Friday, May 13, 2022

आरसा

कशाला हवा आरसा
 रूप हे नाही सुंदर ।
मन थोडे बघा वाचून
कळेल मग किती अंतर ।

मीच मला बघतो जेव्हा
का असा हा पडतो पेच ।
आरशाला नका विचारू
दाखवील तो आहे तेच ।

नाही खळी या गालावरती
भाव शून्य दिसे डोळ्यात ।
शब्द अजूनही तिथेच थांबून
आहे बसले रुतून गळ्यात ।
Sanjay R.

परिचारिका

दवाखाना म्हटले की 
तूच तर येतेस समोर ।
डॉक्टर नंतर आम्हास
फक्त तूच असतेस थोर ।

कडू कडू ते औषध किती
तुझ्या हाताने होते गोड ।
सेवाभावी तुझे कार्य
त्यास नाही कशाची तोड ।

परिचारिका म्हणून वावरते
आजाऱ्याला होतो आधार ।
मन लावून तू करतेस सेवा
नसतो स्वतः चाही विचार ।

नमन तुझ्या समर्पणास
मायेचा होतो आभास ।
दुर्धर क्षणात तुझाच विश्वास
तूच देतेस जगण्याची आस ।
Sanjay R.

Thursday, May 12, 2022

ओळख तू धोका

सांभाळ तू जरा
आहे पुढे धोका ।
नको समजू तू
मिळालाय मोका ।

दिसते तसे नसते
म्हणून जग फसते ।
दुःख या जीवनाचे
भोगायचेच असते ।

निर्धार तू नको सोडू
यश हातात आहे  ।
नको बघुस मागे
पुढेच जायचे आहे ।
Sanjay R.


Wednesday, May 11, 2022

ऊन

उन्हात शोधतो सावली
कुठेच झाड दिसेना ।
पाखरं मग गेलीत कुठे
शांतता ही सहवेना ।
Sanjay R.

वाढदिवस

स्वतःची एक आठवण
आनंदाचे थोडे क्षण ।
शुभेच्छांचा होतो वर्षाव
उत्साही मग होते मन ।
घालूनिया नवीन कपडे
करून घ्यायचे औक्षवन ।
गोड धोंड नाच गाणे
करू सारे केक कापून ।
वाढदिवसाची मौज मजा
आठवायचे ते बालपण ।
Sanjay R.