Thursday, November 19, 2020

" थंडी म्हणते मी "

     डिसेंम्बर महिना म्हणजे थंडीचा महिना. शाळांना पण ख्रिसमस च्या सुट्या असतात. दिवाळी नुकतीच झालेली असते. परीक्षा आटोपलेल्या असतात. आणि नवीन वर्ष अगदी काही दिवसांवर येऊन वाट बघत असते. सगळीकडे उत्साहाचं आनंदाचं वातावरण असते. निसर्गही मनसोक्त बहरलेला असतो. रंगीबेरंगी नाजूक फुलं लाजत मुरडत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. फुलांचा सुगन्ध चाहुओर दरवळलेला असतो.

     त्यातच आमच्या चिंगी ला पिकनिकला जायचे सुचले. तिच्या सगळ्या मैत्रिणी पिकनिकला जाणार होत्या. त्यांच्या त्या गोष्टी ऐकून तिलाही राहवत नव्हतं. तिने मग हट्टच धरला आपणही पिकनिक ला जायचे. पण ही पिकनिक एक दिवसाची नाही तर चांगली सात दिवसांची हवी असे तिचे म्हणणे होते. मस्त बाहेर ट्रेन ने जायचे , सात दिवस बाहेरच राहायचे, हॉटेल मध्ये पाहिजे ते खायचे मस्त भटकायचे. फक्त मस्ती करायची. पण मग अगदी वेळेवर सात दिवसांचा टूर अरेंज करायचा म्हणजे साधं नव्हतं. पण चिंगी ऐकायलाच तयार नव्हती. जायचं म्हणजे जायचं. आणि न ठरवता जायचं म्हणजे त्यातही एक थ्रिल असत. असं तिचं म्हणणं होतं. मग मात्र आम्ही ही तयार झालो. कुठे जायचे हे मात्र काही ठरत नव्हतं. आता वेळेवर तिकीट, रिझर्वेशन सगळाच गोंधळ होणार होता . चिंगीला मात्र हा असाच गोंधळ हवा होता. ठरवून तर काहीही करता येईल. पण न ठरवता पण काही करू या, ही तिची इच्छा होती.

     तसेच मग आम्ही आमची तयारी सुरू केली. मी ट्रेन च्या तिकीट करिता नेट वर साईट उघडून बघितले तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्वच दिशेने जाणाऱ्या ट्रेन मध्ये फुल चे टॅग लागलेले होते. काय करावं, कुठे जावं, काहीच सुचत नव्हतं. शेवटी मद्रासकडे जाणाऱ्या ट्रेन मध्ये थोडी आशा वाटत हाती कारण वेटिंग नुकतेच सुरू झालेले होते. त्यात वेटिंग चे तिरुपती ला जायचे तिकीट मिळण्याचे चांसेस होते. तसे मी चिंगीला विचारले, आपण तिरुपती मद्रास ला गेलो तर तुला आवडेल का. तर ती म्हणाली अरे पप्पा तिकीट कुठलंही काढा , बस आपल्याला इथून निघायचं आणि फिरून परत यायचं बस इतकंच लक्षात घ्या. मग मी तीन तिकीट तिरुपतीच्या बुक केल्या. ट्रेन दुसऱ्या दिवशी होती सायंकाळी पोचणार होती. नेमकं आमच्या नशिबाने  तिकीट सहा तासात कन्फर्म झालं आणि आमची चिंता थोडी कमी झाली. मग आम्ही विचार केला की बालाजी चे दर्शन करून मग मद्रास जायचे. दोन दिवस मद्रास ला थांबून मग परत निघायचे. त्यानुसार मी मग मद्रास वरून रिटर्न तिकीट शोधायचा प्रयत्न केला तर तिथे पण तीच परिस्थिती होती. कमी वेटिंग असलेल्या ट्रेन मध्ये मी वेटिंग चे रिझर्वेशन घेऊन मग तो विषय सम्पवला. आणि आम्ही तयारीला लागलो.
    
     जायचे तिकीट कॉन्फर्म झाल्या मुळे आम्ही आरामात तिरुपती ला पोचलो. पण निघताना आमची एक फार मोठी गडबड झाली. स्वेटर, शाल आणि इतर थंडी पासून बचाव करायचे कपडे असलेली ब्याग आमची घरीच सुटली. आता मात्र लक्षात आले की आपली ही ट्रिप खरच चिंगी जसे म्हणत होती तशीच थ्रिलिंग होणार होती. थंडी पासून बचावाचे सगळेच कपडे असलेली ब्याग घरातच आमची तिला उचलायची वाट बघत होती.
आम्ही पोचलो तेव्हा अंधार पडलेला होता. मी हॉटेल चा शोध घ्यायला लागलो तशी चिंगी बोलली पप्पा इथे काय थांबायचं. चला आपण मंदिरलाच जाऊ या, लवकर दर्शन होईल आणि मग आपण फ्री होऊ म्हणजे मग आपल्याकडे फिरायला बराच वेळ असेल . सो आम्ही मग जेवण आटोपून मंदिराकडे निघालो वर गेल्यावर कळले की आता एन्ट्री बंद करण्यात आलेली आहे. आता सकाळी एन्ट्री सुरू होईल. मग मात्र थांबण्याशिवाय पर्याय नव्हता तशातच रात्रीचे दोन वाजले होते. एन्ट्री सुरू व्हायला अजून चार तास बाकी होते. मी हॉटेल शोधायचा प्रयत्न केला पण सगळेच हॉटेल्स फुल झालेले होते. प्रवेश बंद करण्यात आल्यामुळे हॉटेल्स फुल झाले होते. शोध घेऊनही कुठेच काही मिळाले नाही. थंडीचा जोर तर खूपच वाढलेला होता. हात पाय थरथरत होते. दात नुसते हलत होते. गर्दीही भयंकर होती. लोक खुल्या जागेत घोळके करून बसलेले होते. सगळ्यांची परिस्थिती वाईट दिसत होती. थंडीमुळे लोक शाल, ब्लॅंकेट लपेटून चहाचा आस्वाद घेत बसलेले होते. त्यांचे ते लपेटलेले शाल ब्लॅंकेट बघून मात्र आम्हाला थंडी जास्तच झोंबत आहे असे भासत होते . जणू ती आम्हाला अजूनच वेडावत आहे असे वाटत होते. मग मी ही एक चहावाला शोधला आणि त्याच्या भट्टीच्या बाजूला जाऊन आम्ही बसलो आणि अगदी कडक चहाचा एक एक घुट घेत थंडीमे गर्मीका येहसास शोधत होतो. कारण आता आमच्याकडे तोच एक पर्याय बाकी होता.

     आजूबाजूला अश्याच चहाच्या भट्ट्या पेटलेल्या होत्या. त्यांच्या निघणाऱ्या ज्वाळा आम्ही आपल्या डोळ्यातून आत शरीरात पोहचऊन गर्मी चा एक आभास निर्माण करून स्वतःचा बचाव करण्याचा तुटका फुटका प्रयत्न करत होतो. थंडीने आपले थ्रिल निर्माण केले होते. आणि आम्ही त्या थ्रिल मध्ये पुरते गरगर फिरत होतो. वारंवार नजर घड्याळाकडे जात होती. सकाळ व्हायला किती वेळ बाकी आहे याचे कॅलकुलेशन वारंवार करत होतो.  वेळही अगदी निवांतपणे शांत चित्ताने संथ गतीने पुढे सरकत होती. आणि थंडी आपल्या वर्चस्वाची आम्हास जाणीव करून देत होती. त्या चार तासात आम्ही किती वेळा चहा घेतला याचा काहीच हिशोब नव्हता. बस आमच्याकडे तोच एक पर्याय उरलेला होता.

     मग हळूच चिमण्यांची चिवचिव सुरू झाली हळू हळू अंधार लुप्त व्हायला लागला आणि आमची थंडीशी रात्रभर चाललेली लढाई ही संपुष्टात येत होती. तसे मग आम्ही अंघोळीची व्यवस्था शोधून तिथे आंघोळ फ्रेश होऊन दर्शनाच्या रांगेत पोचलो. श्री बालाजी चे दर्शन करून मग आम्ही मद्रास कडे रवाना झालो, तीन दिवस मद्रासला फुल एन्जॉय करून परत आलो. तो पर्यंत आमचे रिटर्न तिकीट ही कन्फर्म झालेले होते, त्यामुळे बाकी प्रवास सगळा मस्त आनंदात उत्साहात पार पडला. पण थंडीचा हा गार झटका मात्र आम्ही कधीच विसरणार नाही.चिंगी मात्र या पिकनिक मुळे जाम खुश झाली होती.

संजय रोंघे
नागपूर.



No comments: