Thursday, September 5, 2024

डोक्याला काव

गोंधळ इथे किती
डोक्याला काव नुसता ।
दिसला तर सांगा हो
कुणी माणूस हसता ।

कपाळाला आठ्या चार
टेंशन उठता बसता ।
पोटाचे सोडाच आता
इथे खातो फक्त खस्ता ।

दिवस रात्र एकच चिंता
भुकेचा शोधतो रस्ता ।
कामास जुंपलेला बैल जसा
ढोसतो तुतारी नुसता ।
Sanjay R.

Wednesday, September 4, 2024

आभाळ

दिवस पावसाचे कसे, येते भरून आभाळ
गच्च होतो काळोख, वरती काळे आभाळ ।

मधेच येतो जाऊन, पाऊस सारून आभाळ
पाणी पाणी होते सारे, कोसळते आभाळ ।

पुराचे पाणी घरात, नदी नाले आभाळ ।
संकट सारे डोईवर, डोळ्यात दिसते आभाळ ।

शेत गेले वाहून, वावरात दिसे आभाळ ।
मेहनतीच्या झाल्या चिंध्या, नेले लुटून आभाळ ।

पोट भरायचे कसे , कोर भाकरीचे आभाळ ।
कर्ज सावकाराचे किती, फेडायचे आभाळ ।

गळ्यात घेतो फास, तिथेही असते आभाळ ।
लाकडे ओली पावसाने, जळायचेही आभाळ ।
Sanjay R.


ध्यास

नात्यात कुठला भास
असतो त्यात ध्यास ।
येते आठवण मनात
नी फुलतात मग श्वास ।
Sanjay R.

Tuesday, September 3, 2024

परिकथा

पंख लावून पाठीशी
दूर जावे आकाशी ।
दूर दूर ते आभाळ
करावे गूज ढगांशी ।

धरावा फेर थोडा
चांदोबाच्या उशाशी ।
उचलून चार चांदण्या
द्याव्या नेऊन सूर्याशी ।

परिकथांची ही दुनिया
घेतो वाचून जराशी ।
स्वप्न बघतो रात्रभर
संबंध कुठला कशाशी ।
Sanjay R.


Monday, September 2, 2024

जगण्याची लढाई

पूर्वजांनी लढली
सिमेसाठी लढाई ।
करतो आम्ही आता
पोटासाठी चढाई ।

पैसा पैसा करतात
श्रीमंतांची बढाई ।
गरिबाला कोण पुसे
आयुष्यभर मढाई ।

कष्ट आणिक कर्ज
आयुष्यभर भराई ।
जगता जगता मारतो
सावकार इथे कसाई ।
Sanjay R.