Saturday, August 31, 2024

झोपडीतले सुख

" झोपडीतले सुख "

झोपडीतले सुख
राजवाड्यात कुठे ।
छोट्याश्या मनात
जसे स्वप्नच मोठे ।

स्वतःच स्वतःचे 
करायचे काम सारे ।
कोण येतंय आत
इथे उघडीच दारे ।

दिवसभर कष्टाने
घाम कसा गळे ।
पडताच कुठेही
मिटतात डोळे ।

नाही चिंता कशाची
नाही कसले टेन्शन ।
तळ हातावरची कमाई
हवी कसली पेन्शन ।

नको आम्हा मान
नकोच हो सन्मान ।
आम्हीच मिरवतो
त्यात आमची शान ।

कर्ज काढून कधी
साजरे होतात सण ।
आनंदातच भोगतो
उपासाचे ही क्षण ।

नाही कुठल्या आशा
नाही कशाची अपेक्षा ।
जन्मा सोबत मिळाली
हीच आम्हास दीक्षा ।

दुःखही सुख मानुन
मनातच  हसायचे ।
मरत नाही म्हणून
फक्त इथे जगायचे ।

सहज पणे झेलतो
नशिबाचे सारे भोग ।
मरणाला पण आम्हा
लागतोच कुठे योग ।

संजय रोंघे, नागपूर.
मोबाईल - 8380074730


सहवासाच्या आठवणी

अजूनही तरळतात पुढ्यात
त्याच त्या जुन्या आठवणी ।
शब्दही तेच गुंजतात कानी
गालावर हसू नी डोळ्यात पाणी ।

छोट्या छोट्या गोष्टींना मी मात्र
समजायचो तुझी ती गाऱ्हाणी ।
घट्ट बिलगून सारं कसं सांगायची
वाटायचं किती किती तू शहाणी ।

भरभर बोलत सुटायची जिव्हा
लगामच नव्हता, सुटायची वाणी ।
आता मात्र सारच झालंय शांत
बस मनातच उरली जुनी कहाणी ।
Sanjay R.


Thursday, August 29, 2024

आकाशगंगा

दूर बघतो मी गगगनात
वाहते तिथून आकाशगंगा ।
ढगांच्या मागे चंद्र तारे
सृष्टीचा हा अवतार श्रीरंगा ।

गुलाब मोगरा फुलतो जेव्हा
चारी दिशेला असतो दरवळ ।
येतो वारा कुठून कसा तो
सळसळ करतो वड पिंपळ ।

मुंगी माकोडे किट किती हे
सारेच आपुल्या कामात मग्न ।
माणूस इथला स्वार्थी किती तो
धरेस करतो का असा भग्न ।
Sanjay R.


तुझं ते असणं

होशील का तू सखी
की असेल ते स्वप्न ।
तुझ्याविना तर नीरस
वाटते किती हे जगणं ।

बघत राहावं वाटतं
तुझं ते गालात हसणं ।
विनाकारण माझ्यावरती
लटकेच  कधी रुसनं ।

मग बघत बसतो वाट
अस्वस्थ करतं तुझ नसणं ।
मनाला वाटतो आधार
सोबत तुझं ते असणं ।
Sanjay R.


Wednesday, August 28, 2024

जीवनाची शिदोरी

कर्माचे फळ हीच
जीवनाची शिदोरी ।
नशिबाचे भोग सारे
गळ्यातली ती दोरी ।

कर्म धर्म संयोगाने
घडते काही अघोरी ।
अधर्माने मिळविले
होते तिथेच चोरी ।

शांत कुठली झोप
गाईल कोण लोरी ।
इथले इथे फेडायचे
नको कुणास सॉरी ।
Sanjay R.


Tuesday, August 27, 2024

स्वप्न सत्य

बघतो मी स्वप्न जेव्हा
असते समोर तू तेव्हा ।
कसे छळ मांडते हे मन
साक्षात तू येशील केव्हा ।

वाटते तू येशील जेव्हा
भेट कशी ती असेल तेव्हा ।
अधर मन हे होईल भिरभिर
फुलेल मोगरा तू सांग केव्हा ।

सत्य मनाचे कळेल जेव्हा
असेल का मी तिथेच तेव्हा ।
अजूनही आहे मनात आशा
सुगंधी गुलाब तू देशील केव्हा ।
Sanjay R.


प्रश्न

विचारू मी कुणास
मनात प्रश्न एक ।
कळेना मज काही
त्यात उत्तर अनेक ।

भास होतात सारखे
करू कुठे मी चेक ।
आशा नाही सुटली
येयील कुणी नेक ।

विश्वास आहे माझा
असावी तूच ती एक ।
उत्तर प्रश्नाचे माझ्या
असेल कसे ते फेक ।
Sanjay R.


गोपाळ

देवकीचे छोटे बाळ
यशोदा करी सांभाळ ।
ठुमकत ठुमकत चाले
पायी बंधूनिया चाळ ।
कृष्ण म्हणू की माधव
राधेचा तो गोपाळ ।
होतो अर्जुनाचा सारथी
करी पांडवांचा सांभाळ ।
घडले महाभारत ज्यात
झाला कौरवांचा काळ  ।
Sanjay R.


Sunday, August 25, 2024

ओंजळ

तुझी ओंजळ सुखाची
भरली अशीच असू दे ।
आयुष्याला पुरेल सारे
साथ तुझी मज असू दे ।
Sanjay R.


Saturday, August 24, 2024

थांब थांब तू जरा पावसा

नको वाटतो पाऊस आता
फिटली ना रे हाऊस आता ।
निरोप घे ना तू जरासा
येशील नंतर जाता जाता ।
रस्ते भरले नाल्या भरल्या
धरा ही थकली पिता पिता ।
पाणी पाणी चिखल सारा
होईल कसा तो असाच रीता ।
थांब थांब तू जरा पावसा
शेत पिकू दे आमचे आता ।
Sanjay R.


स्वातंत्र्याची लढाई

सरली आता लढाई
उरली फक्त चढाई ।

मिळाले ते स्वातंत्र्य
उरला स्वार्थाचा मंत्र ।

कुणी सत्तेचा लालसी
आम्ही बघे आळसी ।

माजली लूट अशी इथे
रक्त पिपसू जिथे तिथे ।

मोह मायाही सुटेना 
स्वार्थाची लकिर मिटेना ।

मी मीचा इथे कायदा 
दुसराच उचलतो फायदा ।

जगणे मरणे एक झाले 
डोळे इथे कुणाचे ओले ।

स्वातंत्र्याची ध्वजा उंच
अंधार खाली काळा कंच ।

संजय रोंघे, नागपूर
मोबाईल - 8380074730

Friday, August 23, 2024

वादळी झरा

निरंतर वाहे तो झरा
म्हणतो मी थांब जरा ।
सोबतीला आहे पाऊस
ओली चिंब झाली धरा ।

वाटतो लोटला काळ
सूर्यही दिसेना कुठे जरा ।
पावसानेही कहर केला
यंदाची ही वेगळीच तऱ्हा ।

शहारा शहरात झाले पाणी
रस्त्यावरून लोटल्या धारा ।
शेत मळेही तुडुंब भरले
दुःख बळीचे त्याला विचारा ।
Sanjay R.


Thursday, August 22, 2024

तू तिथे

बघुन डोळ्यात तुझ्या
तृप्त तृप्त  मी होतो
मनात भाव तुझाच
अंतरात तूझ्या नेतो ।

सदा सदा तू हसावे
कधी कधी न रुसावे ।
प्रेम तूझ्या माझ्यातले
मोगाऱ्यागत फुलावे ।

तू तिथे नी मी हा इथे
जाणीवेने स्तब्ध होतो ।
तेव्हा करून बंद डोळे
स्वप्नी तुज जवळ घेतो ।
Sanjay R


विनोदी विश्व

हसायला का हवे
मुखा मध्ये दात ।
ओठही देतातच हो
हवी तेव्हा साथ ।

गालांना नका विचारू
तेही करतात चिकचीक ।
डोळेही सांगून जातात
भावनांची टिकटिक ।

नाद असतो तत्पर
त्याचीही हुहा जंमत ।
चूप कोण बसणार
वाटते कानास गंमत ।

विनोदी किती हे विश्व
हास्य कोण विसरेल ।
तुम्ही हसा मीही हसतो
दूर दूर तर पसरेल ।
Sanjay R.


जीवन गाणे

जीवनाच्या मंचावर
रंगांची मिळते साथ ।
रात्रीचा सरतो अंधार
परत गुलाबी प्रभात ।

काम कष्ट गाळतो घाम
सोबतीला दोन्ही हात ।
पडतो पुन्हा मी उठतो
देऊनिया साऱ्यास मात ।

नवी उमंग नवा उत्साह
देतो सोडून जुनी कात ।
दिवस मी सारतो मागे
जीवनाचे गाणे गात ।
Sanjay R.

Tuesday, August 20, 2024

आठवण

येना येगं तू आता परत
दिवस हे झाले किती ।
तुझ्या विना वाटे मज
एकटा एकाकी किती ।

माहेर ते तुझ्यासाठी
जणू आभाळ हाती ।
घे वेचून तू ढग सारेच
पण विसरू नकोस नाती ।

आठवण तुझी मनात
जळतात अंतरात वाती ।
घरही उदास इथे आता
आसुसलेली आहे माती ।
Sanjay R.







Friday, August 16, 2024

स्वातंत्र्य

आजूबाजूला बघतो जेव्हा
माणुसकीचा दिसतो अंत ।
स्वातंत्र्य हे टिकणार कसे

आहे मनाला हीच खंत ।

महाराज कोणी होतो बाबा
म्हणतो आहे मीच संत ।
व्यभिचारी इथे दुराचारी
होऊन फिरतात मोठे महंत ।

राजकारण्यांचे नाव नको
दाखवतील ते वाचले ग्रंथ ।
तोडा फोडा राज्य करा
एकच त्यांचा मूळ मंत्र  ।

जाती जातीत द्वेष किती
विचारतात ते कुठला पंथ ।
हिंदू मुस्लिम शीख ईसाई
मारा मारा कोण म्हणतं ।

नाही उरली माणुसकी हो
चिरडतात ते जसा जंत ।
विनाशाच्या वाटेवरचा
समोर दिसतो होईल अंत ।
Sanjay R.



Wednesday, August 14, 2024

मन झाले माझे मोर

मन झाले माझे मोर
रात्रीची जणू चंद्र कोर ।
उनाड हा वारा नी
आहे पावसाचा जोर ।
नाच नाचू मी कसा
भिजले अंगण समोर ।
झुलते हे झाड किती
ठेवला बांधून दोर ।
मन मुक्त जयाचे
नाचतो तोही पोर ।
मन झाले माझे मोर
जणू रात्रीची चंद्र कोर ।
Sanjay R.


Tuesday, August 13, 2024

मित्र

एकेक लागला गळायला
नी पाय माझे वळायला ।
काळ लोटला वेळ लोटली
मित्रांसाठी लागलो हळहळायला ।

दिवस तेव्हाचे आठवतात
भारी वाटायचे याच मित्रात ।
शाळा सुटली नोकरी लागली
काम काम तेच होतं कर्मात ।

आता थोडी मिळाली उसंत
बोलावे भेटावे वाटत मित्रांना ।
पण तेही निघालेत दूर आता
सांगा थांबवू कसे मी सर्वांना ।
Sanjay R.


स्वप्नांचे गोकुळ

धन्य धन्य ते गोकुळ
वाढला जिथे कृष्ण ।
नंद यशोदेचा लाल
गोकुळात ते असणं ।
रंग रंगात श्री रंगला
सखी राधेचं रुसण ।
गोपी करी साऱ्या हेवा
त्यातच त्यांचं फसण ।
वाटे हवे हवे ते गोकुळ
मिळेल का हाच प्रश्न ।
Sanjay R.


अविस्मरणीय क्षण

एकेक क्षण या जीवनाचा
अविस्मरणीय मज वाटे ।
खडतर होता प्रवास सारा
कुठे पाकळ्या तर कुठे काटे ।

हसणे रडणेही सोबत होते
सुख दुःख होते जरी छोटे ।
आसवांनी भरले डोळे
त्यातही सुख वाटे मोठे ।

मन होते मज सावराया
हुंदका ही आतच दाटे ।
दिवस असे हे कधी सरले
वाटते सारे खोटे खोटे ।
Sanjay R.


Tuesday, August 6, 2024

महादेव

आता असतो मलाही
सोमवारचा उपवास ।
कारण आहे एकच
सुरू झाला श्रावण मास ।

बेल फुल घेऊन अक्षदा
महादेवाचे करतो पूजन ।
आजकाल पूजेतच हो
जरा लागते माझेही मन ।

रोज असते सायंकाळी
मंदिराची एक वारी ।
मनोभावे हात जुळतात
देवच वाटतो मला प्रहरी ।
Sanjay R.


Saturday, August 3, 2024

दुःख

दुःखा मागे येयील सुख
मनात कशाची रुखरुख ।
हसरे गोजरे सुंदर हे मुख
होईल खराब चांगला लूक ।
झाले गेले विसर तू आता
असू देना तू कुणाचीही चूक।
जरा विचार कर थोडा
तुटेल नाते होशील मुक ।
Sanjay R.


Thursday, August 1, 2024

श्रावण सरी

कुठे कशास मी जाऊ
मागे पावसाच्या धावू ।
येतो आणि जातो तो
श्रावण सरींचा खाऊ ।

पाऊस पडतो सर सर
निळे काळे इथे अंबर ।
ऊन पावसाचा खेळ
सूर्य वाटते मज झुंबर ।

हिरव्या पानांची सळसळ 
जिकडे तिकडे हिरवळ ।
फुलला गुलाब मोगरा
मोहवितो कसा दरवळ ।

निसर्ग मोहक इतका की
आवडतो श्रावण जितका ।
जातो लवून माया मज
आनंद उत्साह मनी तितका ।
Sanjay R.