Wednesday, March 8, 2023

आली होळी आली

आली आली होळी आली
गालावर दिसे रंगाची लाली ।
बघून चेहरा ओळख पटेना
वाटे जणू आहे तो मवाली ।

पळस हिरवा झाला लाल ।
कसे रंगात रंग  मिळाले
भासे बहुरंगी ती शाल ।

राधा झाली वेडी शोधी
आहे कुठे तो कान्हा ।
रंग उधळून गेला कसा
हवा त्यास ऐक बहाना ।
Sanjay R.


डोळ्यात मी बघतो

डोळ्यात मी बघतो
माझीच मी दुनिया ।
निसर्गाचे सुंदर रूप
देवाचीच ही किमया ।

कुठे उंचच उंच डोंगर
कुठे खोल खोल कपारी ।
झुळझुळ वाहते पाणी
दृश्य ते किती मनोहारी ।
Sanjay R.


सुटतो मनाचा भार

तुझ्या शब्दात मी शोधतो
माझ्या जीवनाचा आधार ।
शब्द असतात ते दोन
सुटतो सारा मनाचा भार ।

आठवतो कधी मी ही
तुझ्या विचारांचा सार ।
हळूच मग फुलते कळी
नी अंतरात वाजते सतार ।

फुलतो मनात मोगरा
येतो गुलाबाला ही बहार ।
सूगंध दरवळतो दूर
भरतो श्वासात मी हुंकार ।
Sanjay R.


लावू नको तू रंग

लावू नको तू रंग
नको भिजवू अंग ।
स्वप्नात तुझ्या मी दंग
जगतो त्यातच अभंग ।

टाकू नको तू रंग
भिजवू नकोस अंग ।
बांधला मी चंग
होईल मग जंग ।

चल घेऊ या भंग
होवू त्यातच दंग ।
हवा तुझाच संग
लावू नको तू रंग ।
Sanjay R.


रंग पंचमी

लहान पण आठवते अजून.
पूर्ण वर्ष जायचं होळीची वाट बघता बघता.
तेव्हा होळीची दोन दोन दिवस सुट्टी असायची.
त्यामुळे वर्गात अगोदरच रंग पंचमी सुरू व्हायची.
वर्गात मग रंग शाईचे उपयोगी पडायचे. एकमेकांच्या अंगावर शाई फेकून रंगोत्सव साजरा व्हायचा. कुणी चिडायचा, कुणी मारायला धावायचा, पण त्यातही खूप मजा यायची. होळीच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळी मित्र मंडळी लाकड जमा करायला निघायची. गावाबाहेर वाळलेली झाडे बघून ती ओढत आणायची. त्यातही ऐक वेगळीच मजा होती.
होळी पेटली की मग रात्रभर जागरण असायचे. कधी आमच्यातले मोठे उनाड पोरे, कुणाच्या घरुन लाकडे, बाजा, खाटा, पण चोरून आणून होळीत स्वाहा करायचे. मग दुसऱ्या दिवशी ज्याच्या घरून ते आणले ते खूप आरडाओरडा करायचे. शिव्या घालायचे. पण लाकडे कुणी आणली ते कधीच कळत नसे.
मग सकाळी रंग खेळायला सुरुवात व्हायची.
प्रत्येकाचा वेगळा रंग असायचा. सगळ्यांचे चेहरे अगदी अनोळखी होऊन जायचे. कुणी पाणी फेकून ओले करायचे, तर कुणी चिखलाने आंघोळ घालायचे. कुणाचा रंग हिरवा लाल तर कुणाचा काळा.
त्या रंगात आई पण आपल्या मुलाला ओळखत नसे. शेवटी रंग खेळून थकलो की मग घरी जाऊन आंघोळ करायची, लागलेले रंग फिकट व्हायचे पण निघायचे मात्र नाही.
मग पुरण पोळी, करंज्या चिवडा यांचा नास्ता करूनच पोट भरून जायचे.
या सगळ्या आनंदात एखादा व्यक्ती दारू पिऊन तुल्ल होऊन यायचा. खूप ओरड करायचा. मुलं त्याला घाबरायचे पण दुरून त्याची नक्कल करायचे. मग तो खूप चिडायचा, शीवी द्यायचा , मागे धावायचा सुद्धा. पण त्या पळापळी त खूप मजा यायची.
आजकाल मात्र ती मजा तो आनंद हरवला आहे असे वाटते.
आता नैसर्गिक रंगांची जागा रासायनिक रंग गुलालानी घेतली. व्यसन करणाऱ्यांची संख्या ही खूप वाढली. जंगले उरली नाहीत म्हणून लाकडे जाळणे पण कमी झाले.
त्यामुळे होळीत रंग खेळायला भीतीच जास्त वाटते.
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🔥 🎉🎉💥
Sanjay Ronghe