Friday, April 17, 2020

" काळ हा असा "

सर्वच गोष्टींनी परिपूर्ण
असा काळ कुठला असेल ।
काही कमी काही जास्त
कमी अधिक तर असेल ।

कुठे स्वातंत्र्य कुठे पारतंत्र्य
कुठे ज्ञान कुठे विज्ञान असेल ।
कुठे विज्ञान कुठे तंत्रज्ञान
तर कुठे अज्ञानही असेल ।

गरिबी श्रीमंती चे विभाजन
लक्षाधीश सत्ताधीशही असेल ।
राजे महाराजे कुणी सम्राट तर
मंत्री संत्री ,घातक विघातक असेल ।

अनाचारी अत्याचारी गुन्हेगारी
तेव्हाही तर तसे बरेच  असेल ।
देव, प्रभू, संत आणि महात्मे
राम कृष्ण गांधी नेहरु ही असेल ।
Sanjay R.



" एक झुरका सोड तू मूर्खां "

कसा रे तू मूर्खां
पोचलास मरणाला
तरीही का तुला
हवा एक झुरका

सिगरेट आणि बिडी
स्वतःच असेल जळत ।
सोबत तुही जळतोस
का नाही तुला कळत ।

भयंकरच रे हा कॅन्सर
घेऊन जीवच जातो ।
सोड आता ही नशा
मुदत थोडी तुला देतो ।

व्यसन तम्बाकुचे
दे तू सोडून आता ।
छोटी छोटी बाळ तुझे
हो त्यांचा तू पिता ।
Sanjay R.



Thursday, April 16, 2020

" स्वप्न लग्नाचे "

शालू आई बाबांची आवडती लेक, शिंद्यांची एकुलती एक मुलगी. हुशार आणि कर्तबगार . मेहनतीने आणि कर्तृत्वाने ती इंजिनिअर झाली आणि नोकरी मिळवून स्वतःचे अस्तित्व तिने निर्माण केले .

शालूने आई बाबांची तिच्या शिक्षणाची आणि नोकरीची काळजी मिटवली होती. आता बाबांना तिच्या लग्नाची काळजी लागली होती. तशातच मानेंच्या अतुलची तिला मागणी आली . अतुलही तिच्याच ऑफिसला तिचा सहकर्मी होता. सुस्वभावी आणि जिद्द असलेला अतुल शालूला योग्यच वर होता . 

अतुलचे आई बाबा आणि बहीण शालू कडे येऊन त्यांनी शाळूची मागणी घातली. स्थळ चांगले असल्यामुळे शिंद्यांच्या घरी खुशीचे वातावरण झाले होते. आणि पंडितांनी 20 एप्रिल ही तारीख काढली. लग्नाला आता 2 महिने बाकी असल्यामुळे सगळंच अगदी शांततेत होईल असा सगळ्यांनाच विश्वास होता . त्या दृष्टीने हॉल , स्टेज, लायटिंग, डेकोरेशन, सगळ्याच बुकिंग झालं होतं. कॅटरर ही ठरला होता
. मेनू पक्का झाला होता . पूर्ण चार दिवसांचं बुकिंग झालं होतं, लग्नाच्या पत्रिका छापून सगळ्या नातेवाईक आणि मित्र मंडळींना निमंत्रण पाठविण्यात आले होते. सगळे आनंदात सुरू होते .

त्यातच टीव्ही वर चीन मध्ये सुरू असलेल्या कोरोना संबंधातील बातम्या देशाची चिंता वाढवत होत्या.  पण शिंदे आणि माने परिवाराला प्रकरण किती गंभीर होईल याचा मुळीच अंदाज घेता आला नाही .
लग्न समारंभासाठी सगळ्यांचेच पैसे देऊन झाले होते आणि सगळे  20 एप्रिलचिच  वाट बघत होते.


तशातच पंतप्रधानांनी 20 मार्च ला एक दिवसाचा जनता करफू जाहीर केला आणि , सगळ्यांनाच एका भीतीच्या लाटेत लोटले. परत 21 दिवसांचा लॉक आउट डिक्लेअर झाला तो 14 ला संपणार  होता, तोच एक आता आशेचा किरण होता . पण देशात कोरोनाच्या बधितांची संख्या वाढतच होती. त्यामुळे लॉक डाऊन परत वाढेल याचा सगळ्यांनाच अंदाज आला होता. आणि झालेही तसेच . लॉक डाऊन 3 मे पर्यंत परत वाढवण्यात आला, आणि लग्न 
समारंभावर पाणी फिरले. झालेला सम्पूर्ण खर्चच वाया गेला होता, सगळ्यांना फोन करून काही पैसे परत मिळण्याची थोडी आशा निर्माण झाली परंतु शालू आणि अतुल या दोघांनी पाहिलेले त्यांचे आयुष्याचे स्वप्न . ते तर अर्धेच राहिले होते. आता दोघेही परिस्थिती सामान्य होण्याची वाट बघत आहेत. त्याशिवाय पर्यायच नाही .
Sanjay R.



" भीती "

" भीती "
दिवसच असे आलेत. सरकारी आदेशानुसार सारेच घरात कोंडून घेऊन बसले होते, बाहेर निघण्याची मनाई होती.
घरात असलेलं सगळंच सामान संपायला आलं होतं.
घरात होते नव्हते पैसेही सम्पले होते. हाताला काम नसल्यामुळे पैसे येण्याची शक्यता सम्पलेलीच होती . आता पुढचे कसे होणार याची चिंता लागली होती. 
तारा त्याच विचारात असताना , बाजूच्या वंदूने तिला हाक दिली ती पण तिला ऐकायलाच आली नाही.
वंदूने परत तिला आवाज दिला,तेव्हा ती भानावर आली.
काय झालं ग वंदे , कुठे निघालीस, बाहेर जायला बंदी आहे ना, रस्त्या रस्त्यात पोलीस अडवतात म्हणते ना, तू कुठे निघालीस.
आग काय करणार, घरातलं  सगळंच सम्पलं ग , काय करावं कळेच ना, आज स्वयपाक पण नाही केला ग. चौकात कोणी पुढारी धान्य वाटप करत आहे म्हणते , चालते का जाऊन पाहू,पोरं उपाशीच आहेत ग. वंदू बोलली.
वंदूकडे पण तीच परिस्थिती होती. तसे ताराला थोडा धीर आला. चल जाऊ या म्हणत दोघीही चौका कडे निघाल्या. चौकात धान्य वाटप सुरू होते पण रांग बरीच मोठी होती, पण पोटाच्या भुके पुढे त्याचे दोघींनाही काहीच वाटले नाही. उलट आनंदच झाला कारण दोनचार दिवस पुरेल इतकं धान्य वाटप तिथे चालू होतं.
दोघीही रांगेत लागल्या आणि मंद गतीने पुढे सरकू लागल्या. जवळपास एक तासाने त्यांचा नंबर लागला आणि आपल्या वाट्याच धान्य घेऊन त्या आनंदाने घराकडे परत निघाल्या.

डोळ्यापुढे रात्री जेवणाला काय करायचं या विचारात दोघीही चालत होत्या . तेवढ्यात त्या भागातील गुंड मंगु दादा त्यांच्या पुढे उघडा चाकू घेऊन उभा ठाकला . दोघींच्याही काळजात धस्स झाले. आता हा काय करणार या भीतीने दोघीही थरथर कापायला लागल्या. मंगुदादा त्यांच्या हातातील धान्य हिसकावून घेणार हा विचारच दोघींनाही असह्य होत होता. त्यांनी आपल्या हातातील धान्य लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण मंगु दादा च्या ते लक्षात आले आणि त्याने सरळ दोघींच्या हातातील धान्य हिष्कावण्याचा प्रयत्न केला. रस्ता सुनसान होता. जवळपास कुणीच दिसत नव्हते. तेव्हा आरडा ओरड करूनही काहीच उपयोग होणार नव्हता. दोघींनाही त्यांच्या हातातील पिशव्या मंगु च्या स्वाधीन करायचा निर्धार केला. मात्र परत रात्री मुलांना उपवास घडणार या विचाराने त्यांच्या डोळ्यातुन पाणी वाहायला लागले.


आणि त्यांनी देवाचा धावा सुरू केला.  आणि खरच आज देवही त्यांच्या मदतीला धावला. नेमकी त्याच वेळी जोराने सायरन वाजवत पोलिसांची गाडी तिथे येऊन धडकली. गाडीचा सायरन ऐकून मंगु ही तिथून सगळं सामान टाकुन पळून गेला.


तसा दोघींच्या मनात धीर आला. पोलिसांची गाडी थांबली. आणि पोलीस बाहेर आले. दोघींनी पोलिसांना सगळी हकीकत सांगीतली तसे पोलीस मंगु दादा ज्या दिशेला पळाला होता तिकडे निघून गेले . आणि तारा वंदू आपल्या घरी पोचल्या.


आता पुढच्या तीन चार दिवसांची चिंता मिटली होती. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

Sanjay R.




" लॉक डाऊन "

दूर झालेत सारे
वळणावर कुठल्या मी आलो ।

देणे घेणे आपलेच आता
स्वयंसिद्ध कसा मी झालो ।

नव्हता वेळ कशाला
भेटलो असतो शेवटी मरणाला ।

ठेविले कोरोना तू घरात
कळले महत्व घराचे या जीवनाला ।

नाते गोते सारे कळले
स्थैर्य लाभले विचाराला ।
Sanjay R.