Wednesday, September 4, 2024

आभाळ

दिवस पावसाचे कसे, येते भरून आभाळ
गच्च होतो काळोख, वरती काळे आभाळ ।

मधेच येतो जाऊन, पाऊस सारून आभाळ
पाणी पाणी होते सारे, कोसळते आभाळ ।

पुराचे पाणी घरात, नदी नाले आभाळ ।
संकट सारे डोईवर, डोळ्यात दिसते आभाळ ।

शेत गेले वाहून, वावरात दिसे आभाळ ।
मेहनतीच्या झाल्या चिंध्या, नेले लुटून आभाळ ।

पोट भरायचे कसे , कोर भाकरीचे आभाळ ।
कर्ज सावकाराचे किती, फेडायचे आभाळ ।

गळ्यात घेतो फास, तिथेही असते आभाळ ।
लाकडे ओली पावसाने, जळायचेही आभाळ ।
Sanjay R.


ध्यास

नात्यात कुठला भास
असतो त्यात ध्यास ।
येते आठवण मनात
नी फुलतात मग श्वास ।
Sanjay R.

Tuesday, September 3, 2024

परिकथा

पंख लावून पाठीशी
दूर जावे आकाशी ।
दूर दूर ते आभाळ
करावे गूज ढगांशी ।

धरावा फेर थोडा
चांदोबाच्या उशाशी ।
उचलून चार चांदण्या
द्याव्या नेऊन सूर्याशी ।

परिकथांची ही दुनिया
घेतो वाचून जराशी ।
स्वप्न बघतो रात्रभर
संबंध कुठला कशाशी ।
Sanjay R.


Monday, September 2, 2024

जगण्याची लढाई

पूर्वजांनी लढली
सिमेसाठी लढाई ।
करतो आम्ही आता
पोटासाठी चढाई ।

पैसा पैसा करतात
श्रीमंतांची बढाई ।
गरिबाला कोण पुसे
आयुष्यभर मढाई ।

कष्ट आणिक कर्ज
आयुष्यभर भराई ।
जगता जगता मारतो
सावकार इथे कसाई ।
Sanjay R.



Saturday, August 31, 2024

झोपडीतले सुख

" झोपडीतले सुख "

झोपडीतले सुख
राजवाड्यात कुठे ।
छोट्याश्या मनात
जसे स्वप्नच मोठे ।

स्वतःच स्वतःचे 
करायचे काम सारे ।
कोण येतंय आत
इथे उघडीच दारे ।

दिवसभर कष्टाने
घाम कसा गळे ।
पडताच कुठेही
मिटतात डोळे ।

नाही चिंता कशाची
नाही कसले टेन्शन ।
तळ हातावरची कमाई
हवी कसली पेन्शन ।

नको आम्हा मान
नकोच हो सन्मान ।
आम्हीच मिरवतो
त्यात आमची शान ।

कर्ज काढून कधी
साजरे होतात सण ।
आनंदातच भोगतो
उपासाचे ही क्षण ।

नाही कुठल्या आशा
नाही कशाची अपेक्षा ।
जन्मा सोबत मिळाली
हीच आम्हास दीक्षा ।

दुःखही सुख मानुन
मनातच  हसायचे ।
मरत नाही म्हणून
फक्त इथे जगायचे ।

सहज पणे झेलतो
नशिबाचे सारे भोग ।
मरणाला पण आम्हा
लागतोच कुठे योग ।

संजय रोंघे, नागपूर.
मोबाईल - 8380074730