Sunday, July 11, 2021

" ठेवू नको मनी राग "

नको ठेवू मनी राग
धीराने थोडे तू वाग ।
क्रोध असे अकारण
जाग जरा तुही जाग ।
अविचार आहे कसा
अशांत मनाचा भाग 
नको तापवू डोक्याला
मार्गि शांतीच्या तू लाग ।
क्रोधात होई विनाश
मनः शांती थोडी माग ।
Sanjay R.

Saturday, July 10, 2021

" मुखवटा "

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा
कोण खरा आणि कोण खोटा ।

खोट्याचे बघा किती घट्ट नाडे
सारेच फिरतात मग मागे पुढे ।

खऱ्याला सांगा कोण विचारे
दोषच नशीबाचा भोगतो सारे ।

चोरच फिरतात फुगवून छाती 
सत्यच हरते हे कुणाच्या हाती ।
Sanjay R.


Friday, July 9, 2021

" काय उरले काय संपले "

काय राहिले काय संपले
कशाचेच नव्हते काही होणार ।

वाट या मनातली जाते दूर
झेलतो मीच का असंख्य प्रहार ।

सुख दुःखाचे क्षण येती जाती
छोट्याश्या मनात किती विचार ।

माणसांच्या गर्दीत हरवलो
का मी एकटाच झेलतो प्रहार ।

पडते उठते ते छोटेसे बालक
गेले दाखवून जीवनाचा आधार ।
Sanjay R.


Thursday, July 8, 2021

" लोभस हास्य "

लोभस असते हास्य
आवडणार कसे नाही ।

डोळ्यात ती चमक
सांगती ते बरेच काही ।

ओढ मनात अशी
शोधी दिशा दाही ।

होता ताटातूट जरा 
होते हृदयाची लाही ।

कळे अवस्था मनाची
पुकारते माही माही ।
Sanjay R.


" आला बहर संगीताला "

आला भावनांना पूर
लागला लयीत सूर ।
गीत सजले प्रेमाचे
नाद स्वर कुठे दूर ।

झंकारली विना जशी
तबल्याने दिली थाप ।
रुणझुणले घुंगरू आणी
सुरांनी घेतला आलाप ।

थय थय धिन धिन 
उठले सुरांचे तरंग ।
स्वरांची ती जुगलबंदी
मैफिलीस आला रंग ।

आला बहर संगीताला
धुंद झाले सारे नाद ।
तृप्त होऊनि रसिकजन  
गेले देऊन आपुली दाद ।
Sanjay R.