Friday, October 9, 2020

" मुंबई स्वप्नांचे शहर "

मुंबई तर माझी
वाटे स्वप्नाचे शहर ।
कामासाठी भटकतो
थांबत नाही नजर ।

चकचकीत रस्ते आणि
लकलकीत गाड्या ।
नजर जाईल तिकडे
उंचच उंच माड्या ।

रस्त्यावर चालताना
किती माणसांची गर्दी ।
शोधली तर सापडेल
लोकलमध्ये अर्धी ।

वेळ नाही कुणास
जो तो घाईत ।
जातात सारे कुठे
नाही कुणास माहीत ।

एका कडेला समुद्र
फेकतो कशा लाटा ।
नेहमीच भरलेल्या
आहेत तिथल्या वाटा ।

जिथे तिथे खायला
वडा पाव भेळ ।
चालता चालता खातील
जेवायला नाही वेळ ।

जिकडे तिकडे दिसेल
श्रीमंती चा थाट ।
झोपडीत जाल तर
झोपायला नाही खाट ।

घर म्हणता कशाला
एका खोलीत संसार ।
आयुष्य भर पळतो
तरी पेलवत नाही भार ।

मुंबई शहर माझे
स्वप्न बघतो जीवनभर ।
दिवसामागे दिवस जातात
प्रवास चाले आयुष्यभर ।
Sanjay R.



Wednesday, October 7, 2020

" खेळ जादूचे "

आठवतं मला ते 
बघायचो जादूचे खेळ ।
रस्त्याच्या कडेला
जादूगार बसवायचा मेळ ।

वाजवून डमडम डमरू तो
हात आकाशात फिरवायचा ।
काढून पुष्पगुच्छ जादूने
भेट माकडाला करायचा ।

हसून हसून दुखायचे पोट
बघून चेष्टा माकडाच्या ।
जादूच ती सरली आता
माणूस मागे माणसाच्या ।
Sanjay R.

" डोळे बंद "

आंधळे प्रेम
डोळे बंद ।
फुलते जेव्हा
मन होते बेधुंद ।
गती श्वासांची
होते मंद ।
तुटतात सारे
जखडलेलेले बंध ।
अंतराला एक
अनोखा छंद ।
प्रेम हे असेच
असते अंध ।
Sanjay R.


Monday, October 5, 2020

" होऊ नको निराश "

होऊ नको निराश
नैराश्य म्हणजे विनाश ।

बघ थोडे आकाश
होईल परत प्रकाश ।

कठीण जीवन प्रवास
हवा विजयाचा प्रयास ।

मनात असेल जर ध्यास
विजयी होतील आभास ।
Sanjay R.

Thursday, October 1, 2020

" स्त्री अत्याचार "

हाथरस असो वा आमच्या विदर्भातील हिंगणघाट असो, स्त्री वर अत्याचार करणारी ही विकृती प्रत्येक गाव, प्रत्येक शहरात, देशाच्या सम्पूर्ण भागात दिसून येते. अपराध्याना जात पात धर्म याच्याशी कुठलेच देणे घेणे नसते. ते आपली वासना पूर्ण करण्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार होतात. याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे ,त्यांना कशाचीच न उरलेली भीती. यासाठी शासनद्वारा कठोर कायद्याचे नियम आणि त्यांची अंमलबजावणी होण्याची नितांत गरज आहे. जो पर्यंत आमच्या देशातील महिला या विरुद्ध पेटून उठणार नाहीत तोवर यावर नियंत्रण अशक्य वाटते. हाथरस येथील घटनेवर देशभर आंदोलन होत असतानाच देशाच्या इतर अनेक भागात अशाच घटना घडत आहेत. यातून   हे अत्याचार करणारे विकृत लोकांना कदाचित भीती उरली नाही हेच दिसून येते. आणि राजकारणी मात्र अशा मुद्द्यावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेताना दिसते.
यासाठी समाजानेच जागृत होण्याची गरज आहे.
" जय हिंद जय भारत "