Sunday, May 15, 2022

शब्दही जड झाले

सुचेना काहीच मला
आज शब्दही जड झाले ।
बघून वाट मी थकलो
मन अंतरात जाऊन आले ।

आठवणींचा गुंता तेथे
काय त्यातून घेऊन आलो ।
मनच मग सांगून गेले
दूर तर मी तेव्हाच झालो ।

कोण मी कुठला कसा
मनात थोडा दुःखी झालो ।
खोटे खोटे का हसतो
पोरका मी तेव्हाच झालो ।
Sanjay R.


मैत्री

वाहत्या पाण्याची
कशी संथ धार ।
तुझ्या माझ्या मैत्रीचा
अगदी तसाच सार ।

नाव निघाली मैत्रीची
तिला मैत्रीचा आधार ।
दूर असूनही वाटे
जवळ किती तो पार ।

जुळवल्यानी जुळतात
असू दे वेगळे विचार ।
मित्र दिसताच मात्र
होतो मैत्रीचा संचार ।
Sanjay R.


उन्हाची झळ

का तापतो सूर्य असा
आगीचा तो गोळा जसा ।
पाण्यासाठी व्याकुळ सारे
जीव झाला वेडा पिसा ।
दूर दसते ते मृगजळ
दूर किती जाऊ कसा ।
शोधतो सावली जराशी
वृक्षतोडीचा घेऊन वसा ।
Sanjay R.


सांगू मी कुणास

सांगू मी कुणास
काय किती मनात ।
सुखाचा करतो शोध
गुरफटतो दुःखात ।
बोचती काटे किती
आठवणींच्या वाटेत ।
धडपड चाले सारी
डुबनाऱ्या लाटेत ।
धरतो प्रकाशाची वाट
अंधार मात्र डोळ्यात ।
Sanjay R.


पाऊलवाट

नसेल खिश्यात पैसा एक
विचार मात्र मनात नेक ।
बोलतो जे मी तेच करतो
नाही कुठली फेका फेक ।
लोभ नाही मोह नाही
मत्सर माया ना अतिरेक ।
असेल त्यातच होतो खुश
जपून टाकतो पाऊल प्रत्येक ।
Sanjay R.