Tuesday, June 18, 2019

" कुचिन "

जिकडं पहाव तिकडं
कुचिन लोकायचं कारस्थान ।
आपलीच करतेत जीद
आन मांडतेत आपलं बस्तान ।
शेंडा ना बुड त्यायले
मंग घेते आपलं करून नुसकान ।
लेक मऱ्हाटी माय वर्हाडी
लेका उलीसा करना तिचा सन्मान ।
Sanjay R.

Monday, June 17, 2019

" बरस बरस रे मेघा तू "

झालेत दिवस किती
तापतो सूर्य अजून ।
रोजच घेतो आम्ही
घामात चिंब भिजून ।
सरले दिवस तुझे रे
का अजून तू तळपतो ।
सारून आभाळ दूर
एकटाच असा मिरवतो ।
या ढगांनो तुम्ही या
पावसास थोडे बरसू द्या ।
सुगन्ध या मातीचा
चहुओर थोडा पसरू द्या ।
तहानला हा निसर्ग सारा
हिरवळ ही सुकून गेली ।
बरस बरस रे मेघा तू
होऊ दे सारी धरा ओली ।
Sanjay R.

Saturday, June 15, 2019

" आला पावसाया "

" आला पावसाया "

सात जून मने
पावसाचा दिस ।
कोठी गेले ढग
अभाय नियं निस ।

कवा येयीन पाऊस
जीवाले घोर ।
पेरनीचा हंगाम
जाईन का जोर ।

डोये लागले अभायाले
दिसत न्हाई काया टिपूस ।
जाईन का साल असच
होनार न्हाई कापूस ।

कसं होईन म्हायं
सावकार हाये मांग ।
हर साल तसच
न्हाई जीवनात रंग ।

पड ना बावा पावसा
लगन कऱ्याचं पोरीचं ।
लय नोको मले
पन देजो माया मेनतीचं ।
Sanjay R.

Thursday, June 13, 2019

" स्वप्न पाहतो दिवसा "

इतक्या मोठ्या आकाशात
एक छोटा पिटुकला ढग ।
पाडेल का हो पाऊस तो
भिजेल का त्याने सारे जग ।

धीर धर म्हणतात सारे
निघालेत म्हणे मोसमी वारे ।
रात्रीच तर पाहिलं मी
आकाशात होते सगळेच तारे ।

ये न रे  आता पावसा
पोरं देतील तुला पैसा ।
खिसा माझा रे रिकामा
स्वप्न मात्र पाहतो दिवसा ।
Sanjay R.

Wednesday, June 12, 2019

" आकाशात भरारी "

स्वप्नांना कुठे काही
वेळ काळ असते ।
दिवस असो वा रात्र
मन त्यातच वसते ।

कधी आकाशात भरारी
कधी पाय नभावरी ।
समुद्राच्या लाटांमधून
वाट जाते इंद्राच्या दारी ।

दरबार इंद्राचा कसा
वाटला मज कसातरी ।
रंभा मेनका तिथल्या
त्याहून आपली वसुंधरा बरी ।
Sanjay R.