Thursday, October 1, 2020

" स्त्री अत्याचार "

हाथरस असो वा आमच्या विदर्भातील हिंगणघाट असो, स्त्री वर अत्याचार करणारी ही विकृती प्रत्येक गाव, प्रत्येक शहरात, देशाच्या सम्पूर्ण भागात दिसून येते. अपराध्याना जात पात धर्म याच्याशी कुठलेच देणे घेणे नसते. ते आपली वासना पूर्ण करण्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार होतात. याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे ,त्यांना कशाचीच न उरलेली भीती. यासाठी शासनद्वारा कठोर कायद्याचे नियम आणि त्यांची अंमलबजावणी होण्याची नितांत गरज आहे. जो पर्यंत आमच्या देशातील महिला या विरुद्ध पेटून उठणार नाहीत तोवर यावर नियंत्रण अशक्य वाटते. हाथरस येथील घटनेवर देशभर आंदोलन होत असतानाच देशाच्या इतर अनेक भागात अशाच घटना घडत आहेत. यातून   हे अत्याचार करणारे विकृत लोकांना कदाचित भीती उरली नाही हेच दिसून येते. आणि राजकारणी मात्र अशा मुद्द्यावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेताना दिसते.
यासाठी समाजानेच जागृत होण्याची गरज आहे.
" जय हिंद जय भारत "

" नाती गोती "

आयुष्याचे मोल काय
अजून का हे कळले नाय ।

लुटारूंचा बोल बाला
भोगवाद्यांचा अजब न्याय ।

कष्टकऱ्यांचे आटते रक्त
सहन करतो सारे अन्याय ।

अधांतरीच स्वप्न सारी
जसे वाळूवरती उभे पाय ।

लाट येताच पाण्याची
कण कण वाळू निघून जाय ।

नाती गोती सरती सारी
नसती सोबत बाप माय ।

स्वाहा होते नश्वर शरीर
राख उरते किंमत काय ।
Sanjay R.


Wednesday, September 30, 2020

" दिवस होते ते मौजेचे "

लहानपण आठवते मला
दिवस किती होते ते मौजेचे ।

वाटतं अजून व्हावं लहान
खेळ खेळावे लहानपणीचे ।

दंगा मस्ती खो खो हसणे
विसरलो प्रसंग गमतीचे ।

शाळा अभ्यास पाटी पुस्तक
धपाटे आठवतात गुरुजींचे ।

आईही द्यायची शिक्षा घरात
अश्रू डोळयातून निघायचे ।

मोठेपणाचा देखावा आता
हुंदके हृदयातच ठेवायचे ।
Sanjay R.

Tuesday, September 29, 2020

" फुलले चांदणे अंगणात "

रात्र होता अंधार दाटतो
सूर्य पल्याड विसावतो ।

फुलले चांदणे अंगणात या
चन्द्र ढगाआडून डोकावतो ।

बेधुंद झाली रात राणी
सुगन्ध तिचा तो दरवळतो ।

रातकीडयांनी ताल धरला
मधेच काजवा लुकलूकतो ।

वृक्ष वेली घेती झोका
हळूच वारा सळसळतो ।

दूर जळते एक पणती
जीव माझा धडधाडतो ।
Sanjay R.

Monday, September 28, 2020

" हा उनाड वारा "

सांगू कसे मी कुणा
किती हा उनाड वारा ।
बेचैन होते मन
बारसतात जेव्हा धारा ।
होतो सूर्य ढगाआड
होई शांत तेव्हा पारा ।
गंध मातीचा सुटे
भिजे चिंब पसारा ।
होता शांत वारा आणि
चमचमतो तारा ।
Sanjay R.