Friday, November 15, 2024

मार्ग जीवनाचा

जन्माला आलो म्हणून मी
जगायला आहे तय्यार ।
हसत रडत सोसतो सारे
आहे ठेवले उघडुन दार ।

पाय माझे हातही माझेच
तरीही लागतोच ना आधार ।
ओढत ताणत मीही आता
घेतो उचलून सारा भार ।

मी माझा, ओझे ही माझेच
सांगा करू कशाची तक्रार ।
आशेवरच जगतो आता
होईल मार्ग जीवनाचा पार ।
Sanjay R.


Wednesday, November 13, 2024

पाहिले मीही मरण

लोक जमले कशास
कळेना मज कारण ।
कोणी होते का रडत
धरून माझे चरण ।

चढला साज माझ्यावर
बांधले फुलांचे तोरण ।
चार लोकांनी धरून
केले माझेच का हरण ।

रचला ढीग आता
पेट घेईल सरण ।
मिटून डोळे आता
पाहिले मीही मरण ।

फिरले परत सारेच

जागा होती विराण ।
एकटाच मी उरलो
भडकला अग्नी पण ।
Sanjay R.


Monday, November 11, 2024

डोळ्यास लावते पदर

तुझ्या भावनांची
आहे मलाही कदर ।
म्हणतेस तेव्हा मी
असतोच ना सादर ।

मनात माझ्याही असते
सारखे तुझेच सदर ।
कशाला तू सारखा
डोळ्यास लावते पदर ।

डोळ्यात आसवे तूझ्या
जीव होतो माझा अधर ।
समजून घे थोडा तूही
माझ्या मनातला गदर ।
Sanjay R.


Saturday, November 2, 2024

जळता दीप अंधारात

जळता दीप अंधारात
होते सारेच प्रकाशित ।

पेटला दिवा या मनात
धग निखाऱ्यांची उरात ।

राख सारे होणार नाही
ऊब त्याची कणाकणात ।

पडू दे कोळसा आता
घावच खोल हृदयात ।

आठवणींना कसे सावरू
भिजल्या त्याही रक्तात ।

विझविण्यास हवे पाणी
तेही नाही या डोळ्यात ।
Sanjay R.

Thursday, October 31, 2024

आली दिवाळी

आली आली, आली दिवाळी ।
अंगणात काढू, रंगीत रांगोळी ।

टिमटीम करती, दिव्यांच्या माळा ।
दीपक जळतो, आनंद सोहळा ।

नवीन कपडे, नवीन साज ।
उत्साह भरला, मनात आज ।

चकली लाडू, करंजी अनारसा ।
या या लवकर, पूजेला बसा ।

करू या पूजन, लक्ष्मी मातेचे ।
येऊ दे ग आता, क्षण सुखाचे ।

फटाक्यांचा मग, होईल गजर ।
जपून खायचे,  लागेल हो नजर ।
Sanjay R.