Tuesday, December 31, 2024

वर्ष गेले पूर्ण

वर्ष गेले पूर्ण पण
वेळ आहे अजून ।
नव्विन आले आता
कसे सजून धाजून ।

जुने तेच गेले
जाऊ दे ना उडत ।
गोंधळ होता सारा
होते किती रडत ।

पाहू आता नवे
काय काय होते ।
ये सोबत जरा
जाऊ जिथे नेते  ।

उरले सुरले मन
भिजेल थोडे वाटते ।
जुन्यांच्या आठवणींनी
हृदय माझे दाटते ।

गळा येतो भरून
डोळ्यातही आसवं ।
नको विचार करू
आहे जगच फसवं ।
Sanjay Ronghe

Tuesday, December 24, 2024

मैत्री चे जगच वेगळे

मैत्री चे जगच वेगळे
जमतात जिथे सगळे ।
नाते जरी नसले तरी
असतात सारेच आगळे ।

उडवतात मग कशी
एकमेकांची दांडी ।
जणू प्रत्येकाच्या हाती 
असते जादूची कांडी  ।

उजाडताच येते आठवण
भेटल्याशिवाय गमत नाही ।
मित्रंशिवाय जवळचा तर
दुसरा कुणी असत नाही ।

घरी जे जे नसेल माहित
तेही जाणतात मित्र सारे ।
मैत्री मधे जीवही देतील
तोडून कठीण सारे पाहरे ।

गरीब श्रीमंत न भेद कुठला
मैत्री विना तो कोण सुटला ।
कृष्ण सुदामा सखे सोबती
धागा तोही नाही तुटला ।
Sanjay Ronghe

Wednesday, December 18, 2024

आस

सांग मी तुज शोधू कुठे
का असा तू लावला ध्यास ।
मनात आठवणींचा सागर
नी मिलनाची आहे आस ।

भिर भिर ही होते नजर
पडतात मंद का हे श्वास ।
का धडधडते ही छाती
वाटतो बरा का एकांत वास ।

हरवतो मग मीही मलाच
सोसतो हवे नको ते त्रास ।
एकेक क्षण होतो कठीण
चढते धुंद नी तुझेच भास ।

सारून तो मधला पडदा
ये ना सखे मज तुझा हव्यास ।
तुझ्याविना नको मज काही
आहेस तुच माझा एक श्वास ।
Sanjay Ronghe


मज ते काय हवे

शब्दांनी तुझ्याच आता
गुंफले मी हे काव्य नवे ।
बघ डोळ्यात. तू एकदा
दिसेल मज ते काय हवे ।

बघतो आकाश मी जेव्हा
नसते तिथे ते आभाळ ।
मात्र डोळ्यात दिसते सारे
वाटते झाली आता सकाळ ।

जाते अंगही हे शहारून
हलतो जेव्हा गार वारा ।
कुठे शोधू मी सांग जरा
भर दुपारी कुठला तारा ।

तू धरा आणि मी आकाश
मधेच येतो तो ढग काळा ।
सारून ते नभ तू ये जरा
नको विझवू आता ज्वाळा ।
Sanjay R.


Tuesday, December 17, 2024

आसवात भिजले सारे

डोळ्यात शोधतो मी
हरवलेले एक स्वप्न ।
आसवांनी भिजले सारे
विसरलो तेही जपणं ।

प्रकाशात सूर्याच्या ही
असते आग पेटलेली ।
अंधार असू देना रात्री
भूक पोटाची तापलेली ।

वेदनांना कुठले औषध
मन मनात सोसते सारे ।
उठे शब्दा शब्दात हुंदका
आभाळ भरून तारे ।
Sanjay Ronghe


Saturday, December 14, 2024

थंडी थंडी नाव तिचे

मी परत येईल म्हणत
आलीच ती परत  ।
नको नको म्हंटले तरी
सुटली आम्हा छळत ।

चार दिवस होते बरे
आता नाहीच सोसवत ।
स्वेटर मपलर लपेटले
तरी नाही ती ढळत ।

रजईतच वाटते बसावे
नाही काहीच कळत ।
पेटवा जरा शेकोटी
असू दे तिला जळत ।

हात पाय झाले थंड
बोटं ही नाही वळत ।
दिवस आता मोजतो मी
जाईल केव्हा पळत ।

थंडी थंडी नाव तिचे
असते सळ सळत ।
बरी ही वाटते जराशी
मन फुलवते नकळत ।
Sanjay Ronghe


Friday, December 13, 2024

जगू दे रे बाबा

कशाला कुणाशी तू
असा खाजवतो रे बाबा ।
आपलेच विचार का
असा गाजवतो रे बाबा ।

जगायचे तुला आहे जसे
मला ही तू जगू दे रे बाबा ।
सरल्यावर सगळ्यांनाच तर
तिथे जायचे आहे रे बाबा ।

असेल रे ज्ञानी जरा तू मोठा
अज्ञानी आम्हीच बरे रे बाबा ।
जगतो मारतो करून कष्ट
बहुत इथे दुष्ट नको रे बाबा ।

माणूस माणसाचा शत्रू कसा रे
मैत्रीचे हे ढोंग नको रे बाबा ।
जगण्या मरणाची भीती कुणाला
आहे तोवर तर जगू दे रे बाबा ।
Sanjay Ronghe


Saturday, December 7, 2024

चिडीचूप

आता थंडी पण नाही
तरी का सारेच चिडीचूप ।
बोलायला विषय हवा
मग सारेच बोलतील खूप ।

चला करू काही तरी
लावू या थोडा धूप ।
आरसा आणा हो कोणी
बघु त्यात आपले रूप ।

सुंदरतेचा हव्यास भारी
चेहऱ्यावर लावा थोडे तूप ।
चूप नका बसू कोणी
मग दिसतात किती विद्रूप ।
Sanjay Ronghe


Wednesday, December 4, 2024

चल जाऊ या कुठे दूर

चल जाऊ या कुठे दूर
काढू आपणही एक टूर ।

तू आणि मी असू दोघेच
मन माझेही आहे आतुर ।

वाटेते वाट कुठली धरावी
मी भोळा साधा नी तू चतुर ।

अशक्य जे ते शक्य कसे
मिळेल कसा आपला सुर ।

प्रश्न माझाच असतो मला
का होशील तू माझीच हुर ।
Sanjay R.







धुके

गेला कुठे तो गारवा
हरवली वाटते थंडी ।
ढगांनी वेढले आकाश
सूर्याची ही घाबरगुंडी ।

ठेविली दूर ती रजई
फिरतो घालून बंडी ।
धुक्यात दिसेना काही
फिरवली कुणी कांडी ।

काळजात होते धडधड
पिकावर दिसतात अंडी ।
का जाईल वाया सारेच
प्रश्न मोठा त्याचे तोंडी ।

कापसाने दिला धोका
नाही भरली हो खंडी ।
तुरीत होता आता जीव
वाटते उलटेल का दांडी ।
Sanjay Ronghe


Tuesday, December 3, 2024

नाही म्हणु मी कशाला

तुम्हीच सांगा नाही म्हणू मी कशाला
आठवताच तर पडते कोरड घशाला ।

डोळ्यात येतात भर भरून आसवं नी
मन होते अशांत सांगू मी कशाला ।

अंधारी रात्रही असते बरीच ती भारी
कहाणी जीवनाची ठेवते मी उशाला ।

जगायचे म्हणूनच मी जगतो आता
मागू मरण मी मग सांगा हो कशाला ।

व्हायचे ते होऊ दे मीही आहे तयार
अमृत समजून चाखतो मीही विषाला ।

प्रत्येकाची असावी हीच अशी कहाणी
हसता हसता रडतो नका विचारू कशाला ।
Sanjay Ronghe


Monday, December 2, 2024

चला पेटवू शेकोटी

काय किती ही थंडी
थर थर कापते अंग ।
चला पेटवू या शेकोटी
तापवू काया ही संग ।

हरी हरी म्हणा सारे
गाऊ तुकोबांचा अभंग ।
टाळ चीपड्यांचा नाद
मनात विठ्ठलाचा रंग ।

नाम स्मरण हे चालता
भक्त होती त्यात दंग ।
भाव भक्तीचा हा खेळ
होईल थंडीचा ही भंग ।
Sanjay Ronghe


Saturday, November 30, 2024

गुलाबाची आवड

कीती तुला गुलाबाच्या
आहे फुलांची ग आवड ।
माझ्याकडेही आहे बाग
काढना तू थोडीशी सवड ।

लाल पिवळा आहे निळा
गुलाब तिथे किती भारी ।
येशील का तू सांग मज
आहे फुलला मोगरा दारी ।

माळते तू गजरा शेवांतीचा
श्वासात भरतो सुगंध सारा ।
मन माझे मग झुलू लागते
स्पर्शून जातो हळूच वारा ।
Sanjay Ronghe


Friday, November 29, 2024

हसायला पण हवे कारण

हसायला पण हवे कारण
जीवनाचे हे कसले धोरण ।
हसण्या रडण्याची चिंता इथे
कुणी बांधले हे नवे तोरण ।

हसता हसता रडतो कुणी
मागून पुढे तो जातो गुणी ।
माय बापाचे कष्टच सारे
कोण म्हणतो मी आहे ऋणी ।

होतो बाप जेव्हा म्हातारा
खंगते माय उचलून पसारा ।
मुलगा मुलगी दूर कुठे ते
आठवण येता शोधतो तारा ।

कठीण किती जीवनाची वाट
सरतो अंधार मग होते पहाट ।
जगूच देईना पण भयाण रात्र
श्वास थांबतो नी तूटते गाठ ।
Sanjay Ronghe.


Thursday, November 28, 2024

राग

असा कसा हो हा राग
झाला जीवनाचा भाग ।
सकाळ दुपार संध्याकाळ
सांगतो शांत थोडा वाग ।

जिभेची होते वळवळ
डोळ्यांना ही येतो जाग ।
चेहरा पडतो मग लाल
चढल्या आवाजाचा माग ।

बी पी जाते मग वाढून
लागते सगळीकडे आग ।
शांतताच वाटते मग बरी
देवाकडे तीच तुही माग ।
Sanjay R.


Friday, November 22, 2024

आपलं टेन्शन सरलं

उद्या पडन म्हाईत
येते कोन त जिकुन ।
बरबाद होते कोन
भांडे कुंडे हो इकुन ।

आपलं टेन्शन सरलं
त्यायले केलं मोकळं ।
इकासाच्या नावाखाली
ठेवतीन आता ढेकळं ।

पैशाचाच खेळ भाऊ
देशाचं न्हाई कोनाले ।
तुम्ही आम्हीच भैताड
देतो निवडून चोरायले ।
Sanjay R.


Thursday, November 21, 2024

संपले नाही अजून

संपले नाही हो अजून
खुप तर आहे बाकी ।
भविष्यातील संकटांची
चेपायची आहेत डोकी ।

दुरीतांचा खेळ सारा
नको म्हणतात दुष्मनी ।
आहेत अजाण इथे सारे
चालवतात ना मन मानी ।

मैत्री जपा शत्रुत्व ही जपा
शोधा आता आपला कोणी ।
कळते गळते सारेच इथे
आहे कुणात किती पाणी ।
Sanjay R.


Friday, November 15, 2024

मार्ग जीवनाचा

जन्माला आलो म्हणून मी
जगायला आहे तय्यार ।
हसत रडत सोसतो सारे
आहे ठेवले उघडुन दार ।

पाय माझे हातही माझेच
तरीही लागतोच ना आधार ।
ओढत ताणत मीही आता
घेतो उचलून सारा भार ।

मी माझा, ओझे ही माझेच
सांगा करू कशाची तक्रार ।
आशेवरच जगतो आता
होईल मार्ग जीवनाचा पार ।
Sanjay R.


Wednesday, November 13, 2024

पाहिले मीही मरण

लोक जमले कशास
कळेना मज कारण ।
कोणी होते का रडत
धरून माझे चरण ।

चढला साज माझ्यावर
बांधले फुलांचे तोरण ।
चार लोकांनी धरून
केले माझेच का हरण ।

रचला ढीग आता
पेट घेईल सरण ।
मिटून डोळे आता
पाहिले मीही मरण ।

फिरले परत सारेच

जागा होती विराण ।
एकटाच मी उरलो
भडकला अग्नी पण ।
Sanjay R.


Monday, November 11, 2024

डोळ्यास लावते पदर

तुझ्या भावनांची
आहे मलाही कदर ।
म्हणतेस तेव्हा मी
असतोच ना सादर ।

मनात माझ्याही असते
सारखे तुझेच सदर ।
कशाला तू सारखा
डोळ्यास लावते पदर ।

डोळ्यात आसवे तूझ्या
जीव होतो माझा अधर ।
समजून घे थोडा तूही
माझ्या मनातला गदर ।
Sanjay R.


Saturday, November 2, 2024

जळता दीप अंधारात

जळता दीप अंधारात
होते सारेच प्रकाशित ।

पेटला दिवा या मनात
धग निखाऱ्यांची उरात ।

राख सारे होणार नाही
ऊब त्याची कणाकणात ।

पडू दे कोळसा आता
घावच खोल हृदयात ।

आठवणींना कसे सावरू
भिजल्या त्याही रक्तात ।

विझविण्यास हवे पाणी
तेही नाही या डोळ्यात ।
Sanjay R.

Thursday, October 31, 2024

आली दिवाळी

आली आली, आली दिवाळी ।
अंगणात काढू, रंगीत रांगोळी ।

टिमटीम करती, दिव्यांच्या माळा ।
दीपक जळतो, आनंद सोहळा ।

नवीन कपडे, नवीन साज ।
उत्साह भरला, मनात आज ।

चकली लाडू, करंजी अनारसा ।
या या लवकर, पूजेला बसा ।

करू या पूजन, लक्ष्मी मातेचे ।
येऊ दे ग आता, क्षण सुखाचे ।

फटाक्यांचा मग, होईल गजर ।
जपून खायचे,  लागेल हो नजर ।
Sanjay R.


Wednesday, October 30, 2024

स्वर्ग

अर्थाचा केला अनर्थ
मधेच पडला स्वार्थ  ।
जुपले भांडण दोघांचे
साधू कसा मी परमार्थ ।

काय कुणाचा धर्म
करती सारेच अधर्म ।
चुकले पाऊल आता
जायचे नेईल तिथे कर्म ।

शोधून मिळेल का हो
मला ही हवाच स्वर्ग ।
सांगेल का कोणी मज
धरू कुठला मी मार्ग ।
Sanjay R.


Monday, October 28, 2024

गरीबाची दिवाळी

किती शिवयचे फाटलेले
परत परत जाते फाटून ।
दिवाळीच्या या तोंडावर
कसा आला गळा दाटून ।

हवे वाटतात नवे कपडे
चप्पल ही गेली हो तुटून ।
चार पैसे मिळवायचे 
ते स्वप्न ही नेले लुटून  ।

बायको पोरं वाट बघतात
सारखे हो उठून उठून ।
गरीबाची तर हीच व्यथा
सांगा आणू पैसे मी कुठून ।
Sanjay R.

Thursday, October 24, 2024

करू काय या मनाचे

किती सोसायचे तूझ्या
शब्दांचे गहिरे घाव ।
तरीही का असे मज
अंतर जाणण्याची धाव ।

कासेनुसे समजावतो
माझ्याच मी मनाला ।
माझे मलाच कळेना 
देऊ दोष मी कुणाला ।

आठवतो मीच आता
अर्थ तुझ्याच शब्दांचे ।
तेही आता आठवेना
करू काय मी मनाचे ।
Sanjay R.

Tuesday, October 22, 2024

जीवा शोधतो शिवा

ठरवूनच ठेवलं आता
कोण किती करतो याद ।
आता बघू या एकदा तरी
कोण दारावर देतं साद ।

ठेवून बसलो दार बंद
नव्हता कुठेच कसला गंध ।
एकमेकांना खेळवायचा
साऱ्यांनाच दिसला छंद ।

माणूस माणूस म्हणू कुणा
माणुसकी चा नाही अंश
स्वार्था पाई झाला वेडा
लोभा पोटी मारतो दंश ।

उघडुन ठेवले आता दार
एक मजला माणूस हवा ।
असेल नसेल कुणास ठाव
जीवा शोधतो त्याचा शिवा ।
Sanjay R.

Monday, October 21, 2024

फिरवू नको पहाट

वहीचे पान कोरे
शब्दांची बघते वाट ।
मनात विचार शून्य
भावनांची कुठे गाठ ।

उभ्या आडव्या रेषा
वाकले कुणी ताठ ।
संवाद मुक झाला
भरले डोळ्यांचे काठ ।

प्रवास नाही सोपा
सरळ जरी ही वाट ।
बघ वळून तू मागे
फिरवू नकोस पाठ ।
Sanjay R.

Friday, October 18, 2024

विरह

वळून मागे एक क्षण 
तू तर बघतच नाही ।
विचार मनात तुझाच
का कसा जात नाही ।

आली आठवण की
डोळ्यापुढून जात नाही ।
शोधतो भिरभिर तुला
कुठेच मला दिसत नाही ।

करू काय आठवणींचे
निघता ती निघत नाही ।
उठ बस तुझीच चाहूल
पापणीही हलत नाही ।

तहानभूक हरली आता
कशात मन लागत नाही ।
तुझ्याविना तर शून्य सारे
आता जगावे वाटत नाही ।
Sanjay R.

Thursday, October 17, 2024

शब्दांचे बोल

फक्त चार शब्दांचे बोल
असावा त्यातही स्नेह ।
फुलते मनाची पाकळी
झुलतो अवघाचि देह !
Sanjay R.

प्रतिबिंब

प्रतिबिंब चंद्राचे 
दुधात जेव्हा पडले ।
अमृत झाले दूध
मन चंद्रावर जडले ।
Sanjay R.

Wednesday, October 16, 2024

कोजागिरीचा चंद्र

पौर्णिमेच्या चंद्राचे
मनमोहक ते रूप ।
कोजागिरीच्या रात्री
आठवते तूच खूप ।

भरलेल्या दुधाचा
हाती येताच प्याला ।
दिसे रूप तुझे त्यात
हवा आरसा कशाला ।

मधुर गोडवा अमृताचा
तृप्त होते त्यात मन ।
तीच साखर ओठातली
आठवतात क्षण क्षण ।
Sanjay R.


Tuesday, October 15, 2024

आकांत

मनात या तुझ्या रे
आहे कशाची खंत ।
एक दिवस तुझाही
आहे होणार अंत ।

गेले सांगून किती
साधू आणि संत ।
थांबला कोण इथे
शोध तू एकांत ।

जोवर श्वास तुझे
तोवरच तू अशांत ।
थांबताच हे हृदय
होशील ना शांत ।

तुझे ते सोड आता
करू नकोस आकांत
बघ जरा आकाशात
तारे तिथेही  अनंत ।
Sanjay R.

Monday, October 14, 2024

कोण कुठे

दार शब्दांचे बंद इथे
शोधतो मी कोण कुठे ।
उघडतो शब्दांनी जेव्हा
सामर्थ्य शब्दांचे तिथे ।

शब्दात असे भावना 
मनात लागते कुठे ।
हृदयात होताच घाव
झरतात आसवे तिथे ।

शब्दांनी तुटतात धागे
नात्यातला बंध कुठे ।
ताणून होतात चिंध्या
उरतात शब्दच तिथे ।
Sanjay R.

दिवाळीचे वेध

झाला दसरा आता
लागले दिवाळीचे वेध ।
खर्चाचा पहाड पुढे 
खिशाला तर मोठे छेद  ।

चिवडा शेव लाडू गुलाबजाम
चकलीचेही तोंड वाकडे ।
बायकोला पहिजे नवीन साडी 
मुलांनाही हवेच कपडे ।

फटाके रांगोळी आकाश दिवा
घराला रंगही नवा नवा ।
इथे पगार नाही बोनस नाही 
गुल झाली माझीच हवा ।
Sanjay R.

Friday, October 11, 2024

श्रध्दांजली टाटांना

झाला अस्त सूर्याचा
अखंड ज्योत लावून ।
प्रगतीचे ध्येय त्याचे
देश निघाला न्हाऊन ।
आपलेसे केले जगाला
मदतीला जाई धाऊन ।
लक्षावधिंचा तो रतन
गेला साधेपणात राहून ।
करून टाटा तुम्ही गेलेत
आठवणीच आता ठेवून ।
Sanjay R.

Thursday, October 10, 2024

फेअर अनफेअर अफेअर

काय कसले फेअर
कशा कशाचे अफेअर  ।

भाव श्रद्धा असेल तर
नाहीच काही अनफेअर ।

फक्त हवी थोडी केअर
उचला थोडासा शेअर  ।

घडते कधी तरी रेअर
करावेच लागेल बेअर  ।

नकाच बघू आता देअर
चढेल फक्त एकच लेअर ।

चिकटून बसा एकदाचे
सांगा जाईल कुठे चेअर ।
Sanjay R.

Wednesday, October 9, 2024

असाही एक बंध

मन जुळले नी प्रेम जडले
हा एकच असा बंध ।
मोगाऱ्याला यावा बहर
दरवळावा दूर सुगंध ।
मनात मग आठवणींचा पूर
त्यातच होते धुंद ।
सारखे छळतात विचार
हा वेगळाच छंद ।
हळूहळू सुटतात धागे
सैल होतो बंध ।
गुलाब मोगरा सुकलेला
नसतो कशाचा गंध ।
परत सतावतात आठवणी
होते दरिही रुंद ।
एक सूर्य तर दुसरा चंद्र
सरला असतो आनंद ।
Sanjay R.

घे झेप आकाशी

घे झेप आकाशी
पसर थोडे पंख ।
सांभाळ तू जरासे
संकट इथे असंख्य ।

कुणास म्हणू दे काही
नको म्हणू आपला ।
मोहमाया इथे अपार
त्यात माणूस संपला । 

नको द्वेष कुणाचा
नको प्रेमाचा लळा ।
ओळख तू मयाजाळ
बरेच कापणारे गळा ।

आकाश जरी निरभ्र
क्षणात पडतात सरी ।
दिसेल तसेच नसते
समोर अदृश्य ती दरी ।
Sanjay R.

Tuesday, October 8, 2024

नवरात्री

नवरात्रीचे ते नऊ दिवस
करतात कुणी देवीला नवस ।
मिरवायचे असते सजून धजून
वाट बघतात संपूर्ण वरस ।

रंगांचेही महत्व किती ते
रोज रंग वेगळा बदलतील ।
मेकअप पोशाख नवा नवा
त्यातच स्वतः ला हरवतील

गरभा दांडिया लेझिम झिम्मा
नवरात्रीची मज्जाच वेगळी ।
सेल्फी फोटो बघा जरासे
उत्साहातच दिसतील सगळी ।
Sanjay R.


टाळी

शब्द शब्दांच्या ओळी
अंतर मनास जाळी ।
एकाच हाताने कुठे
वाजविता येते टाळी  ।
Sanjay R.

करार

विवाह हा कुठला नी
कशाचा हो करार ।
सुसंस्कृत लोकांचा
असा कसला विचार ।
आचार विचार नाही
तेच होतील लाचार ।
मूर्ख म्हणू या त्यांना
त्यांनाच हे स्वीकार ।
कौटुंबिक पद्धत ही
त्यात सारे सुविचार ।
सांगेल जो हा करार
करू त्यांचा धिक्कार ।
Sanjay R.

पडला आता विसर

दिवसा मागून दिवस गेले
पडला आता विसर ।
नको नको त्या आठवणी
झाल्या कशा धूसर ।

रोजच तर येतो दिवस नवा 
असतो कुठला असर ।
सकाळ संध्याकाळ तेच ते
होतो कसातरी बसर ।

फुलही गेले सुकून आता
उरली कुठे कसर ।
भेद क्षणाचा की मनाचा कळेना
मी विसरलो तूही विसर ।
Sanjay R.

Sunday, October 6, 2024

प्रेमाचा हल्ला

अंतरी भावनांचा कल्ला
ह्रदयात प्रेमाचा हल्ला ।
वाट ही तू चालू नकोस
मनाचा अनमोल सल्ला ।

डोक्यात विचारांचे थैमान
क्षणो क्षणी हरपते भान ।
दूर दूर तू राहू नकोस
आठवण येता लागते ध्यान ।

होकार नकार दूर अजून
नजरेनेच तर टिपले बाण ।
करू करू मी काय करू
सांगा कुणी हो मी अजाण ।
Sanjay R.

निशा

कुठली पूर्व कुठली पश्चिम
सूर्यच ठरवितो आपली दिशा ।
तापून निघतो दिवसभर जेव्हा
निजवते घेऊन कुशीत निशा ।
Sanjay R.

Thursday, October 3, 2024

टी व्ही बंद पडला

आमचा टी व्ही बंद पडला
बातम्याच हो दिसत नाही ।
पिक्चर मालिका सारेच बंद
म्हणून कोणीच हसत नाही ।

सगळ्यांचा डोक्यावर हात
विचारही येतात काही बाही ।
सारेच बसलेत चिडी चूप
कोणीच कोणाशी बोलत नाही ।

मन झाले उदास किती
भूकही आताशा लागत नाही ।
वाट बघतोय डायनिंग टेबल
तासन् तास कोणी जेवत नाही ।

मेकॅनिक म्हणतो विकून टाका
नवीन शिवाय उपाय नाही ।
खिसा थोडा खालीच आहे
महागाईत तोही भरत नाही ।

लाडकी बहिण लाडका भाऊ
त्यांच्याशी पण जमत नाही ।
काय करू सांगा हो जरा
घरात कोणीच हसत नाही  ।
Sanjay R.

Wednesday, October 2, 2024

अश्रू कोण ढाळतं

ओढ जर असेल तर
कोण कशास टाळतं ।
नसेल काहीच तर
अश्रूही कोण ढाळतं ।

प्रेम असेल मनात तर
विरहातही मन जळतं ।
राग जर क्षणाचा तर
नियमच कोण पाळतं ।

भाव मनात असेल तर
सारं मनालाही कळतं ।
दुःख मनात नसेल तर
आतच तेही हळहळतं ।
Sanjay R.

Tuesday, October 1, 2024

पाचोळा

तुमच्या सारखं मला
बिलकुल जमत नाही ।
वाटतं एकटाच पडलो
कसं ते गमत ही नाही ।

झाले आकाश निरभ्र
ढगांचा पत्त्ता नाही ।
भिजलो खूप पावसात
मनात ओलावाच नाही ।

पालवी सुकून गेली
उरले पानही नाही ।
गुलाब मोगरा कुठला
फुलला झेंडूही नाही ।

रुक्ष नीरस झाले सारे
पाचोळा दिसत नाही ।
लोपले हसू आता, पण
डोळ्यात अश्रू नाही ।
Sanjay R.


ऊन वारा पाऊस

काल पर्यंत पावसाने
झालो ओला चिंब ।
नव्हते आकाशात कुठे
सूर्याचे प्रती बिंब ।

आज भर दुपारी 
घामाने झालो ओला ।
परवा पडेल थंडी
कुठे ते स्वेटर बोला ।

निसर्गाचे आता
कळेच ना काही ।
कसलं जीवन हे
इथे शांतीच हो नाही ।
Sanjay R.

मन हळवे पान

ऐका देऊन ध्यान
उघडे करा कान ।
कुणा कशाची वान
देऊ नका हो तान ।

जितका द्यावा मान
वाढते तितकीच शान ।
पण हरपू नका भान
बघा होऊन लहान  ।

मन हळवे पान
जपाना नाती छान ।
सुटताच ही  जाण 
जीवनाचे होईल रान ।
Sanjay R.

Monday, September 30, 2024

काळीज

  " काळीज "
दुःख म्हणू मी कशास
आग पेटली काळजात ।
श्वास करती धडधड
बंध तुटले अंतरात ।
Sanjay R.