Saturday, October 31, 2020

" एकटा "

सोबतीला असतो कोण
एकटेच यायचे इथे ।
जोडायचे मग एकेकाला
कसे जुळते नाते तिथे ।

रोज एक नवा दिवस
काय ध्येय काय कुठे ।
क्षण क्षण सरतो पुढे
मागे मागे सारे सुटे ।

पोटासाठी परिक्रमा
घामासोबत रक्त आटे ।
शेवटी हातात शून्य
रास्त्यावरती सारे काटे ।
Sanjay R.


" बळीराजाचे दुःख "

सगळेच म्हणतात मला
आहेस तू बळीराजा ।
भोगतो मात्र दुनियेची
दुःख हीच माझी सजा ।

फाटक तुटकच नशिबात
राहतो नेहमी अंधारात ।
अख्ख आयुष्य गेलं बघा
निरंतर असतो कष्टात ।

आडोशाला भिंती चार
वर फाटक तुटक छप्पर ।
शिक्षण पाणी पण शून्य
पोरही निघाले सारे टिप्पर ।

आशा मात्र सुटत नाही
उपसतो कष्टाचा डोंगर ।
एकच पाऊस देतो धोका
फिरते मेहनतीवर नांगर ।

लुटारू तर सांगू किती
खिसा भरतो व्यापारी ।
कर्ज काढूनच जगतो मी
झकास चालते सावकारी ।

राजकारण्यांच काय सांगू
देऊन जातात आश्वासन ।
शेतकऱ्यांचा नाही कोणी
काय करते सरकार पन ।

रडत फडत जातो दिवस
कुठला आला दिवाळ सण ।
नशीबाचाच फेरा आहे
हेच आमचे जीवन मरण ।
Sanjay R.


Friday, October 30, 2020

" दसरा दिवाळी "

     आज दसरा आहे, पण वाटतच नाही दसरा आहे म्हणून, मन अशांत होतं. उठल्या बरोबर गाडी धुवायला घेतली. हेच आजकाल प्रमुख वाहन झाले होते. त्याची आज पूजा करायची होती. सकाळीच तयार होऊन बाजारात गेलो, अगदीच तुरळक दुकानं थाटली होती. झेंडूची फुलं आणि सोन पण विकायला होत.

     म्हटलं चला सोनं घेऊ या. सायंकाळ आज मस्त जाईल, थोरामोठ्यांना सोनं देऊ आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ. नेहमीसारखीच वर्दळ होईल. सगळ्यांच्या गाठी भेटी होतील. सगळ्यांचा हाल अहवाल मिळेल. सायंकाळ कशी मस्त जाईल.
झेंडूची फुल, सोनं, आंब्याची पानं आणि इतर काही वस्तू घेऊन घरी आलो. बसून छान झेंडूच्या फुलांचे हार तयार केले. त्यात हिरवी हिरवी आंब्याची पानं घातली. मनात उत्साह भरला. दाराला तोरण लावले हार चढवला. गाडीला पण एक हार चढवला. देवाच्या फोटोला हार घातले. घरातले होते नव्हते सारे शस्त्र म्हणजे खल बत्ता, कांदे कापायची पावशी, काढले, मस्त धुवून त्यांना देवासमोर मांडले आणि शस्त्र पूजा केली. आजकाल शस्त्रपूज या शस्त्रांचीच होते, तलवार भाले बिचवे उरलेच कुठे. आणि आम्ही कुठे रणांगणात लढाईला जाणार. घरात कांदा कप्तान होते तीच आमची लढाई. किती अश्रू निघतात तेही करताना.  कधी कधी तर डोळे पण सुजतात या खोट्या रडण्याने.

     घरात पुरी भाजी चा बेत सुरू होता. नैवेद्याला गोड म्हणून खमंग तुपातला शिरा भाजने सुरू होते. तो सुगंध हवा हवासा वाटत होता. दुपारी देवाला नैवेद्य करून जेवण आटोपले. आणि आरामात घर सजवायला घेतले. सगळ्या वस्तू व्यवस्थित धुवून पुसून जागच्या जागी ठेवल्या. थोडी स्वच्छता केली. सायंकाळी लोक येतील. सगळं कसं टाप टीप दिसायला हवं. करता करता बराच वेळ गेला. 
सीमोलंघनाला जायची वेळ झाली. थोडे नवीन असलेले कपडे घालून तयार झालो. कपाटात ठेवलेला परफ्युम काढला. दोनदा तीनदा अंगावर उडवला. सुगन्ध छान येतोय याची खात्री करून घेतली. थोडा घरात पण शिपडला. सगळे घर सुगनदीत झाले होते.  मधेच बायको बोलून गेली. अहो हे कशाला मारलं, आता माझं डोकं दुखणार, तुम्हाला माहिती आहे ना मला याची एलर्जी आहे ते. तरी मी ते आलमारीत लपवून ठेवले होते. तिथे पण तुम्ही शोध लावलाच. मी थोडा खजील झालो. पण म्हटलं अग आज दसरा सो उत्साह भरायला नको का. आजच्या दिवस चालवून घे. पंखा चालू करतो. थोड्या वेळात कमी होईल सुगन्ध. तुला त्रास नाही होणार.

     बायकोला सांगून मी बाहेर पडलो
सीमोल्लंघनाला... कुठे जायचे काहीच ठरवले नव्हते. बाहेर रस्त्यावर आलो तर गर्दी खूपच तुरळक दिसत होती. सगळे कदाचीत घरी परतणार असावेत. दरवर्षी सीमोल्लंघनाला जाणारी ती गर्दीच नव्हती. सगळं कसं शांत शांत भासत होतं. तरीही मी आपला चालत राहिलो. तसाच चालत चालत गावाच्या बाहेर पोचलो होतो. माणसांचा अगदी शुकशुकाट वाटत होता . सूर्यही परतीला पोचला होता. दरवर्षी लागणारी खेळण्यांची दुकानं लहान मोठ्यांची गर्दी काहीच नव्हतं. रावण दाहनही कुठेच दिसले नाही. यंदा रावणाला आनंद झाला असणार . मी तसाच परत घरी पोचलो.
आता थोडा अंधार पडला होता. घरात येताच हात पाय धुवून देवाला नमस्कार केला. पाहिले सोने देवाला द्यायचे या नियमाने देवाला सोने दिले. नमस्कार केला. बायकोनेही मला सोने दिले. नमस्कार करून आता सगळ्या बाहेरच्या थोरामोठयांना सोने द्यायला आपण मोकळे, म्हणून हॉल मध्ये आलो. आई बाबांची आठवण येत होती. दरवर्षी त्याना सोनं द्यायचो आणि ते भरभरून आशीर्वाद द्यायचे ते आठवलं. ते जाऊन आता चार वर्षे झाली होती पण आठवण मात्र सुटत नव्हती. आठवण आली की सगळं आठवायचं. आपलं लहानपण ते मोठं होईस्तो त्यांनी आपली घेतलेली काळजी, त्यांचे लाड प्रेम आणि कौतुक. आता त्यातलं काहीच उरलं नव्हतं.  मन हळवं झालं. बायकोनेही माझ्या मनात काय चाललं ते ओळखलं . आणि तीही हळवी झाली. वातावरण आनंदी व्हावं म्हणून ती बोलली चला आता लोकं येतील. थोडा चेहरा मोहरा बदला. थोडे आनंदी दिसा. चला तयारी करा आता.

आम्ही दोघेही तयार झालो आणि वाट भट बसलो सोनं वाटायची. बराच वेळ निघून गेला पण यंदा कोणीच कोणाकडे सोनं द्यायला आलं नाही की गेलं नाही. मग आम्हीही कपडे बदलून घेतले. मधेच बायको विचारून गेली जेवण करणार का. जेवायचाही मुडच गेला. नको वाटत होतं. मग तशेच झोपायला गेलो.

     शेवटी बायकोच बोलली हे पूर्ण वर्षच कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं. सगळं आयुष्यच थांबवलं. माहीत नाही कधी जाणार हा कोरोना.
ना दसरा ना दिवाळी... घ्यायची फक्त कोरोनीलची गोळी . जाऊ द्या जातील हेही दिवस.. आणि मग परत एकदा सगळे आनंदी होतील...

संजय रोंघे
नागपूर


" स्पर्श मायेचा "

हळूच मोहरून जातो
हळुवार स्पर्श मायेचा ।
होते मन भीर भीर 
आठवतो पदर आईचा ।

अजूनही आहे अंतरात
भरलेला गंध जाईचा ।
ओढ कशी वासराला
हंबरडा चाले गाईचा ।

माया ममता प्रेम सारे
स्पर्श एकच सुखाचा ।
फिरता हात पाठीवरती
सरतो लवलेश दुःखाचा ।
Sanjay R.

Thursday, October 29, 2020

" समाधान "

स्वभावच माणसाचा असा
नसतो कधी समाधानी ।
म्हणतो मी काय कमी
दिखावा नुसता स्वाभिमानी ।

अज्ञानाचा असूनही सागर
सांगे मीच मोठा ज्ञानी ।
माणूसच तो माणसासारखा
त्याच्यासारखा नाही कोणी ।
Sanjay R.