Thursday, November 4, 2021

पाहता तुझे स्मित

पाहता तुझे स्मित
मन जाते हरकून ।
विचार नसतो दुसरा
जातो सारेच विसरून ।

बघतो डोळ्यात तुझ्या
सुखाचा एक झरा ।
पापणीही मिटत नाही
हसरा तुझा चेहरा ।

नकळत येती विचार
काय तुझ्या मनात ।
डोळेच संगती मग
कळते अंतरास क्षणात ।

पुरे आता खेळ हा
चल करू या संवाद ।
आसुसले कान माझे
आहे ऐकायचा नाद ।

आकाशातल्या चांदण्या
सोबत तुझ्या मोजायच्या ।
क्षितिजाआड जाऊनिया
गुज गोष्टी खूप करायच्या ।
Sanjay R.


आनंद

सरलेत शब्द आता
काय मनात दाटले ।

उलगडला सारा गुंता
हायसे आता वाटले ।

मिटली सारीच चिंता
स्वप्न मनात थाटले ।

काढून दुखातली  वाट
आनंदास आज गाठले ।
Sanjay R.


Wednesday, November 3, 2021

परत मज बघायचं

मी बघायचं
नि तू हसायचं ।
का हे असे
नाहीच कळायचं ।
कधी लटकेच
रुसणं दिसायचं ।
बघून राग तुझा
मन घाबरायचं ।
मीच मग मला
खूप विचारायचं ।
काळ लोटला आता
थांबलं ते हसायचं ।
हस तू एकदा
परत मज बघायचं ।
Sanjay R.


Tuesday, November 2, 2021

" पेटवू चला दिवा एक "

पेटवू चला हो दिवा एक
एकेक करता होतील अनेक ।

प्रकाश होईल जिकडे तिकडे
निघेल उजळून अंगण प्रत्येक ।

नसेल कुठेच अंधार काळा
विचार किती हा वाटतो नेक ।

गरीब असो वा असो श्रीमंत
बघतो वाट तो येणार लेक ।

दिसेल आनंद चेहऱ्यावरती
साजरी होईल दिवाळी सुरेख ।
Sanjay R.



आठवण

आठवणी किती या मनात
गोड काही तर काही कडू ।

सुख दुःखाचे क्षण तयात
कधी हास्य, कधी फुटते रडू ।

ठेऊ किती मी मनात माझ्या

एकांत मिळता लागतात छेडू ।

आठवते मग ती आई माझी
लाडाने मजला म्हणायची वेडू ।
Sanjay R.