Thursday, October 31, 2024

आली दिवाळी

आली आली, आली दिवाळी ।
अंगणात काढू, रंगीत रांगोळी ।

टिमटीम करती, दिव्यांच्या माळा ।
दीपक जळतो, आनंद सोहळा ।

नवीन कपडे, नवीन साज ।
उत्साह भरला, मनात आज ।

चकली लाडू, करंजी अनारसा ।
या या लवकर, पूजेला बसा ।

करू या पूजन, लक्ष्मी मातेचे ।
येऊ दे ग आता, क्षण सुखाचे ।

फटाक्यांचा मग, होईल गजर ।
जपून खायचे,  लागेल हो नजर ।
Sanjay R.


Wednesday, October 30, 2024

स्वर्ग

अर्थाचा केला अनर्थ
मधेच पडला स्वार्थ  ।
जुपले भांडण दोघांचे
साधू कसा मी परमार्थ ।

काय कुणाचा धर्म
करती सारेच अधर्म ।
चुकले पाऊल आता
जायचे नेईल तिथे कर्म ।

शोधून मिळेल का हो
मला ही हवाच स्वर्ग ।
सांगेल का कोणी मज
धरू कुठला मी मार्ग ।
Sanjay R.


Monday, October 28, 2024

गरीबाची दिवाळी

किती शिवयचे फाटलेले
परत परत जाते फाटून ।
दिवाळीच्या या तोंडावर
कसा आला गळा दाटून ।

हवे वाटतात नवे कपडे
चप्पल ही गेली हो तुटून ।
चार पैसे मिळवायचे 
ते स्वप्न ही नेले लुटून  ।

बायको पोरं वाट बघतात
सारखे हो उठून उठून ।
गरीबाची तर हीच व्यथा
सांगा आणू पैसे मी कुठून ।
Sanjay R.

Thursday, October 24, 2024

करू काय या मनाचे

किती सोसायचे तूझ्या
शब्दांचे गहिरे घाव ।
तरीही का असे मज
अंतर जाणण्याची धाव ।

कासेनुसे समजावतो
माझ्याच मी मनाला ।
माझे मलाच कळेना 
देऊ दोष मी कुणाला ।

आठवतो मीच आता
अर्थ तुझ्याच शब्दांचे ।
तेही आता आठवेना
करू काय मी मनाचे ।
Sanjay R.

Tuesday, October 22, 2024

जीवा शोधतो शिवा

ठरवूनच ठेवलं आता
कोण किती करतो याद ।
आता बघू या एकदा तरी
कोण दारावर देतं साद ।

ठेवून बसलो दार बंद
नव्हता कुठेच कसला गंध ।
एकमेकांना खेळवायचा
साऱ्यांनाच दिसला छंद ।

माणूस माणूस म्हणू कुणा
माणुसकी चा नाही अंश
स्वार्था पाई झाला वेडा
लोभा पोटी मारतो दंश ।

उघडुन ठेवले आता दार
एक मजला माणूस हवा ।
असेल नसेल कुणास ठाव
जीवा शोधतो त्याचा शिवा ।
Sanjay R.