Friday, October 18, 2024

विरह

वळून मागे एक क्षण 
तू तर बघतच नाही ।
विचार मनात तुझाच
का कसा जात नाही ।

आली आठवण की
डोळ्यापुढून जात नाही ।
शोधतो भिरभिर तुला
कुठेच मला दिसत नाही ।

करू काय आठवणींचे
निघता ती निघत नाही ।
उठ बस तुझीच चाहूल
पापणीही हलत नाही ।

तहानभूक हरली आता
कशात मन लागत नाही ।
तुझ्याविना तर शून्य सारे
आता जगावे वाटत नाही ।
Sanjay R.

Thursday, October 17, 2024

शब्दांचे बोल

फक्त चार शब्दांचे बोल
असावा त्यातही स्नेह ।
फुलते मनाची पाकळी
झुलतो अवघाचि देह !
Sanjay R.

प्रतिबिंब

प्रतिबिंब चंद्राचे 
दुधात जेव्हा पडले ।
अमृत झाले दूध
मन चंद्रावर जडले ।
Sanjay R.

Wednesday, October 16, 2024

कोजागिरीचा चंद्र

पौर्णिमेच्या चंद्राचे
मनमोहक ते रूप ।
कोजागिरीच्या रात्री
आठवते तूच खूप ।

भरलेल्या दुधाचा
हाती येताच प्याला ।
दिसे रूप तुझे त्यात
हवा आरसा कशाला ।

मधुर गोडवा अमृताचा
तृप्त होते त्यात मन ।
तीच साखर ओठातली
आठवतात क्षण क्षण ।
Sanjay R.


Tuesday, October 15, 2024

आकांत

मनात या तुझ्या रे
आहे कशाची खंत ।
एक दिवस तुझाही
आहे होणार अंत ।

गेले सांगून किती
साधू आणि संत ।
थांबला कोण इथे
शोध तू एकांत ।

जोवर श्वास तुझे
तोवरच तू अशांत ।
थांबताच हे हृदय
होशील ना शांत ।

तुझे ते सोड आता
करू नकोस आकांत
बघ जरा आकाशात
तारे तिथेही  अनंत ।
Sanjay R.