Tuesday, October 8, 2024

पडला आता विसर

दिवसा मागून दिवस गेले
पडला आता विसर ।
नको नको त्या आठवणी
झाल्या कशा धूसर ।

रोजच तर येतो दिवस नवा 
असतो कुठला असर ।
सकाळ संध्याकाळ तेच ते
होतो कसातरी बसर ।

फुलही गेले सुकून आता
उरली कुठे कसर ।
भेद क्षणाचा की मनाचा कळेना
मी विसरलो तूही विसर ।
Sanjay R.

Sunday, October 6, 2024

प्रेमाचा हल्ला

अंतरी भावनांचा कल्ला
ह्रदयात प्रेमाचा हल्ला ।
वाट ही तू चालू नकोस
मनाचा अनमोल सल्ला ।

डोक्यात विचारांचे थैमान
क्षणो क्षणी हरपते भान ।
दूर दूर तू राहू नकोस
आठवण येता लागते ध्यान ।

होकार नकार दूर अजून
नजरेनेच तर टिपले बाण ।
करू करू मी काय करू
सांगा कुणी हो मी अजाण ।
Sanjay R.

निशा

कुठली पूर्व कुठली पश्चिम
सूर्यच ठरवितो आपली दिशा ।
तापून निघतो दिवसभर जेव्हा
निजवते घेऊन कुशीत निशा ।
Sanjay R.

Thursday, October 3, 2024

टी व्ही बंद पडला

आमचा टी व्ही बंद पडला
बातम्याच हो दिसत नाही ।
पिक्चर मालिका सारेच बंद
म्हणून कोणीच हसत नाही ।

सगळ्यांचा डोक्यावर हात
विचारही येतात काही बाही ।
सारेच बसलेत चिडी चूप
कोणीच कोणाशी बोलत नाही ।

मन झाले उदास किती
भूकही आताशा लागत नाही ।
वाट बघतोय डायनिंग टेबल
तासन् तास कोणी जेवत नाही ।

मेकॅनिक म्हणतो विकून टाका
नवीन शिवाय उपाय नाही ।
खिसा थोडा खालीच आहे
महागाईत तोही भरत नाही ।

लाडकी बहिण लाडका भाऊ
त्यांच्याशी पण जमत नाही ।
काय करू सांगा हो जरा
घरात कोणीच हसत नाही  ।
Sanjay R.

Wednesday, October 2, 2024

अश्रू कोण ढाळतं

ओढ जर असेल तर
कोण कशास टाळतं ।
नसेल काहीच तर
अश्रूही कोण ढाळतं ।

प्रेम असेल मनात तर
विरहातही मन जळतं ।
राग जर क्षणाचा तर
नियमच कोण पाळतं ।

भाव मनात असेल तर
सारं मनालाही कळतं ।
दुःख मनात नसेल तर
आतच तेही हळहळतं ।
Sanjay R.