Monday, September 9, 2024

संवेदना

दिवसा मागून गेलेत दिवस 
झेलल्या अगणित मीही वेदना ।
कळलेच नाही कधी सरली
मनातली होती नव्हती संवेदना ।

ठेऊन असतो मी डोळे उघडे पण
मागचे पुढचे काहीच का दिसेना ।
तुमच्यासारखाच गोंगाट ऐकतो मीही 
पण शब्दच उलगडत नाही कानांना ।

बस फक्त चालत असतो पुढे पुढे
घेऊन निर्विकार मी भावनांना ।
किती जोपासून ठेवायचे सांगा
दगडी काळजात या संवेदनांना ।
Sanjay R.

सुखदुःख

सुख असो वा दुःख
कशाचीच कमी नाही ।
भोग तर भोगायचेच
म्हणायचे कशास नाही ।

सुख म्हणजे आहे काय
दुःखा शिवाय सुख नाही ।
डोळ्यात आसवांचे थेंब
नी गालावर हसू नाही ।

दुःखात ही बघा हसून
त्याचे सारखे सुख नाही ।
हसा थोडे हसावा थोडे
त्यातच कळेल, दुःख नाही ।
Sanjay R.

Friday, September 6, 2024

या ना बाप्पा आता घरी

या ना बाप्पा आता घरी
वर्ष झाले हो ठेऊन दूरी ।
आसन बघा छान मांडले
स्वागताची झाली तयारी ।

गडबड होती थोडी जराशी
पाऊस पाणी होते भारी ।
चिंता होती जरा मनाशी
थांबला आता थोडा तरी ।

दिवस दहा हे आनंदाचे
तोरण पताका दारोदारी ।
मोदकांचा प्रसाद आहे
घडेल आम्हा सोबत वारी ।

आरती प्रसाद टाळ मृदंग ।
भजन पूजन करू सारी ।
या या आता लवकर या हो
बाप्पा तुम्ही आमच्या घरी ।
Sanjay R.


ही वाट दूर जाते

ही वाट दूर जाते
वाट कोण पाहते ।

उठून मीही पहाटे
निघालो तुडवत काटे ।

थकलो भागलो जेव्हा
शोधतो आडोसा कुठे ।

वरती आकाश मोकळे
खाली गवत छोटे ।

व्याकुळ होतो तहानेने
कोरड्यात पाणी खोटे ।

आसवेही सरले आता
अंतरातला श्वास दाटे ।
Sanjay R.


Thursday, September 5, 2024

डोक्याला काव

गोंधळ इथे किती
डोक्याला काव नुसता ।
दिसला तर सांगा हो
कुणी माणूस हसता ।

कपाळाला आठ्या चार
टेंशन उठता बसता ।
पोटाचे सोडाच आता
इथे खातो फक्त खस्ता ।

दिवस रात्र एकच चिंता
भुकेचा शोधतो रस्ता ।
कामास जुंपलेला बैल जसा
ढोसतो तुतारी नुसता ।
Sanjay R.