडे बघण्याशिवाय काहीच काम नसायचे. मग तो दिवस उपवास घडायचा.
          आता लवकरच पावसाला सुरुवात होणार होती. तशी कमलाची चिंता जास्तच वाढत होती. तिच्या नवऱ्या ने कचऱ्यातून जमा करून आणलेल्या चिंध्यानी सगळे घर बंधून घेतले जेणेकरून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घर उडून जाऊ नये. पण तो प्रयत्न केविलवाणाच वाटत होता. सायंकाळी जेवणाच्या तयारीला कमला लागली मुलं अंगणात बसून खेळत होती. म्हातारे आई वडील आकाशाकडे बघत कसला विचार करत होते ते त्यांनाच ठाऊक. तेवढ्यात म्हातारा जोरात ओरडला कमले आवो पाय, हवा सुटन बरं आज. सामान सुमान बांधून ठिव न्हाईतर सगय उडून जाईन वो. तशी कमला ने म्हाताऱ्या कडे पाहिले आणि आपल्या कामाला लागली. तिने सगळ्यांचे होते नव्हते कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवले. भांडे कुंडे जमा करून पिप्यात भरून ठेवले. आणि बाहेर येऊन बघते तो हवा वाहायला सुरुवात झाली होती. हळू हळू वाऱ्याने वादळात रूप बदलले आणि मार्गात येणारे सर्व काही उडवत न्यायला सुरुवात केली. तसे कमलाने म्हातारा म्हातारीस आधार देऊन घरात घातले. मुलांना पण दोन धपाटे देऊन घरात जाण्यास सांगितले आणि नवऱ्याला सोबत घेऊन हवा ज्या दिशेने येत होती त्या बाजूने तिने त्या कुडाच्या भिंतीला आधार देण्याचा प्रयत्न केला. परंतु वाऱ्याच्या ताकदीपुढे त्यांची ताकद अपुरी पडत होती. तशातच छताचे टिन आपला आधार सोडायला लागले आणि वाऱ्याच्या टाकडीपुढे लोटांगण घालत थोडे वर जाऊन घराच्या मागच्या बाजूला जाऊन पडले. टीनेवर असलेले वजन द्यायला ठेवलेले दगड भड भड आवाज करत खाली कोसळले. तसे कमलीच्या छातीत धस्स झाले. आणि ती घरात शिरली आणि म्हातारा म्हातारी आणि मुलांना शोधू लागली. पण सगळेच सुरक्षित होते. दगड त्यांच्या पासून थोडेच दूर पडले होते. तिने देवाचे आभार मानले पण घराचे छत उडाले होते. तितक्यात पावसाला सुरुवात झाली . बचावासाठी तिने एक प्लास्टिक काढले आणि सगळे जण  त्या छोट्याश्या प्लास्टिक मध्ये पावसाचा आधार घेत दाटी वतीने एकमेकांना स्वतःत घेत तसेच बसून राहिले. पण थोड्याच वेळात घरात पाणी पाणी झाले. लोट वाहायला लागले. आता उभे राहण्यावाचून काहीच पर्याय नव्हता. सगळे उभे झाले आणि किती तरी वेळ तसेच उभे राहिले . मग हळू हळू पावसाचा जोर कमी झाला. पण अंधाराने आपला ताबा घेतला होता. ती सम्पूर्ण रात्र सगळ्यांनी उपाश्या पोटी उभे राहून काढली. घरात पाणीच पाणी होते. सकाळी उजडताच तिने छताच्या टीना जमा करून परत त्या घरावर टाकल्या. घरातले पाणी काढले आणि परत ते प्लास्टक खाली अंथरले. सगळ्यांच्या डोळ्यात झोप आपले घर करू बघत होती. सगळे तसेच त्या छोट्याश्या प्लास्टिक वर आडवे झाले आणि केव्हा झोपी गेले कळलेच नाही. आजचा दिवसही सगळेच तसेच उपश्यापोटी झोपी गेले.

Sanjay Ronghe
 
 

Monday, July 12, 2021

" राग कसा तुझा "

तिरकी नजर
फुगलेले गाल ।
दिसतो चेहरा
लाल ही लाल ।
राग कसा तुझा
बिघडवतो ताल ।
मनाचे माझ्याच
होतात ना हाल ।
शब्दांची करतो
बचावाची ढाल ।
जमतच नाही
होतातच हाल ।
Sanjay R.