Tuesday, May 26, 2020

" आत्मविश्वास "

सम्पवू नको ही लढाई
जिकणार आहेस तूच
थोडासा धीर धर आणी
लढत राहा पूर्ण जिद्दीने
विजय तुझाच होणार
शत्रूचा विनाश होणार
ध्वजा विजयाची फडकणार
स्वतंत्र परत तू होणार 
संकटं सारीच टळणार 
दिवस जुने परत येणार
स्वप्न नव्हे हे सारे
सगळे तसेच घडणार 
Sanjay R.

Sunday, May 24, 2020

" झाला उध्वस्त संसार "

होता संसार सुखात
क्षणात लोटले दुःखात ।

दिवसभर करून कष्ट
पडायचे घास दोन पोटात ।

आले वादळ कोरोनाचे
झाला संसार उध्वस्त ।

घर गेले वाटा सारल्या
मार्ग घराचा डोळ्यात ।

नाही भय मृत्यूचे परी
जिद्द जगण्याची मनात ।
Sanjay R.



Saturday, May 23, 2020

" क्षण जीवनाचा "

क्षण क्षण या जीवनाचा
कठीण झाला किती ।
दिवस सैरवैर फिरण्याचे
स्वप्न सारी झालीत रीती ।

नव्हता कुठला आतंक
नव्हती कुठली भीती ।
क्षणात सरले सारे 
थांबली चाकांची गती ।

झाला माणूस निराधार
झाली नात्यांची क्षती ।
बघा आकाश सारे
उरले तेवढेच हाती ।
Sanjay R. 

Friday, May 22, 2020

" हृदय मी दिले तुजला "

अंतरात आहेस माझ्या तू
सदा असते विचारात तू ।

तुजविण न सुचे मजला
आहेस माझ्या प्रेमात तू ।

दिवस असो वा रात्र असो
स्वप्नात माझ्या असतेस तू ।

हृदय मी दिले तुजला
झालीस माझे जीवन तू ।

प्रवास आता या जीवनाचा
करू सोबतीने मी आणि तू ।

ऊन असो वा असो पाऊस
अंगणात मनाच्या तूच तू ।

आनंदाची बरसात होता
भिजलेल्या धरेचा गन्ध तू ।
Sanjay R.

Thursday, May 21, 2020

" जीव गेला कावून "

तू थांब घरात
मी येतो जाऊन ।
कुठी हाये कोरोना
येतो मी पाहून ।

थकून गेलो आता
घरात मी ऱ्हावून ।
दूर ऱ्हाय दूर ऱ्हाय 
पालुपद गाऊन ।

हिंडन न्हाई फिरणं न्हाई
गेलो आता कंटाऊन ।
जवा तवा थेच थे
भौ जीव गेला कावून ।

धा बारा दिस आता
हाये म्हनते अजून ।
जुन्यावानीच होऊ दे
निंगीन सजून धजून ।
Sanjay R.