Wednesday, October 16, 2024

कोजागिरीचा चंद्र

पौर्णिमेच्या चंद्राचे
मनमोहक ते रूप ।
कोजागिरीच्या रात्री
आठवते तूच खूप ।

भरलेल्या दुधाचा
हाती येताच प्याला ।
दिसे रूप तुझे त्यात
हवा आरसा कशाला ।

मधुर गोडवा अमृताचा
तृप्त होते त्यात मन ।
तीच साखर ओठातली
आठवतात क्षण क्षण ।
Sanjay R.


Tuesday, October 15, 2024

आकांत

मनात या तुझ्या रे
आहे कशाची खंत ।
एक दिवस तुझाही
आहे होणार अंत ।

गेले सांगून किती
साधू आणि संत ।
थांबला कोण इथे
शोध तू एकांत ।

जोवर श्वास तुझे
तोवरच तू अशांत ।
थांबताच हे हृदय
होशील ना शांत ।

तुझे ते सोड आता
करू नकोस आकांत
बघ जरा आकाशात
तारे तिथेही  अनंत ।
Sanjay R.

Monday, October 14, 2024

कोण कुठे

दार शब्दांचे बंद इथे
शोधतो मी कोण कुठे ।
उघडतो शब्दांनी जेव्हा
सामर्थ्य शब्दांचे तिथे ।

शब्दात असे भावना 
मनात लागते कुठे ।
हृदयात होताच घाव
झरतात आसवे तिथे ।

शब्दांनी तुटतात धागे
नात्यातला बंध कुठे ।
ताणून होतात चिंध्या
उरतात शब्दच तिथे ।
Sanjay R.

दिवाळीचे वेध

झाला दसरा आता
लागले दिवाळीचे वेध ।
खर्चाचा पहाड पुढे 
खिशाला तर मोठे छेद  ।

चिवडा शेव लाडू गुलाबजाम
चकलीचेही तोंड वाकडे ।
बायकोला पहिजे नवीन साडी 
मुलांनाही हवेच कपडे ।

फटाके रांगोळी आकाश दिवा
घराला रंगही नवा नवा ।
इथे पगार नाही बोनस नाही 
गुल झाली माझीच हवा ।
Sanjay R.

Friday, October 11, 2024

श्रध्दांजली टाटांना

झाला अस्त सूर्याचा
अखंड ज्योत लावून ।
प्रगतीचे ध्येय त्याचे
देश निघाला न्हाऊन ।
आपलेसे केले जगाला
मदतीला जाई धाऊन ।
लक्षावधिंचा तो रतन
गेला साधेपणात राहून ।
करून टाटा तुम्ही गेलेत
आठवणीच आता ठेवून ।
Sanjay R.