Friday, July 10, 2020

" दोस्ताची दोस्ती "

" दोस्ती "
आठवत न्हाई मले
झाली कवा दोस्ती ।
लहान होतो जवा
चाले मोठी दंगा मस्ती ।

शायेत मीयुन जावो
एकाच बेंचावर बसो ।
खोड्या काढून सन्या
जोरजोरानं मंग हासो ।

मस्ती आमची पाहून
मास्तर लैच ओरडे ।
झोडपे मंग बसलेका
डोये होये कोरडे ।

कालेजात असतांनीच
लागली त्याले नवकरी ।
तवापासून न्हाई भेटला
म्या बी सोडली मस्करी ।

एकदिस फेसबुक वर
मेसेज त्याचा आला ।
मनलं म्या त्याले राजा
गायब कसागा तू झाला ।

नोकरी संगच मले बावा
छोकरी भी भेटली ।
तिच्या नादात लागलो
आनं दोस्ती बी तुटली ।

मंग केलं म्या लगन राजा
आली संसाराची कायजी ।
निपटलं बहिन सारं आता
झालो मिबी आता बावाजी ।

नातवानं देल काढून मले
फेसबुकचं हे खातं ।
तेथच  दिसला गा तू बावा
आठवलं दोस्तीचं नातं ।

इसरलोच होतो गा सारं
माफ करशीन का मले ।
लहानपन होतं मस्त
एकडाव भेटाचं हाये तुले ।
Sanjay R.

Thursday, July 9, 2020

" मन उरते अधर "

मन विचारांचा सागर
अहोरात्र चाले जागर
कधी न भरे ही घागर
बुद्धी साऱ्यांची चाकर
कर्म कर्तृत्वाचा नोकर
हवी पोटाला भाकर
भरले पोट देई ढेकर
लालसा मनी निरंतर
नाही तृप्ती चा आदर 
आत्मा मग होई सादर
होई आयुष्याची मरमर
लागे कलंकाची नजर
सरते श्वासांची घरघर
मुक्ती ठाकते सामोरं
विसावतो होऊन अमर
अटळ जन्ममृत्यूचा प्रहर
मन उरते मग अधर 
Sanjay R.


Tuesday, July 7, 2020

" पहिली भेट "

आठवते अजून

तुझी आणि माझी
ती पहिली भेट

झाली नजरा नजर
गालात हसलीस आणि
घर केलंस काळजात थेट

विसरलो मी सारंच
तू कुठे मी कुठे पण
आठवते पहिली भेट

आठवत नाही काहीच
आठवते फक्त तूच आणि
तुझ्या घराचं गेट

नेहमीच असायचं बंद
रस्तेही अतीच अरुंद
सुटलं सारं झालो लेट

बरंच झालं सुटलं सारं
मनात नव्हतं कुठलं वारं
विसरलो ती पहिली भेट

पुसट झाल्या आठवणी
नाही काळजात कोणी
आता बंद केलं मीही गेट
Sanjay R.


बाल कवितेस प्रथम स्थान प्राप्त

माझ्या बाल्कवितेस प्रथम स्थान प्राप्त झाले, आयोजकांचे खूप खूप आभार


Monday, July 6, 2020

" पहिला पाऊस "



पहिल्या पावसाची तर
असते तऱ्हाच न्यारी ।
वाट बघतात सारे
करून सारी तयारी ।

नागर वखर फिरवून
जमीन होते तयार ।
वाट बघतो बळीराजा
करतो पावसाचा विचार ।

सूर्याच्या तापत्या कहाराने
होतात सारे बेजार ।
बघतात वाट पावसाची
वाटे स्वप्नांचा आधार ।

धरा पण असते प्रतीक्षेत
निसर्गाला येण्या बहार ।
नदी नाले, तलाव झरणे
वाहे  पाण्याची धार ।
Sanjay R.